दुष्काळामुळे अर्थकारण कोलमडले
धामणगाव / प्रतिनिधी
आष्टी तालुक्यात सरासरिच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झाला. त्यामुळे दोन्ही हंगामातील पिके धोक्यात आली असून जनावरांच्या चार्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. हाताला काम नाही पिण्यासाठी पाणी नाही अशा अस्मानी संकटामुळे एरव्ही माणसांनी गजबजलेली गावे आता ओस पडू लागली आहेत. ग्रामीण भागाचे अर्थकारणच बिघडल्याचे विदारक चित्र तालुक्यात सर्वत्र दिसत आहे.
तालुक्यात दिड लाखांच्या वर पशुधन आहे. मराठवाड्यात दुग्ध व्यवसायात तालुका अव्वल स्थानावर आहे. मात्र, गंभीर दुष्काळामुळे पशुधन मालकांसमोर पशुधन कसे जगवायचे हा प्रश्न पडला आहे. नगर, कडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतून तीन हजार रुपये टनाप्रमाणे पैसे देऊन ऊस विकत घ्यावा लागत आहे. तर धामणगाव, घाटा पिंपरी, देवळाली, लोखंडवाडी व इतर गावातील अनेक लोक फक्त उसाचे वाहाडे मिळविण्यासाठी ऊस तोडणी मजूर म्हणून काम करीत आहेत. गांव टोळीच्या माध्यमातून तालुक्यातील ज्या ठिकाणी ऊस आहे तेथे जाऊन ऊसतोडणीचे काम करुन महागडे पशुधन वाचविण्याची पशु पालकांची धडपड चालू आहे. दुसरीकडे प्रशासन मात्र, एक महिना पुरेल इतका चारा शिल्लक असल्याचे भासवून जखमेवर मीठ चोळत आहे. जनावरांच्या चार्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे . यावर्षी पाण्याचा मोठे दुर्भिक्ष्य जाणवत असून माणसांबरोबर जनावरांना देखिल टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे. स्थलांतर रोखण्यासाठी गावामध्ये रोहयो योजनेतंर्गत तातडीने कामे सुरू करणे आवश्यक आहे. गावातील अनेकजण स्थलांतर करू लागले असून गावे ओस पडू लागली आहेत.
सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल