रोपवाटीका म्हणजे काय?
ज्या ठिकाणी कलमे किंवा रोपांची निर्मिती केली जाते त्या जागेस रोपवाटिका असे म्हणतात. इंग्रजीत रोपवाटिकेला ‘ नर्सरी ‘ म्हणतात. नर्सरी म्हणजे काळजी घेणे किंवा निगा राखणे होय. रोपवाटिकेत तयार केलेल्या कलमांची / रोपांची काळजी घेतली जाते असा अर्थ त्यातून अभिप्रेत आहे. रोपांची वेगवेगळ्या प्रकारे अभिवृध्दी करणे, तयार केलेल्या रोपांची काही काळापर्यंत योग्य प्रकारे जोपासना करणे आणि अशा योग्य रोपांचा किंवा कलमांचा पुरवठा करणे अशा तीन प्रकारच्या जबाबदा-या रोपवाटीकमध्ये साभाळल्या जातात.
रोपवाटीकेचे महत्त्वः
फळझाडाच्या किफायतशीर लागवडीत रोपवाटीकाचे अनन्यसाधारण महत्व आहे. फलोत्पादनाकडे निश्चित व शाश्वत उत्पादन देणारे क्षेत्र म्हणून शेतक-यांचा दृष्टीकोन आहे. तसेच कोरडवाहू क्षेत्रात तृणधान्य पिकांच्या उत्पादनाची शाश्वती राहात नाही. अशा परिस्थितीत शेतक-यांना हमखास उत्पादन मिळून त्यांच्यात आर्थिक स्थैर्य निर्माण करणे फलोत्पादनामुळे शक्य होत आहे. राज्यातील निरनिराळ्या प्रकारच्या जमिनी व हवामानाची विविधता यामुळे फळबागेस अत्यंत पोषक वातावरण निर्माण झाले आहे. विविध फळपिकांना असलेले पोषक हवामान विचारात घेता, ज्या फळपिकांना ज्या विभागात वाव आहे त्या विभागात त्या फळपिकांच्या रोपवाटिका निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण जातीवंत कलमे किंवा रोपे ही फळबाग लागवडीमध्ये अत्यंत महत्त्वाची बाब आहे. कलमांचा जातीवंतपणा हा तपासून घेतला नाही तर फळबागांचे भवितव्य धोक्यात येऊ शकते. म्हणून विविध प्रकारची शुध्द व जातीवंत कलमे नर्सरीच्या माध्यमातून शेतक-यांना उपलब्ध करुन देणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने रोपवाटिका तयार करणे गरजेचे आहे.
रोपवाटिकेचे खालील प्रमाणे विविध प्रकार आढळतात .
१) शासकीय रोपवाटीका ,
२) कृषि विद्यापीठ रोपवाटीका ,
३) मान्यताप्राप्त सरस्थ रोपवाटीका ,
४) मान्यताप्राप्त आणि पंजीकृत खाजगी रोपवाटीका ,
५) खाजगी रोपवाटीका रोपवटिकेत निरनिराळ्या पिकांची कलमे / रोपे तयार केली जातात. त्या पिकाच्या वर्गीकरणावरून रोपवाटिकचे खालील प्रमाणे प्रकार पडतात .
१. फळझाडांची रोपवाटिका
२. भाजीपाल्याची रोपवाटिका
३. फुलझाडे व शोभेच्या वनस्पतींची रोपवाटिका
४. औषधी वनस्पतींची रोपवाटिका
५. वनशेती पिकांची रोपवाटिका
६. फक्त बी – बियाणे
७. फक्त रोपे
८. फक्त कलमे
९. खास – ( स्पेशल ) रोपवाटिका : उदा . फक्त आंबा , फक्त द्राक्षे इ .
१०. सर्वसामान्य ( जनरल ) रोपवाटिका
११. दुसरीकडून कलमे – रोपे आणून त्यांची फक्त विक्री करणे .
१२. मागणीप्रमाणे कलमे – रोपे पुरविणारी रोपवाटिका
रोपवाटीकेची सुरुवात व आखणीः
फळबाग व तत्सम विकासात रोपवाटीकेचा महत्त्वाचा वाटा असतो. यशस्वी रोपवाटिका उभारण्यासाठी त्याचे सुरुवातीपासूनच नीट नियोजन करावे लागते. रोपवाटीकेची सुरुवात करताना तिचे प्रकार व ठिकाण या महत्वाच्या गोष्टी आहेत. प्रथम रोपवाटिकेचा प्रकार निश्चित करावा. शासन मान्यताप्राप्त रोपवाटिका की खाजगी रोपवाटिका आणि कोणत्या प्रकारची कलमे / रोपे तयार करावयाची हे प्रथम ठरवावे. वरीलपैकी कोणती रोपवाटिका सुरू करायची किंवा प्रस्थापित करावयाची हे विचारपूर्वक ठरवावे. त्या भागातील भौगोलिक परिस्थिती, पीक पद्धती दळणवळणाच्या सोई, कच्चा माल, मजूर यासंबंधी माहिती घ्यावी. अगोदर अभ्यास करावा. सर्वे असणा-या रोपवाटिकेबद्दलही माहिती मिळवावी. व्यवसाय म्हणून रोपवाटिका सुरु करताना सर्व नियमाची तसचे अर्थशास्त्रांचीही अधिकाधिक माहिती मिळवावी.
शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादींची माहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.
मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!