दुष्काळात फुलवली खडकाळ जमीनीवर द्राक्षांची बाग

0

पाचोडः
कडेठाण ता. पैठण येथील तरुण शेतकरी बद्रीनाथ प्रल्हादराव तवार यांनी नोकरीच्या मागे न लागता पारंपरिक शेतीपद्धतीने व आधुनिक पद्धतीने शेती व्यवसाय करण्याचे नियोजन केले. त्यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. त्यांनी दुष्काळातही इतर शेतकर्‍यांना प्रेरणादायी शेती कसली आहे. योग्य पाण्याचे नियोजन करून ठिबकचा उपयोग करून भर दुष्काळातही टँकरने विकत पाणी घेऊन त्यांनी खडकाळ जमिनीवर द्राक्षांची बाग फुलवली आहे.
बद्री तवार यांचे एकत्रित कुटुंब आहे. त्यांना तीस एकर जमीन आहे. त्यांचे मोठे बंधू कृष्णा तवार हे विविध व्यवसाय सांभाळून उरलेल्या वेळेत त्यांना शेतीकामात मदत करतात. त्यांनी दीड एकरमध्ये द्राक्षांची बाग लावली आहे.
तसेच उरलेल्या क्षेत्रात तूर, ज्वारी, बाजरी, कापूस इत्यादी पिके घेतली आहेत. त्यांच्याकडे सध्या तीन विहिरी आहेत. स्वतः शेततळे खोदून 34 बाय 34 करून त्यामध्ये पाणी साठवण्यासाठी पणी शासनाने दिली आहे. पण सध्या या भागात भयंकर दुष्काळ परिस्थिती असल्यामुळे या भागातील नदी नाले, तळी व पाण्याचे सर्व स्रोत कोरडेठाक पडले आहेत. अशा परिस्थितीत ते सातशे रुपये टँकरप्रमाणे पाणी विकत घेऊन द्राक्ष बाग जगवत आहेत. अशा परिस्थितीही त्यांनी मेहनतीने व अथक प्रयत्नातून हलक्या स्वरूपाच्या मुरमाड जमिनीत दीड एकरमध्ये सुपर सोनाका या जातीचे 600 कलमे व माणिक चमन या जातीचे 695 कलमे दोन वर्षापूर्वी लावली आहेत. त्यांची लागवड त्यांनी 9 बाय 4 वर केली आहे.
त्यांनी प्रत्येक झाडाला 5 किलो शेणखत दिले आहे. तसेच दीड किलो रासायनिक भेसळ खत दिले आहे. झाडाच्या मुळापाशी पाणी दिल्यानंतर जमिनीत ओलावा टिकून राहावा, यासाठी त्यांनी 7 ट्रॅक्टर उसाचे पाचटची मलचिंग केली आहे. बागेसाठीची कलमे त्यांनी बदनापूर तालुक्यातून कडवंची येथील शेतकरी कैलास क्षीरसागर यांच्याकडून आणली आहेत. आता प्रती झाडाला अंदाजे 15 ते 20 किलो माल लागला आहे.
फेब्रुवारी महिन्यात द्राक्षांची तोड चालू होणार असून त्याची विक्री आम्ही नाशिक येथे करतो. त्यांनी अंदाजे 200 ते 250 क्‍विंटल माल होईल, असे शेतकरी बद्री तवार यांनी सांगितले.

चांगला भाव मिळाला तर 5 ते 7 लाख रुपये हाती येतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांना आतापर्यंत कलमे, खते, छाटणी फवारणी मशागत इत्यादीचा खर्च 2 लाखांपर्यंत गेला आहे. टँकरने पाणी देण्याचा खर्च आतापर्यंत दीड लाखापर्यंत गेला आहे. त्यांना शेतीत काम करण्यासाठी बद्री यांची पत्नी दीपाली तवार व कृष्णा यांची पत्नी स्वाती तवार या दोघी मोलाचे सहकार्य केले आहे. द्राक्षबाग व्यवस्थापन करण्यासाठी मोलाचे सहकार्य करत आहेत.
पाण्याचे योग्य नियोजन, पिकाची सूक्ष्म निरीक्षण, किडरोग नियंत्रणासाठी तात्काळ उपयोजना, योग्यवेळी खते फवारणी, वातावरणात होणारे बदल याबद्दल दक्ष राहिल्यास शेती चांगली पिकते, असे त्यांनी सांगितले. या परिसरात एकच द्राक्षाचा बाग आहे. त्यांनी कठोर मेहनत व जिद्द या जोरावर खडकाळ जमिनीतही ही बाग यशस्वी करून दाखवली आहे. उत्तम व्यवस्थापनाद्वारे शेती यशस्वी करून त्यांनी इतर शेतकर्‍यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

चौकट
सद्याच्या दुष्काळाच्या परिस्थितीत शासनाने बाग जगविण्यासाठी तात्काळ शेतकर्‍यांना मदत करावी, अशी अपेक्षा बद्री तवार यांनी व्यक्त केली आहे.

 

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

Leave A Reply

Your email address will not be published.