जो मिश्र व एकत्रित केलेला आहार पशुंनी खाल्यानंतर त्याच्यामुळे त्यांच्या शरीराची झीज योग्य रितीने भरून येणे, त्यांची योग्य वाढ होणे, शरीर जास्तीत जास्त निरोगी राहणे, नियमित आणि वाढते उत्पादन मिळणे, वेळेवर गाभण राहणे व जास्त वयापर्यंत जगणे ह्या बाबी होतात त्याला संतुलित आहार म्हणतात.
संतुलित पशु आहार हा प्रत्येक प्राणी वर्गात वेगवेगळा असतो तो त्याच्या वयोमानाप्रमाणे त्याला द्यावा लागतो. एक पिशवी पोटापासून चार पिशवी पोटापर्यंतची पचनसंस्था ह्या पशूंमध्ये असते. प्रत्येकाची आहार पचविण्याची क्रिया निसर्गाने वेगवेगळी करून ठेवली आहे. त्यामुळे अर्थातच आहाराचे घटक वेगवेगळे असतात. संतुलित आहाराचा परिणाम हा त्या त्या पशु वर्गाच्या शरीरात असणार्या अनुवांशिक गुणांवर अवलंबून असतो. म्हणून ह्या अनुवांशिक गुणांचा उतमोत्तम फायदा करून घ्यायचा असेल तर उच्च प्रतीचा संतुलित आहार हा नियमित, योग्य वेळी, पाहिजे त्या प्रमाणात देणे हा पशुव्यवस्थापनातील प्रमुख भाग आहे.