ऊस पाचटाचा वापर करून गांडूळ खत कसे तयार करावे?

1

गांडूळ खताच्या निर्मितीसाठी उत्तम निचरा होणारी जमीन योग्य असते. त्यामुळे तश्या प्रकारच्या जमिनीची निवड करवी. शक्यतो मोठी झाडे नसावीत. गांडूळ खत निर्मितीसाठी खड्ड्यावर दिवसभर सावली राहील याची काळजी घ्यावी. त्याकरिता बांबू, लाकडे, उसाच्या पाचटाचा वापर करून छप्पर तयार करावे.

छप्पर  मधील उंची ६.५ फूट, बाजूची उंची पाच फूट व रुंदी दहा फूट असावी;  परंतु छपराचे वरील आवरण दोन्ही बाजूस एक-एक फूट बाहेर असावे म्हणजे  छपराची बाहेरील रुंदी १२ फूट असावी. छपराची लांबी आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या उसाच्या पाचटानुसार कमी-जास्त होऊ शकते.
अशा छपरामध्ये मध्यापासून एक-एक फूट दोन्ही बाजूस जागा सोडून साडेतीन फूट रुंदीचे व एक फूट उंचीचे दोन समांतर वाफे वीट बांधकाम करून तयार करावेत. आतील बाजूने प्लास्टर करावे, तसेच तळाच्या बाजूस कोबा करून घ्यावा. जादा झालेले पाणी जाण्यासाठी तळाशी पाइप टाकावा.

वाफे करण्यासाठी दुसरी पद्धत म्हणजे वाफे जमिनीच्या वर बांधण्याऐवजी आठ-नऊ इंच खोलीचे दोन समांतर चर काढावेत, खड्ड्यातील माती चांगली टणक करावी.


छपरामध्ये खोदलेल्या चरामध्ये किवा वीट बांधकाम केलेल्या टाकीमध्ये उसाचे पाचट भरावे, त्याची उंची जमिनीपासून किंवा वीट बांधकामापासून २० ते ३० सें.मी. ठेवावी. पाचट भरताना एक टन पाचटासाठी युरिया आठ किलो, सिंगल सुपर फॉस्फेट दहा किलो, पाचट कुजविणारे जिवाणू एक किलो आणि ताजे शेणखत १०० किलो वापरावे. या सर्वांचे पाण्यात मिश्रण करावे. पाचटाचा पाच ते दहा सें.मी. थर दिल्यानंतर त्यावर शेणखत, युरिया व सुपर फॉस्फेटच्या द्रावणाचा पातळ थर द्यावा. याचबरोबर पाचट कुजविण्याची क्रिया लवकर होण्यासाठी पाचट कुजविणारे संवर्धन एक टनास एक किलो या प्रमाणात समप्रमाणात प्रत्येक थरावर वापरावे. अशा पद्धतीने खड्डा वाफा भरल्यानंतर त्यावर पुरेसे पाणी मारावे. पाण्याने भिजवून घेतलेल्या पोत्याने झाकावे, दररोज त्यावर पाणी मारण्याची काळजी घ्यावी.

एक महिना पाणी मारल्यानंतर पाचट अर्धवट कुजलेले दिसेल, शिवाय उष्णता कमी झाल्याचे आढळून येईल. असे अर्धवट कुजलेल्या एक टन पाचटावर पुरेशी गांडुळे सोडावीत. गांडूळ सोडल्यानंतर सर्वसाधारणपणे अडीच ते तीन महिन्यांनी पाचटापासून उत्तम प्रतीचे गांडूळ खत तयार होते.

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

1 Comment
  1. […] ऊस पाचटाचा वापर करून गांडूळ खत कसे तया… […]

Leave A Reply

Your email address will not be published.