पावसाळ्यामध्ये पाऊस न झाल्याने आता उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत असल्याने महाराष्ट्रासमोर पाणीटंचाईचे घोर संकट उभे राहिले आहे. पावसाळ्याच्या पहिल्या महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे खरिपाच्या पेरण्या तरी झाल्या. त्यानंतर जुलैतही सरासरीच्या जवळपास पाऊस पडला. तोपर्यंत स्थिती चांगली होती. परंतु ऑगस्टमध्ये पाऊस खूप कमी प्रमाणात झाला. त्यात अजून सप्टेंबर महिन्यामध्ये तर पाऊस ५१ टक्केच झाला. त्याचा परिणाम खरिपावर झाला. मग रब्बीच्या पेरण्याही तुरळक झाल्या. तसेच ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाचा जोर जास्त असतो. त्यामुळे धरणे भरली जातात. याच दोन महिन्यांत पावसाने ओढ दिल्यामुळे धरणे भरली नाहीत. राज्यातील पावसाळा १५ ऑक्टोबरला संपतो, असे मानतात.