कडबा पेंडीचे दर गगनाला गेल्याने पशुपालक हवालदिल
अकोला: विदर्भात चाराटंचाईचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे,पशुधनासाठी आवश्यक असलेल्या वैरणाचा (कडबा पेंडी)दर शेकडा पाच हजार रुपयांपर्यंत गेल्याने पशुपालक हवालदिल झाले आहेत. खरीप हंगामातील जवळपास सर्वच पिकांचे उत्पादन कमी झाल्याने,चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या भागात ज्वारी, कापूस हे मुख्य पीक होते; परंतु अलीकडच्या काही वर्षांत या पिकाची जागा सोयाबीन पिकाने घेतल्याने विदर्भातील ही पारंपरिक पिके मागे पडली आहेत. त्यामुळे ज्वारीचे उत्पादन घटल्याने पशुधनासाठी पोषक व आवश्यक कडबा कमी झाला. परिणामी, कडब्याचे दर प्रचंड वाढले असून, एका कडबा पेंडीचा दर ५० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.