कोबी जातीच्या भाज्या

0

कृषी वैज्ञानिक म्हणतात की, सर्व प्रकाराच्या कोबी वर्गीय भाज्या कोलवर्ट नावाच्या पाणकोणीपासून विकसित झाल्या आहेत. कोलवर्ट हे जंगली रोपए होते. पूर्वीच्या काळी ते शिजवून खाण्याची प्रथा होती. प्रांत, प्रदेश, हवामानानुसार यात बदल होत गेला. आज कोबी- फ्लॉवर सर्वत्र पिकवले व शिजवून खाल्‍ले जातात. कोबी सर्वात जास्त लोकप्रिय आहे या कोबीचे तीन प्रकार आहेत. फ्लॉवर, पानकोबी, गाठकोबी.
फ्लॉवर
भारतातच नव्हे तर जगात सर्वत्र फ्लॉवर पिकवला जातो. फ्लॉवर आबालवृद्धांना प्रिय आहे. फ्लॉवर सहज पचतो. फ्लॉवरची भाजी, कोशिंबीर, सूप, लोणचे व भजी आवडीने खातात. फ्लॉवर नुसता शिजवून जसा खातात तसाच गाजर, बटाटा, मटार, शेंगभाज्या यासह एकत्र शिजवूनही खातात. याचे पराठे उत्तर भारतात विशेष प्रिय आहेत.
फ्लॉवरमध्ये बी जीवनसत्त्व व प्रथिने असतात, जे आपल्या प्रकृतीला पोषक आहेत. काही प्रदेशात फ्लॉवर वाळवून साठवले जातात व याचा हंगाम नसताना खाण्यासाठी वापरले जातात. फ्लॉवर जास्त सेवन केल्यास पोटात वायू धकरतो. फ्लॉवर वातूळ आहे. हिवाळ्यात याचा हंगाम असल्याने भाजी विक्रत्यांकडे फ्लॉवर विक्रीला असतो.
फ्लॉवरसाठी जमीन
फ्लॉवर कसल्याही प्रकारच्या शेत जमिनीत पिकवला जातो. पठारी प्रदेशात याचे जास्त उत्पन्न घेतात. डोंगरी प्रदेशात कमी-जास्त प्रमाणात फ्लॉवर पिकवला जातो. माती रेताड, भुसभुशीत, ओलसर असावी व त्यात चुन्याचे प्रमाण किंचित जास्त असावे.
जल/वायू
पठारी प्रदेशात जेथे हवामान थंड असेल तेथे फ्लॉवरची उगवण चांगली होते. फ्लॉवरला उष्ण हवामान सहन होत नाही. उत्पन्न कमी मिळते.
पेरणी केव्हा करावी?
काही ठिकाणी वर्षातून तीन वेळा फ्लॉवरचे पीक घेतले जाते. पहिली पेरणी मे महिन्याच्या मध्यापासून ते जून अखेरपर्यंत करतात. दुसरी पेरणी ऑगस्ट ते सप्टेंबर आणि मध्यावधी पेरणी जुलै ते ऑगस्टमध्ये केली जाते.
उष्ण प्रदेशात पेरणी
उष्ण प्रदेशात सप्टेंगबर-ऑक्टोबर, डिसेंबर-जानेवारी किंवा जानेवारी- फेब्रुवारी दरम्यान पेरणी केली जाते. अर्थात जलसिंचनही अधिक करावे लागते.
पेरणी कशी करावी ?
1) पेरणीसाठी शेत/परसबाग तयार करा, गवत काढा.
2) माती नांगरून-खोदून घ्यावी. मातीत खत टाकून एकजीव करावे.
3) बिया टाकून वरून माती झाकावी. जलसिंचन करावे. वाट पहा. बी अंकुरेल व रोपटी तयार होतील.
4) रोपटी वाढू द्यावीत. रोपटी जिथे प्रतिरोपित करायची आहेत, तिथे शेणखत, पालापाचोळ्याचे, कुजलेले खत टाकून शेत लागवडीसाठी तयार करावे. जलसिंचन करावे. काही दिवस शेत तसेच पडीक ठेवावे.
5) रोपटी एक महिन्याची झाली की, ती उपटून दुसरीकडे प्रतिरोपित करण्यास योग्य असतात. रेापट्याची मुळे खोल पुरावीत म्हणजे रोपटे योग्य रीतीने रुजेल. मुळे 40-50 सें.मी. खोल पुरल्यास ती माती धरून ठेवतील.
6) वेळोवेळी भांगलण करावी. अनावश्यक गवत, अन्य रोपटी वाढू देऊ नयेत. तसेच जमीन कोरडी पडू देऊ नये. 4-5 दिवसांनी जलसिंचन करावे.
फ्लॉवरच्या जाती
पुमसा दिपाली, पुसा सिन्थेटिक, पुसा कार्तिकी, स्नोबॉल-16, पुसा जपानी, पंतकोबी-1, पंतकोबी-3, नरेंद्र कोबी-1, पंत शुभ्रा इत्यादी.
खते व रासायनिक खते
फ्लॉवरच्या वाढीसाठी कृषितज्ज्ञांचे खते व रसायनिक खते वापरण्यासंबंधाचे वेगवेगळे सल्‍ले आहेत. त्यानुसार-
1) प्रतिरोपण (पुनर्लागवड) करण्यापूर्वी शेत तयार करावे. 15 टन शेणखत किंवा कम्पोस्ट खत घ्यावे. त्याचबरोबर 55 ते 60 किलोग्रॅम नायट्रोजन, 75 ते 80 किलोग्रॅम फॉस्फेट आणि 55 ते 60 किलोग्रॅम पोटॅशियम एकत्रित करून शेतात टाकावे. तीनवेळा शेत नांगरावे आणि प्रतिरोपण करावे. वरील खत प्रमाण प्रति हेक्टरास आहे.
2 ) नायट्रोजन 210 ते 220 किलोग्रॅम, फॉस्फेट 75 ते 85 किलोग्रॅम, पोटॅशियम 260 ते 270 किलोग्रॅम शेतात टाकावे. शेत 3 वेळा नांगरून घ्यावे म्हणजे खत शेताच्या मातीत एकजीव होईल.
3) 70 ते 75 क्‍विंटल शेणखत किंवा कम्पोस्ट खत, 35 ते 36 किलोग्रॅम नायट्रोजन, 17 ते 18 किलोग्रॅम फॉस्फेट व तेवढेच पोटॅशियम एकत्र करून शेतात टाकावे. म्हणजे भरपूर पीक येते.
जलसिंचन
दर 8 ते 10 दिवसांनी जलसिंचन करावे.
उत्पन्न
साधारणतः हेक्टरी 220 ते 280 क्‍विंटलपर्यंत फ्लॉवरचे उत्पन्न मिळते. यासाठी देखभाल, खते, जलसिंचन वेळेवर करावे. कीड, भुंगे, पतंग यांचा नायनाट कीटकनाशक वापरून करावा. भांगलण 2-3 वेळा करावी.
कोबी
कोबीला हिंदीत पत्तागोभी किंवा कंदगोभी म्हणतात. कोबीची भाजी सर्वत्र आवडीने खाल्‍ली जाते. तसेच चायनीज खाद्यपदार्थ, लोणचे, कोशिंबीर भजी इत्यादींसाठी कोबीचा वापर करतात. जनावरे व कोंबड्या यांचे खाद्य म्हणूनही कोबी वापरला जातो. कोबी फ्लॉवरपेक्षा अधिक पोषक मानला जातो. आजारी माणसाला स्वास्थ्यलाभ मिळावाा यासाठी आहारतज्ज्ञ कोबी शिजवून खाण्याचा सल्‍ला देतात.
जल/ वायू
कोबी पिकावर धुक्याचा विशेष परिणाम होत नाही. थंडी वातावरणात कोबी चांगला पिकतो. उष्मा वाढल्यास त्यातील पोषक द्रव्ये घटतात. हे थंडीत पिकवले जाणारे रब्बी हंगामाचे पीक आहे.
कोबीला जमीन
कोबी कोणत्याही प्रकारच्या जमिनीत पिकवता येतो. परंतु भरपूर उत्पन्नासाठी रेताड, भुसभुशीत माती चांगली. मातीत जर आम्लाचे प्रमाण अधिक असेल तर पीक चांगले येत नाही. आम्ल कमी करण्यासाठी शेताच्या मातीत जुना मिसळावा. जमिनीचे पी.एच.5.4 ते 6.4 मानांकन असावे.
भरपूर उत्पन्न घेण्यासाठी शेतजमिनीची तीन वेळा नांगरणी करावी. शेतात जैविक तसेच कार्बनयुक्‍त खत टाकावे. खत मातीत चांगले मिसळून घ्यावे. त्यासाठी पलटवार नांगरण करावी. माती बारीक झाली पाहिजे. ढेकळे फोडून घ्यावीत. नंतर पाटपाण्याची सुविधा पाहून मातीचे गादी
वाफे तयार करावेत.
पेरणीतील अंतर
कोबीची रोपटी प्रतिरोपित करणार असाल तर दोन ओळीत 45 ते 50 सें.मी. आणि दोन रोपांमध्ये 40 ते 45 सें.मी. अंतर ठेवावे.
खते व रासायनिक खते
खत वापरासाठी कृषीतज्ज्ञ प्रांतानुसार वेगवेगळे सल्‍ले देत असतात. त्यानुसार-
1) 90 ते 140 गाड्या शेणखत एका एकरासाठी घेऊन नांगरणीच्या वेळी मातीत मिसळावे. त्यानंतर अमोनियम सल्फेट 180 किलोग्रॅम, सुपर फॉस्फेट 180 किलोग्रॅम आणि पोटॅशियम सल्फेट 180 किलोग्रॅम एकत्र मिसळून शेतात टाकावे.
2) नांगरणीच्या वेळी 175 ते 180 क्‍विंटल कुजलेले शेणखत किंवा कम्पोस्ट खत शेतात टाकावे. त्यानंतर 1 महिन्याने 20 ते 25 क्विंटल अमोनियम सल्फेट प्रति हेक्टर वरून टाकावे. पीक चांगले येईल.
कोबीच्या जाती
कोबीच्या अनेक जाती आहेत. त्यापैकी डूम हेड, गोल्डन एकर, पुसा मुक्‍ता, पुसा ड्रम हेड, प्राइड ऑफ इंडिया, सप्टेंबर या जाती विशेष लोकप्रिय आहेत.
जलसिंचन
कोबी पेरणीचे शेत नेहमी ओलसर राहिले पाहिजे. शेत वाळू देऊ नये. प्रतिरोपण केल्यानंतर हलकेसे जलसिंचन करावे. त्यानंतर 3-4 दिवस हलके जलसिंचन करावे. नंतर दर आठवड्याला जलसिंचन झाले पाहिजे. हवेत उष्मा असेल तर 3-4 दिवसांनी पाणी द्यावे. पीक तयार होऊ लागताच सिंचनाचे प्रमाण कमी करावे.
भांंगलण
पिकासाठी माती नेहमी भुसभुशीत असावी. अनावश्यक गवत वाढू देऊ नये. त्यासाठी रोपट्यांनी तग धरल्यानंतर 10 ते 12 दिवसांनी भांगलण करावी. भांगलणीसाठी जमीन थोडी कोरडी होऊ द्यावी.
उत्पन्न
उत्तर भारतात प्रति हेक्टर कोबीचे उत्पन्न 225 ते 250 क्‍विंटल पर्यंत घेतात. दक्षिण भारतात मात्र 125 ते 150 क्‍विंटलपर्यंत उत्पन्न निघते. हा हवामानाचा परिणाम असतो. त्यामुळे सर्वच ठिकाणी सारखे उत्पन्न मिळत नाही. जिथे वर्षातून दोन वेळा कोबी लावले जातात तिथेही उत्पन्नात तफावत होऊ शकते.
गाठकोबी
1 ) ही सुद्धा कोबी प्रकारातली एक भाजी असून याची गाठ नवलकोलसारखीच असते, पण ती भूमीवर दिसते. काहीजण याची पानांसह भाजी करून शिजवून खातात ही एक पौष्टिक भाजी आहे. पण फ्लॉवर-कोबी सारखे याचे कोणी उत्पन्न घेत नाही. फार कमी प्रमाणात गाठकोबी पिकवली जाते.
2) खरं म्हणजे गाठकोबीची पानेच आवळल्यासारख फळाचा आकार घेऊन असतात आणि काही पाने उमलून गाठीभोवती पाकळ्यांसारखी दिसतात. भारतातील थोड्या प्रांतातच गाठकोबी पिकवतात.
3 ) पानकोबी प्रमाणेच पेरणी व देखभाल करावी लागते.पेरणीनंतर दीड-दोन महिन्यांतच गाठकोबी तयार होतो. त्यानंतर याची काढणी करतात.
गाठकोबीच्या जाती
1) पर्पल व्हिएना 2) व्हाइट व्हिएना अशा दोन मुख्य जाती आहेत.
जल/वायू

1) गाठकोबीला हवामान, जल, वायू कसे असावे याची माहिती –
2) थंड व ओलसर हवामान अशी जमीन गाठकोबीला मानवते.
3) फ्लॉवर, कोबी, गाठकोबी यांना अधिक थंडी व अधिक उष्णता सहन होत नाही. उत्पन्नावर परिणाम होतो.
4) तापमान 15 ते 20 अंश सेल्सिअस राहिल्यास बीज अंकुरण चांगल होते. रोपटीही चांगली पोसतात.
भांगलण
रोपट्यांनी मुळे धरली व नवीन पाने दिसू लागली की भांगलण करावी. अनावश्यक पालापाचोळा, गवत काढून टाकावे. भांगलण करताना मुळांना धक्‍का लागणार नाही याची काळजी घ्यावी. मुळे उघडी पडली असल्यास त्यावर माती चढवावी. भांगलण तीनवेळा महिन्याच्या अंतराने करावी.
अंतर
दोन ओळीत (सर्‍यांमध्ये) 28 ते 30 सें.मी. अंतर ठेवावे. तर दोन रोपट्यांमध्ये 18 ते 20 सें.मी. अंतर असावे.
बियाणे किती?
व्यवसायाच्या दृष्टीने गाठकोबी शेतात पेरणार असाल तर दर हेक्टरी एक ते दीड किलोग्रॅम बियाणे योग्य असते.
खते व रासायनिक खते
1) गाठकोबीसाठी प्रति हेक्टर नायट्रोजन 95 किलोग्रॅम, सल्फेट 80 किलोग्रॅम आणि पोटॅश 165 ते 170 किलोग्रॅम एका हेक्टरास टॉप ड्रेसिंगच्या वेळी टाकावे. म्हणजे चांगले उत्पन्न मिळते.
उत्पन्न
घरच्या परसबागेत गाठकोबी पिकवल्यास आवडीनुसार काढून खाता येईल. व्यावसायिकदृष्ट्या केलेल्या शेतीत याचे प्रति हेक्टरी उत्पन्न 275 ते 300 क्‍विंटलपर्यंत मिळते.

 

 

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

Leave A Reply

Your email address will not be published.