तीन हजार एकर शेतजमीन ओलिताखाली येणार

0

राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांची माहिती, कल्याणी नदीचे पुनर्जिवन
जालना/प्रतिनिधी
कल्याणी नदीच्या पुनर्जिवनामुळे पाणी साठवण क्षमता निर्माण होऊन जवळपास तीन हजार एकर शेतजमीन ओलिताखाली येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे राज्याचे पशुसंवर्धन दुग्धविकास, मस्त्यव्यवाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी केले.
जलयुक्‍त शिवार अभियानांतर्गत निरखेडा गावात असलेल्या कल्याण नदीच्या खोलीकरणाच्या कामाचा शुभारंभ राज्यमंत्री खोतकर यांच्या हस्ते दि. 18 जानेवारी रोजी करण्यात आला. त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे सभापती पांडूरंग डोंगरे, पंडीत भुतेकर, संतोष मोहिते, जिल्हा खादी ग्रामोद्योगचे अध्यक्ष भाऊसाहेब घुगे, हरीहर शिंदे, तहसीलदार बिपीन पाटील, सुखदिवे, कृष्णा सुराशे, रामेश्‍वर गोरे, रामेश्‍वर पुरी, अरूण डोंगरे, नरसिंग गोरे, विठ्ठल सोळंके, बंडु भुतेकर, नारायण गायकवाड, भागवत काळे, तुकाराम शेजुळ, मुरलीधर शेजुळ, शिवाजी शेजुळ, काशिनाथ जाधव, बापुराव जाधव, विष्णु गोरे, अंकुश जाधव, अरुण डोंगरे, मुरलीधर थेटे, गणेश गोरे, उप विभागीय अभियंता ए. पी. काटकर, शाखा अभियंता डी. पी. राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
राज्यमंत्री खोतकर म्हणाले की, कल्याणी नदीचे पुनर्जिवन करण्याची गावकर्‍यांची बर्‍याच दिवसांची मागणी होती. ती आज या निमित्ताने पूर्ण होत आहे. या नदीच्या पुनर्जिवनाचे काम यापूर्वीच होणे अपेक्षित होते परंतू काही अडचणींमुळे हे काम होऊ शकले नाही. हे काम व्हावे यासाठी आपण प्रशासनाकडे सातत्याने बैठका घेऊन काम मार्गी लावण्याच्या प्रशासनास सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कल्याणी नदीच्या पुनर्जिवनासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून अडीच कोटी रूपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. सिद्धीविनायकसारख्या ट्रस्टच्या माध्यमातूनही या कामासाठी अधिकचा निधी आणण्यासाठी आपण प्रयत्नशिल असल्याचे राज्यमंत्री खोतकर यांनी यावेळी सांगितले.
कल्याणी नदीच्या पुनर्जिवनामुळे मोठ्या प्रमाणात गाळाचा उपसा होणार आहे. हा गाळ शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असुन शेतकर्‍यांनी हा गाळ आपल्या शेतीमध्ये टाकावा जेणेकरुन उत्पादनात वाढ होण्यास मोठी मदत होणार असल्याचे सांगत कडवंची या गावाने उपलब्ध पाण्याचे काटेकोरपणे नियोजन करून द्राक्ष पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. या पिकातुन शेतकर्‍यांना चांगल्या प्रमाणात उत्पादन होत असल्याने या भागातील शेतकर्‍यांनीही द्राक्ष पीक लागवडीकडे वळण्याची गरज आहे. पाणी साठे निर्मितीवर भर देऊन प्रत्येक शेतकर्‍यांने पाण्याची बँक तयार करण्याची गरज असल्याचेही राज्यमंत्री खोतकर यांनी यावेळी सांगितले.
पशुपालनाविषयी जनजागृती व्हावी आणि पशुपालकांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी जालना येथे 2 ते 4 फेब्रुवारीला अखिल भारतीय स्तरावरील भव्य पशु- पक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे सर्व प्रकारच्या पशुधनाचा प्रदर्शनामध्ये सहभागी होणार आहे. जातिवंत घोड्या पासून ते सश्यापर्यंत सर्व पशुधन या प्रदर्शनात असणार आहेत. सुलतान, युवराज यासारख्या कोटी कोटी रुपये किंमतीच्या रेड्यांचा सहभाग हे विशेष आकर्षण असणार आहे. तसेच 20 ते 22 फेब्रुवारी दरम्यान जालना येथे भीम महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले असून या दोनही कार्यक्रमास नागरिकांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही राज्यमंत्री खोतकर यांनी यावेळी केले.
इंदेवाडी येथील 9 लाख रूपये किंमतीच्या सभामंडपाचे भूमिपूजनही राज्यमंत्री खोतकर यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूद्ध खोतकर यांनीही मनोगत व्यक्‍त केले. सूत्रसंचलन भगवान काळे यांनी केले तर आभार भरत जाधव यांनी मानले.
34 बंधार्‍यांची होणार निर्मिती
कल्याणी नदीवर 34 बंधार्‍यांची निर्मिती करण्यात येणार असून यासाठी जवळपास साडेअकरा कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहेत. कल्याणी नदीच्या पुनर्जिवनाचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणी साठवण क्षमता वाढुन परिसरातील तीन हजार एकरपेक्षा अधिक जमीन ओलिताखाली येण्यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पन्‍नात वाढ होण्याबरोबरच या भागातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्‍न सुटण्यास मोठ्या प्रमाणात मदत होणार असल्याचेही राज्यमंत्री खोतकर यांनी यावेळी सांगितले.

 

 

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

Leave A Reply

Your email address will not be published.