हंगाम नसताना भाजीपाला पिकवणे

0

या प्रकरणात आपण हंगाम नसताना (बेमोसमी) भाजीपाला पिकवता येतो का? याचा विचार करणार आहोत. तसेच भाजीपाल्याच्या रोपट्यात असणारी सहनशीलता विचारा घेणार आहोत. परीक्षणासाठी व बी-बियाणे मिळविण्यासाठी कृषी महाविद्यालयाच्या बागांतून भाजीपाला पिकवला जातो. त्यासाठी कोणती उपाययोजना असते वा अशा बेमोसमी भाजीपाल्यासाठी वातावरण निर्मिती याचाही विचार करू.

बेमोसमी भाजीपाला ः
बेमोसमी म्हणजेच हंगाम नसताना भाजीपाला पिकवणे हे कार्य सोपे-सरळ नाही, कष्टसाध्य मात्र आहे. यासाठी सावध, सतर्क राहावे लागते.
हंगाम असताना कोणीही थोड्या श्रमात भाजीपाला पिकवू शकतो. पण हंगाम नसताना भाजीपाला पिकवणार्‍यास तज्ज्ञच व्हावे लागते. आवड असेल व कष्ट घेयाची तयारी असेल तर हे कार्यसुद्धा सहज सोपे वाटेल. जोखीम घ्यायची तयारी असणारेच अशक्यप्राय गोष्टी करून दाखवतात व इतरांना मार्गदर्शन करतात. आदर्श कृषिरत्न म्हणून त्यांची वाहवा होते.

बेमोसमी भाजीपाला पिकवताना ः
1. हरितगृह (ग्रीन हाऊस) उभे करावे लागते.
2. हरितगृहात कृत्रिमरित्या वातावरण तयार करून उत्पादन घेतात.
3. काही जण तळघरात भाजीचे उत्पादन घेतात.
4. तात्पुरते शेड उभारून त्यात उत्पादनयोग्य हवामान तयार करतात.
उपलब्ध साधने, आवड, आर्थिक क्षमता यावर हे कार्य यशस्वी करता येते. आवड असली की मार्ग निघतो.

महत्त्वाच्या बाबी ः
अ) हंगाम नसताना भाजीपाला पिकवणे महाग पडते व कठीण बाब वाटते. शौक म्हणून बेमोसमी भाजीपाला पिकवणारेही अनेकजण आहेत, पण यात आर्थिक लाभ कमी होतो, कारण योग्य अशी बाजारपेठ व बाजारभाव मिळत नाही. त्यात भाजीपाल्याचा व्यवसाय नासका मानला जातो. साठवणुकीचा योग्य प्रबंध नसेल तर मिळेल त्या भावात भाजीपाला विकावा लागतो. भारतीय शेतकर्‍यांचे हे दुर्दैव आहे. ग्राहक जास्त भत्तव (किंमत) देत नाहीत. दलाल आधी आपला फायदा पाहतात. हंगाम नसताना पिकवलेल्या भाजीपाल्यास हातोहात गिर्‍हाईक मिळतील व विक्री होईल हा बर्‍याचदा भ्रम ठरतो.
ब) जो भाजीपाला बेमोसमी पिकवला त्याला बाजारपेठेत मोठी मागणी असेल तर मात्र चांगला आर्थिक लाभ घडेल. पण हे निश्‍चित नाही.
क) भारतात भाजीपाला टिकवण्यासाठी योग्य अशी शासनाची शीतगृहे नाहीत. उत्पादकाला स्वतःलाच ही व्यवस्था करावी लागते. अशी व्यवस्था नसेल तर मिळेल त्या भावात विक्री करावी लागते.
ड ) सामान्य ग्राहक स्वस्तातला हंगामी भाजीपाला खरेदी करतअसतो. त्यामुळे बेमोसमी भाजीपाला पिकवणे हा शौक (आवड) ठरतो.
इ) बेमोसमी भाजीपाला पिकवणे महाग पडते तरी हा अतिविशिष्ट उद्योग आहे, याचा अनुभव घेण्याआधी पूर्ण विचार करावा.
बेमोसमी शेती कोठे होते?
बेमोसमी भाजीपाला सर्वचजण पिकवू शकत नाहीत. तसेच सर्वच ठिकाणी असा प्रयोग यशस्वी होईल असेही नाही. त्यामुळे सीमित क्षेत्रात निवडक भाजीपालाच पिकवता येतो असा अनुभव बेमोसमी भाजीपाला पिकवणार्‍यांना येतो.
1. जागरुक हौशी शेतकरी मैदानी भागात राहून पॉली हाऊस उभे करतात. ते तिथे काकडी, टोमॅटो यासारख्या फळभाज्यांचे उत्पादन घेतात. या फळभाज्यांना हमखास गिर्‍हाईक मिळते व पैसा वसूल होतो. काहींना अधिक लाभ मिळतो. यासाठी स्वतः कष्ट करावे लागतात.
2. डोंगरी क्षेत्रात बेमोसमी भाजीपाला पिकवणारे अधिक प्रमाणात आहेत. याबाबतीत उत्तर प्रदेशातील शेतकरी आघाडीवर आहेत. ते मटार, वांगी, वालपापडी, बटाटे पिकवण्यास यशस्वी झाले आहेत. मात्र सर्वचजण असे डोंगरात जाऊन कष्ट घेण्यास तयार नाहीत. जे कष्ट घेतात ते आर्थिक लाभ कमावतात.
3. खरीप हंगामात भारतात काही ठिकाणी एन-53 तसेच अ‍ॅग्रीफाउंड तांबडा कांदा पिकवणे शक्य झाले आहे. शेतकरी आता प्रयोगशील झाले असून आर्थिक लाभ मिळवत आहेत.
4. हंगाम नसताना मुळा पिकवण्यातही यश मिळाले आहे. चेतकी नावाच्या मुळ्याचे उत्पादन घेतले जात आहे.
5. काही ठिकाणी पूसा शीतल ही टोमॅटोची जात लावून त्याचे थंडीच्या दिवसात उत्पादन घेतले जात आहे.
6. नदीच्या काठी थंडीच्या दिवसात बिगर मोसमी भाजीपाला पिकवला जात आहे. याकरिता जैविक खत वापरतात. उन्हाळ्यात पिकणारी भाजी या प्रकारे आता थंडीच्या दिवसात काही ठिकाणी नदीकाठी पिकवली जात आहे.
7. ऋतूच्या आधीच पीक हाती यावे म्हणून केलेले प्रयोग यशस्वी होत आहेत. वांगी व टोमॅटोसारख्या फळभाज्यांची बियाणी छोट्या, पण सुरक्षित ठिकाणी रोपून त्यांची जोपासना केली जात आहे. त्यामुळे घरातील रोजची गरज भागते.
रोपट्यांना सहनशील बनविण्यासाठी ः
हंगाम नसताना भाजीपाला पिकवून यशस्वी बागमालक व्हायचे असेल तर, रोपट्यांना ऋतूविरोधात तग धरण्याची शक्‍ती प्रदान करणे हे आपल्या हातात असते. त्यासाठी इच्छाशक्‍ती व कष्ट करण्याची तयारी लागते.
रोपट्याला सहनशील बनविण्यासाठी काही उपचार व क्रियांद्वारे भाजीपाल्याच्या रोपट्याच्या पेशींना सुदृढ व मजबूत बनवावे लागते. त्यामुळे अशी रोपटी प्रतिकूल परिस्थितीशी झगडतात व टिकून राहतात. प्रतिकूल परिस्थिती म्हणजे कडक उन्हे, थंडीतील गारठा वा शीत लहर, उन्हाच्या झळा वगैरे.
1. वृद्धी थांबवण्याचा कोणताही उपचार रोपट्याला सहनशील बनवणारा असतो.
2. हंगाम नसताना भाजीपाला पिकवणे म्हणजे रोपट्यांना प्रतिकूल परिस्थितीत तग धरायला लावणे. अशा तग धरलेल्या रोपट्यांकडून उत्पादन मिळवणे हे एक तंत्र आहे. पण हे तंत्र कष्टसाध्य आहे.
3. सहनशील झालेल्या रोपट्याचा रंग गडद हिरवा होतो.
4. काही रोपटी गडद हिरवी न होता जांभळट लाल रंगाची होतात.
5. जोपर्यंत रोपटे सुकत/वाळत नाही तोपर्यंत कमीतकमी जलसिंचन करत राहावे वत्याला खुल्या वातावरणात ठेवून सहनशील करता येते.
6. रोपट्यांना सहनशील बनविल्याशिवाय बेमोसमी भाजीपाला मिळवता येत नाही हे लक्षात ठेवावे.
7. तापमान कमी झाल्यास रोपट्यांचा वृद्धिदर घटतो आणि हाच प्रकार रोपट्यांना सहनशील बनविणारा असतो.

सावधानता ः
हंगाम नसताना भाजीपाला मिळविण्यासाठी रोपट्यांना सहनशील बनवणे आवश्यक असते. याबद्दल काही सावधानता घ्यावी लागते ती पुढील प्रमाणे ः-
अ) भारतातील हवामानाचा विचार करता, कोठे उन्हाळा तर कोठे पाऊस पडत असतो. कुठे थंडी तर कोठे दाट दुके असते. अशा बेमोसमी हंगामात इच्छित भाजीपाला पिकवताना बागायत करणारे आळ्यातील माती हळूहळू कोरडी करतात/सुकवतात. या क्रियेमुळे रोपटी सहनशील होऊ लागतात. ही सोपी व व्यवहारिक बाब आहे.
ब) आणखी एक बाब म्हणजे रोपट्याला कमी तापमानात उघड्यावर ठेवून त्याला थंड ठेवणे कठीण असते, तसे करू नये.
क) प्रत्येक रोपट्याला ठराविकच मापदंड लागू पडेल असे नाही. सहनशीलता येण्यासाठी प्रत्येक रोपट्याचा अवधी वेगळा व जातीनुसार सहनशीलता धारण करण्याची क्षमता वेगवेगळी असू शकते. रोपट्याचे प्रतिरोपण करताना रोपटे जगविण्यासाठी व त्याचा धीमा वृद्धिदर साधण्यासाठी दक्ष राहावे लागते.
ड ) कोबी, फ्लॉवर यासारख्या भत्तज्या कमी तापमान सहन करूशकतात, त्यामुळे यांना अधिक प्रमाणात सहनशील बनवता येते.
इ) टरबूज, मिरची, वांगी, टोमॅटो यांना अधिक सहनशील (सहिष्णू) बनवता येत नाही.
फ) ज्या दिवसात उष्ण वारे वाहत असतात तेव्हा भाजीपाला पिकवणार्‍यांना अधिक सावध राहावे लागते. या उष्ण वार्‍यात नरम व कडक दोन्ही प्रकारच्यारोपट्यांना अधिक सहनशील बनवण्याची क्षमता असते.
ह) उन्हाळ्यात वा उन्हाच्या झळांत रोपट्यांना सहनशील बनवणे जुरुरीचे असते, कारण ते उष्ण वारा (हवा) आणि कडक उन्हे यामुळे तापलेल्या मातीत तग धरू शकततील.
ग) हिवाळ्यात रोपट्यांना सहनशील बनवण्याचा उद्देश म्हणजे ती रोपटी थंडी, धुके यांचा सामना सहज करू शकतील.
श) पालेभाजी म्हणजे निव्वळ पानांची भाजी, भाजीपाला म्हणजे फळभाजी, फूलभाजी व भाजीचे सर्व प्रकार असा एकत्रित अर्थ घ्यावा.
थोडक्यात महत्त्वाचे ः
रोपटी मंदगतीने वाढत असतील तर ते चांगलेच म्हणावे. म्हणजेच रोपांची वृद्धी एकदम थांबणार नाही. मंदगतीने वाढणारी रोपटी मरत नाहीत. रोपटी एकदम सहनशील होऊ नयेत. ही क्रिया हळूहळू झाली पाहिजे. म्हणजेच कमी अवधीत त्यांना सहनशील बनवण्याची घाई करू नये.

रोपट्यांवर सहनशीलतेचा प्रभाव ः
1. जे रोपटे सहनशील होते, त्याच्या वाढीचे प्रमाण घटते.
2. सहनशीलतेमुळे रोपट्यात शुष्कता व साखरेचे प्रमाण वाढते. तसेच रोपट्याच्या पानातील जलाचे बाष्पीभवन मंदावते.
3. भाजीपाल्याच्या रोपट्यात कोलाइडाचे प्रमाण वाढू लागते. यामुळे पाणी अडवण्याचा प्रतिरोध निर्माण होऊ लागतो.
4. प्रतिकूल परिस्थितीत भाजीपाल्याची रोपटी सहनशील होऊन मंद गतीने वाढत राहतात. परंतु त्याच्यातील रसदारपणा कमी होतो व ते कठीण, कडक होतात.
5. सहनशील झालेल्या रोपट्यांपासून सुरुवातीच्या काही दिवसांत उत्पादन कमी मिळते. नंतर त्यात वृद्धी होऊ लागते.
6. बेमोसमी कोबी पिकवत असताना, त्याची वाढ धीमी होते, तसेच त्यातील अ‍ॅमिनो अ‍ॅसिडचे प्रमाण वाढत राहते.
7. प्रतिकूल परिस्थितीत सहनशील झालेल्या रोपट्यांची पाने अपेक्षेपेक्षा लहान व गडद हिरव्या रंगाची होतात.
8. सहनशील झालेल्या रोपट्याचे खोड, फांद्या व पानांच्या शिरा यांना गुलाबी झाक येऊ लागते. कारण त्यात शर्करेचे प्रमाण वाढलेले असते.
निष्कर्ष ः बिगर हंगामी भाजीपाला मिळवायचा असेल तर रोपट्यांना योग्य प्रमाणात सहनशील (सहिष्णू) करण्याचे तंत्र साध्य झाले पाहिजे. हे तंत्र यशस्वीपणे राबवून आपण बेमोसमी भाजीपाला उत्पादक होऊ शकतो.

भाजीपाल्याची साठवणूक व देखभाल ः
काही वेळा किंवा नेहमीच काही भाजीपाला उत्पादकांना मालाची साठवणूक व देखभालीसाठी गोडाऊन (वखार), मोठा फ्रीज अशा साधनांची गरज पडते. त्यामुळे भाजीपाला बराच काळ संरक्षित राहू शकतो. परंतु प्रत्येक भाजी उत्पादकाला हे शक्य होत नसते.
पूर्वी कधी भाजीपाल्याची साठवणूक व संरक्षण हा विषय कोणी ध्यानातच घेत नव्हता. परदेशातून सुधारित बियाणी-औशधे वगैरे येऊ लागली, तसेच साठवणुकीचे तंत्रज्ञानही भारतात आले आणि आधुनिक शेतीचा विचारही होऊ लागला. पुढे ही बाब काळाची गरज झाली. परदेशात रासायनिक खतांवर पिकवलेली भाजी व अतिप्रमाणात कीडनाशक औषध फवारणी केलेली फळे, भाजीपाला यांची मागणी घटली कारण कीडनाशक औषध-रसायनांचा दुष्परिणाम मानवाच्या प्रकृतीवर होऊ लागला. प्रकृतीत विकृती-विकार निर्माण होऊ लागले. त्यामुळे नैसर्गिक खतांवर पिकवलेल्या भाजीपाल्याची व फळांची मागणी वाढू लागली. त्यातही स्पर्धा निर्माण झाल्यामुळे भारतातला शेतकरी खर्‍या अर्थाने डोहस झाला व कमी जागेत सुधारित पद्धतीने अधिकाधिक उत्पादन घेऊ लागला आणि जागतिक स्पर्धेतही उतरला. यातूनच बिगर हंगामी/ बेमोसमी भाजीपाला पिकवण्याचे प्रयोग होऊ लागले. परदेशातसुद्धा असे प्रयोग होऊ लागले व त्यात त्यांना यश मिळाले आहे.
शहरांतून कारखानदारी वाढते आहे. उद्योगांची क्षेत्रे विस्तारत आहेत. वेगवेगळ्या प्रांतातील मजूर व प्रशिक्षित वर्ग शहरात गर्दी करू लागले आहेत. त्यामुळे भाजीपाल्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.

भारतात भाजीपाल्याची साठवणूक व संरक्षण ः
आगामी काळात अनेक प्रकारांचा/जातींचा भाजीपाला साठवणूक व संरक्षण या बाबीत उतरणार आहे. तसेच बिगर हंगामी भाजीपाल्याचे उत्पादनही वाढवले जाणार आहे. सध्या फार थोड्या प्रकारच्या भाज्या संरक्षित करून साठवणुकीने बाजारात आणल्या जात आहेत.
1. आज भारतात चांगल्या जातीचे मटार पिकवून संरक्षित केले जातात व त्यांची साठवणूक केली जात आहे. त्यातून चांगला आर्थिक लाभ होतो. मटाराचे दाणे गोठवून त्यांची बाजारपेठेतव मॉलमध्ये विक्री केली जात आहे. हंगाम नसताना ताजे मटार मिळतात याचे अप्रूप ग्राहकालाही असते.
2. पूसा जातीचे पांढरे कांदेही साठवणूक व संरक्षण तंत्रज्ञानाने बाजारात केव्हाही उपलब्ध केले जात आहेत.
3. पूसा गौरव टोमॅटोही हवाबंद प्रकारात डब्यातून बाजारात उपलब्ध केले जात आहेत. याचीही मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने शेतकरी व व्यापारी चांगला नफा मिळवत आहेत.
आता शेतकरी आणि व्यापारी सुद्धा भाजीपलायाची साठवणूक व संरक्षण याबद्दल जागरुक झाले आहेत. उत्पादनाला योग्य किंमत मिळेपर्यंत यामुळे अवधी मिळतो व नफा कमावता येतो.

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

Leave A Reply

Your email address will not be published.