जिल्हाभरात 513 टँकरने पाणी पुरवठा
गंगापूर तालूक्यात सर्वाधिक 104 टँकर
औरंगाबाद / प्रतिनिधी
यंदा दुष्काळाची तीव्रता ही भर हिवाळ्यातच जाणवत असून दुष्काळाचा आलेख हा दिवसेंदिवस वाढताच दिसत आहे. जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांना टँकरवरच अवलंबून राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या जिल्ह्यातील टँकरची संख्या जवळपास 513 पर्यंत पोहचली असून 393 गावे 32 वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. त्यापैकी एकट्या गंगापूर तालूक्यात सर्वाधिक 104 टँकर सुरू आहेत.
गेल्या चार ते पाच वर्षांपासून वरूणराजा हुलकावणी देत आहे. यंदाही पावसाने दमदार हजेरी लावली, मात्र नंतर मोठी उघडीप दिली. यावर्षी औरंगाबाद जिल्ह्यात मोजून तीन ते चार वेळा पावसाचे आगमन झाले. अत्यल्प पावसामुळे शेतकरी राजाही मोठा गोत्यात आला. खरीप हंगामा बरोबर रब्बीचाही हंगाम वाया गेल्याने शेतकर्यांवर मोठे संकट कोसळले आहे. तर पाऊस नसल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमिवर सरकारने देखील संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पिकांसह जलस्तर खालवले असून नागरिकांना पाण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे. पावसाने दगा दिल्याने शेतकर्यांच्या हातची पिके गेली असून आता जनावरे जगवण्यासाठीचे मोठे आव्हान बळीराजासमोर उभे ठाकले आहे.
अशी भयावह परिस्थिती यंदा ऐन हिवाळ्यातच उभी राहिली आहे. दरम्यान जिल्ह्यातील 393 गावे आणि 32 वाड्यांना सध्या 513 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यासाठी 1 हजार 64 टँकरच्या खेपा मंजूर करण्यात आल्या असून 265 विहिरींचे शासनाने अधिग्रहण केले आहे. गंगापूर तालुक्याला दुष्काळाच्या सर्वात जास्त झळा बसत असून या तालूक्यात आज घडीला 104 टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. असे असले तरी सोयगाव तालुक्यात एकही टँकर सुरू नसल्याची माहिती मिळाली आहे.
जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये सुरू असलेले टँकर
तालुका टँकर संख्या
गंगापूर 104
पैठण 74
वैजापूर 74
औरंगाबाद 46
सिल्लोड 46
कन्नड 20
फुलंब्री 19
खुलताबाद 10