वेस्ट डि कंपोजर
हे नॅशनल सेंटर ऑफ ऑरगॅनिक फार्मिंग, गाझियाबाद या संस्थेद्वारे संशोधित शेतीसाठी उपयुक्त बुरशी व जीवाणूंचे कल्चर (संवर्धित स्वरूप) आहे. गाईच्या शेणातील जिवाणू पासुन तयार केलेले हे कल्चर एका विशिष्ट माध्यमात जतन केले जाते. हे जीवाणू प्लास्टिक बाटल्यांमधे ३ वर्षांपर्यंत वापरण्यायोग्य अवस्थेत राहतात. यामध्ये पिकाच्या वाढीसाठी तसेच विविध अपायकारक बुरशी व विषाणूंपासून सुरक्षा प्रदान करणारे उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत. जमिनीच्या सुपिकतेसाठी, पिकाच्या वाढीसाठी व रक्षणासाठी याचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करता येतो. संस्थेद्वारा पुरविलेल्या प्लास्टिक बाटल्यांमधे उपलब्ध ५० ग्रॅम कल्चर पासून २०० लिटर द्रावण तयार करता येते. व या द्रावणापासुन पुन्हा लाखो लिटर द्रावण तयार करता येते. हे एकच द्रावण पिकास पोषण व रोगप्रतिकारक म्हणून वापरता येते. द्रावण तयार करण्याची पद्धत अगदी सोपी व कमी खर्चिक आहे.
ज्या शेतकऱ्यांना मजुरांची समस्या, पैशांची कमतरता अथवा इतर सुविधे अभावी जनावरे पाळणे शक्य नाही व त्यामुळे नैसर्गिक शेतीसाठी जनावरांचे शेण व मूत्र उपलब्ध नाही अशा शेतकऱ्यांसाठी हा अत्यंत उपयुक्त पर्याय आहे.
साहित्य :–
– वेस्ट डि कंपोजर
– २ किलो गुळ
– २०० लिटर क्षमतेचा प्लास्टिक ड्रम किंवा मातीचा रांजण (कोणत्याही धातूचा अजिबात नको)
– २०० लिटर पाणी (विहिरीचे, बोअरचे अथवा नळाचे यापैकी कुठलेही चालेल)
कसे बनवावे :–
ड्रममधे २०० लिटर पाणी टाकावे. त्यात वेस्ट डि कंपोजर बाटलीतील कल्चर व २ किलो गुळ टाकून लाकडी काठीने २ ते ५ मिनिट ढवळावे. यानंतर हे द्रावण स्वच्छ कापड अथवा बारदानाने झाकावे. स्थानिय वातावरण व तापमानानुसार हे द्रावण तयार होण्यास ५ ते ७ दिवसांचा अवधी जरूरी आहे. यादरम्यान दररोज दोनदा हे द्रावण लाकडी काठीने २ ते ५ मिनिट ढवळावे. द्रावण बनवताना ड्रम सावलीत किंवा उघड्यावर ठेवावे अशी कोणतीही अट नाही.
पहिल्या दिवशी द्रावणाचा रंग त्यातील गुळामुळे काहीसा तांबूस दिसेल. तीन दिवसानंतर हा रंग काहीसा दुधाळ दिसू लागेल. ५ व्या किंवा ७ व्या दिवशी द्रावणाचा रंग पूर्णपणे दुधाळ दिसू लागेल. याचा अर्थ कल्चरमधील जीवाणू व एंझाइम्स द्रावणात पूर्णपणे विकसीत झाले आहेत व द्रावण वापरण्यासाठी तयार आहे. हेच द्रावण विरजन म्हणून 20लिटर एका ड्रम मधे टाकून त्यात 200लिटर पाणी व 2किलो गुळ टाकुन वरील प्रमाणे 5-7दिवसात तयार करा. अशा प्रकारे लाखो लिटर द्रावण तयार करता येते.
-कसे वापरावे –
जमीनीमधे तयार झालेले २०० लिटर द्रावण १ एकरास ठिबकद्वारे अथवा पाटपाण्याने द्यावे. यामुळे जमीनीत सूक्ष्मजीवाणू व गांडूळांची वाढ होऊन जमिन सुपिक व भुसभुशित बनते. जमीनीतील सेंद्रीय पदार्थांचे अतीशीघ्र विघटन होऊन त्यांचे अन्नद्रव्यात रूपांतर होते. ही अन्नद्रव्ये पिकाच्या मुळांना सहजी ग्रहण करता येतात. परिणामी पिकांची वाढ जोमाने होते.
फवारणीसाठी
पिकांवर फवारणीसाठी १ लिटर पाण्यात ३०० मि.ली. या प्रमाणात वेस्ट डि कंपोजर द्रावण मिसळून दर ८ ते १५ दिवसांनी फवारल्यास हानीकरक बुरशी व कीड यांचा उपद्रव होत नाही. या प्रमाणानुसार फवारणीच्या १५ लिटर क्षमतेच्या पंपात ४ ते ४.५ लिटर द्रावण मिसळावे. आपल्या परीसरात होणाऱ्या प्रादुर्भावाच्या तीव्रतेनुसार फवारणीचा काळ आपण ठरवावा.
बीज प्रक्रियेसाठी
१ लिटर पाण्यात ३०० मिली. या प्रमाणात वेस्ट डि कंपोजर द्रावण मिसळून पेरणी आधी बियाण्यांवर शिंपडावे व अर्धा तास सावलीत वाळवून पेरणी अथवा टोकण करावी. रोप लावणी अगोदर त्याची मुळे या द्रावणात बुडवून लागण करावी. यामुळे बियाण्याचे व मुळांचे जमीनीतील हानीकारक विषाणू व बुरशी पासून बचाव होतो.
शेणखत कुजवण्यासाठी कंपोस्ट बनविण्यासाठी
अंदाजे १ टन शेणखताच्या ढिगावर केवळ २० लिटर वेस्ट डि कंपोजर द्रावण शिंपडावे. एक आठवड्यानंतर हा ढिग पलटावा व त्यावर पुन: २० लिटर द्रावण शिंपडावे असे दर आठवड्याला करत ४० दिवसात उत्तम प्रतीचे कुजलेले शेणखत तयार होते ज्यामधे उपयुक्त सूक्ष्म जीवाणूंची संख्या अधिक आहे. शेणाऐवजी आपल्याकडील जमा केलेला काडीकचरा किंवा धान्य मळणीनंतर निघालेला कोणत्याही पिकाचा भुसा यावरही अशीच प्रक्रिया करून उत्तम प्रकारचे कंपोस्ट खत तयार करता येते.
महत्वाचे :
एकदा तयार झालेया या द्रावणापासून आपण पुन: पुन: नवीन द्रावण तयार करू शकता. यासाठी तयार द्रावणातून पहील्यांदा २० लिटर द्रावण शिल्लक ठेवून त्यात २ किलो गुळ व १८० लिटर पाणी टाकून वरील प्रमाणेच कृती करावी. ५ ते ७ दिवसात तेवढ्याच उपयुक्ततेचे द्रावण तयार होईल. किंवा तयार झालेल्या द्रावणातून नवीन २०० लिटर क्षमतेच्या ५ ड्रम मधे प्रत्येकी २० लिटर द्रावण, २ किलो गुळ व १८० लिटर पाणी टाकून पुढील ५ ते ७ दिवसात आपणास १००० लिटर द्रावण तयार होऊ शकते. असे आपण वर्षानुवर्षे तयार करू शकता.
सुक्ष्म अन्नद्रव्ये खालील प्रमाणे तयार करा.
वेस्ट डि कंपोजर – सुक्ष्मअन्नद्रव्ये :
पिकास आपल्या वाढीदरम्यान मुख्य, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांची नितांत गरज भासते. यापैकी कुठल्याही घटकाची कमतरता झाल्यास पिकाच्या वाढीवर व परीणामत: उत्पादनावर परीणाम होतो. हे घटक पुरविण्यासाठी विक्रेते महगड्या निविष्ठांची व खतांची शिफारस करतात. आपल्या दैनंदीन वापराच्या अनेक साधनांद्वारे यातील बरेच घटक आपणाला पिकास उपलब्ध करून देता येतात. ही साधने अल्पखर्चिक असण्याबरोबर आपण स्वत: यापासून निविष्ठा तयार केल्यामुळे ही विश्वासार्ह देखील असतात. नॅशनल सेंटर ऑफ ऑरगॅनिक फार्मिंग, गाझियाबाद या संस्थेद्वारा संशोधित वेस्ट डि कंपोजरच्या सहाय्याने अशा सहज उपलब्ध साधनांपासून उत्तम प्रकारची अन्नद्रव्ये पिकास पुरविता येतात. वेस्ट डि कंपोजर हे उत्तम द्रावक असल्याने या साहित्यातील अन्नद्रव्ये व इतर हार्मोन्स अत्यंत प्रभावीरीत्या त्यात विरघळली जातात व फवारणी किंवा जमीनीच्या माध्यमातून पिकास तुलनेने लवकर प्राप्त होतात.
साहित्य
मका २ किलो
मोहरी २ किलो (किंवा मोहरीची पेंड)
तीळ २ किलो(काळा किंवा पांढरा)
सुर्यमुखी २ किलो
मूग २ किलो
तूर २ किलो
लोखंडी खिळे १० ते १२
तांब्याचे छोटे जुने भांडे अथवा तारा
जस्त (Zink) भस्म
वेस्ट डि कंपोजर द्रावण १०० लिटर
यापैकी मका, मूग आणि तूर यांचे दळून पीठ करून घ्यावे. मोहरी, तीळ आणि सूर्यमुखी यांना मिक्सरमधे अथवा जात्यावर बारीक भरडून घ्यावे.
दिलेल्या साहित्यांपैकी एखादे साहित्य कमी अधिक प्रमाणात असेल किंवा अगदीच नसेल तरी चालेल. आपल्या जवळ जे सहजी उपलब्ध असेल ते वापरावे.
कसे बनवावे ?
१०० लिटर वेस्ट डि कंपोजरच्या द्रावणात इतर साहित्य मिसळून लाकडी काठीने अथवा प्लास्टिकच्या दांड्याने हलवावे. हे मिश्रण सावलीच्या ठिकाणी स्वच्छ कापडाने झाकून १० दिवस ठेवावे. यादरम्यान दररोज किमान एकदा काठीच्या सहाय्याने द्रावण ढवळावे. या कालावधीत सर्व साहित्यांमधील अन्नद्रव्ये मिश्रणात विरघळतील. चार ते पाच दिवसातच अन्नद्रव्ये मिश्रणात विरघळण्यास सुरवात होते, परंतु उत्कृष्ट परीणामांसाठी दहा दिवस हा योग्य कालावधी आहे. पाण्यात मिसळल्यानंतर वापराआधी हे द्रावण गाळून घ्यावे ज्यामुळे ड्रिप अथवा पंपाची नोझल चोक होणार नाही.
कसे वापरावे ?
पंपाने फवारणी अथवा ठिबक द्वारे द्यायचे असल्यास पाणि मिसळल्या नंतर द्रावण स्वछ कापडाने अथवा चाळणीने गाळून घ्यावे. या द्रावणाचा वापर पिकावर दोन मुख्य अवस्थेत करणे जरूरी आहे. धान्य पिकात कणसे अथवा ओंब्या सुरू होताना तसेच दाणे पक्व होताना. फळझाडांमधे फुलधारणेच्या वेळी व फळधारणे नंतर. जवळपास सर्वच प्रकारच्या पिकांसाठी हे उपयुक्त आहे. गाळून उरलेला चोथा झाडांच्या खोडाजवळ अथवा जमीनीमधे पसरवून टाकावा.
पिकावर फवारणी व जमीनीतून अशा दोन्ही प्रकारे याचा वापर केला जाऊ शकतो. फवारणीच्या माध्यमातून दिलेली सर्वच अन्नद्रव्ये जमीनीतून दिल्याच्या तुलनेत लवकर लागू होतात.
फवारणीसाठी ५ लिटर द्रावण १०० लिटर पाण्यात मिसळून पिकावर फवारणी साठी वापरावे.
जमीनीतून देण्यासाठी १० लिटर द्रावण २०० लिटर पाण्यात मिसळून १ एकरास द्यावे. यात वापरलेली सर्वच साधने जैविक असल्यामुळे याचे फवारणी करणाऱ्याच्या आरोग्यावर कुठलेही विपरीत परीणाम नाहीत.
शोधकर्त्यांच्या निर्देशानुसार हे द्रावण बराच काळ टिकू शकते. वातावरणातील हवेबरोबर संपर्काने जैविक द्रावणात मूलभूत बदल होत असतात. कालांतराने द्रावण क्षीण होऊन तितकेसे प्रभावी राहत नाही. त्यामुळे अशा निविष्टा त्यांच्या वैध कालावधीत वापरून संपतील इतक्याच बनवाव्यात.
वापरल्या जाणाऱ्या साहित्यापासून कोणकोणती अन्नद्रव्ये प्राप्त होतात.
मका
फॉस्फरस, मॅग्नेशियम, मॅन्गेनीज, झिंक, लोह, सेलेनियम व अल्प प्रमाणात पोटॅशियम आणि कॅल्शियम कार्बोहाहड्रेट्स,
विटामिन B6
मोहरी
उत्तम स्त्रोत सेलेनियम फॉस्फरस, मॅग्नॅशियम, ताम्र, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, विटामिन B1
तीळ
उत्तम स्त्रोत मॅन्गेनीज, या व्यतिरीक्त कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नॅशियम, लोह, झिंक, मॉलेब्डिनम, विटामिन B1, सेलेनियम या व्यतिरीक्त विविध प्रोटीन्स
सूर्यमुखी
मॅन्गेनीज, सेलेनियम, फॉस्फरस, मॅग्नॅशियम, विटामिन E पोटॅशियम विटामिन मॅग्नॅशियम
मूग
प्रोटीन्स, विटामिन, मुबाक प्रमाणात मॅग्नॅशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम. अल्प प्रमाणात लोह, सोडियम, झिंक, तांबे, मॅन्गेनीज, सेलेनियम
तूर
कार्बोहाहड्रेट्स, लोह, कॅल्शियम व खनिजे. लोखंडी खिळ्यांपासून लोह व तांब्याच्या भांड्यापासून तांबे
good information sir