शेंगभाज्यांची शेती

0

काही भाज्या शेंगरुपात वेलीवर वा रेापट्यांवर उगवून येतात. या भाज्या टरफलाच्या आत दाण्यांच्या रुपात असतात. हे दाणे वा त्यांच्या कोवळ्या टरफलांना हाताने तोडून भाजी तयार केली जाते. या शेंगभाज्यांचे सुके दाणे पेरून परसबागेत आपण त्यांच्या वेली वा रेापटी उगवू शकतो. काही जण ती कुंपणाच्या आधाराने चढवतात. तर काही शेतकरी बांधव यांची व्यावसायिक दृष्ट्या मोठ्या क्षेत्रात पेरणी करून भरपूर उत्पन्न घेतात.

फरसबी
1) एकोणिसाव्या शेतकात युरोपीय लोकांनी पहिल्यांदा फरसबी भारतात आणली आणि आपल्या बागेत लावली. तेव्हा भारतावर या युरोपीयन लोकांची सत्ता होती. युरोपीय परत गेले, पण त्यांनी आणलेली फरसबी मात्र भारतीय बनून इथेच राहिली आणि भारतीय अन्नपदार्थांत मिसळून गेली. फरसबी तिच्या विशिष्ट चवीमुळे फार लोकप्रिय झाली. भारतातील बर्‍याच प्रांतात फरसबी पिकवली जाते.
2) फरसबीच्या ताज्या शेंगाची भाजी बनवतात. तसेच शेंगा सुकवून त्यांचे दाणे साठवले जातात.
3) फरसबीमध्ये पौष्टिकता आहे. यातील दाण्यांमधून शरीराला 50 टक् के स्टार्च, 25 टक् के प्रोटीन, 3 ते 4 टक्के खनिज पदार्थ व 2 ते 3 टक्के वसा (चरबीयुक्‍त) मिळतो.

जल/वायू ः-
थंड हवा, ओलसर छायादार जमिनीत फरसबी चांगली वाढते. समशीतोष्ण हवामानही फरसबीला मानवते.
शेती-माती कशी असावी ?
फरसबीला ओलसर, हलकी, रेताड जमीन अधिक चांगली. मातीत चिकट (चिकणी) ते घट्ट असेल तर फरसबीचे मूळ वाढत नाही. ते कुजते. हलकी जमीन असेल तर फरसबी चांगली वाढते. साधारण उगवणशक्‍ती असणारी जमीनही चालते.
जमीन 25 ते 30 सें.मी. इतकी खोलवर 2 वेळा नांगरावी. ढेकळे फोडून माती बारीक करावी, कचरा, गवत, पालापाचोळा काढून टाकावा. नांगरट केल्यानंतर जमीन 10-12 दिवस तशीच राहू द्यावी.

फरसबी पेरणी ः-
याची पेरणी सर्‍या काढून गादी वाफ्यात केली जाते. दोन वाफ्यांमध्ये 40 से.मी. अंतर असावे. आणि रोपात 9 सें.मी. अंतरअसावे. बिया मातीत हाताने दाबून पेरतात. पेरणीनंतर आठवड्याने अंकुरण होऊ लागते. ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत फरसबीची पेरणी केली जाते.

फरसबीच्या जाती ः-
फरसबीच्या लोकप्रिय जाती – कॅन्टुकी वंडर, पंत अनुपमा, अर्का कोमल, जांटल स्ट्रिंगलेस, पुसा पार्वती, कंटेडर, बुटकी बीन-1 इत्यादी.

खते व रासायनिक खते ः-
फरसबीच्या चांगल्या उत्पन्नासाठी खत वापरासंबंधी कृषी तज्ज्ञांचे चार सल्‍ले आहेत. ते पुढीलप्रमाणे.
1) एक हेक्टरसाइी किमान 35 किलोग्रॅम नायट्रोजन पुरेसे असते.
2) कुजलेले शेणखत 6 मेट्रिक टन, तसेच नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅश 170 ते 180 किलोग्रॅम मिसळून शेतात टाकावे.
3 ) 55 ते 60 किलोग्रॅम नायट्रोजन, 14 ते 15 किलोग्रॅम फॉस्फेट, 50 ते 55 किलोग्रॅम पोटॅश तसेच 75 ते 80 किलोग्रॅम कॅल्शियम एकत्र मिसळून शेतात टाकावे.
4) पेरणीच्या वेळी 55 ते 60 किलोग्रॅम नायट्रोजन तसेच एक महिन्यानंतर वरून शिंपडण्यासाठी तितकेच नायट्रोजन वापरावे. शेतकरी बंधूंनी वरील 4 सल्ल्यांपैकी योग्य तो सल्‍ला निवडावा.
जलसिंचन ः-
जमीन ओलसर राहणारी असेल तर उत्तम. बीजारोपण केल्यानंतर ताबडतोब हलकेसे जलसिंचन करावे. उन्हाळ्यात दर आठवड्याला, तर थंडीच्या दिवसात 9 ते 10 दिवसांनी जलसिंचन करावे.

उत्पन्न व तोडणी ः-
फरसबीच्या वेली वाढल्या तर प्रति हेक्टरी 80 ते 90 क्‍विंटल आणि झुडपे झाली तर 55 क्‍विंटलपर्यंत उत्पन्न मिळते. एका हेक्टरातील फरसबीच्या बिया वाळवल्या तर 15 क्‍विंटलपर्यंत मिळतात.
फरसबीच्या शेती लवकर फुलते. दीड-दोन महिन्यांत शेगा तोडणीस तयार होतात.

चवळी
चवळी ही कडधान्याच्या व भाजीच्या स्वरुपात खाल्‍ली जाते. ही एक लोकप्रिय शेंगभाजी आहे. मटारप्रमाणेच ही स्वादिष्ट व चवदार आहे. मटारपेक्षा स्वस्त दरात मिळत असल्याने चवळीला ग्राहक जास्त. यात अधिक प्रथिने आहेत. चवळी परसबागेची राणी म्हणता येईल. याची पेरणी व उगवण कुठेही सहजपणे करता येते. चवळीला गारठा सहन होत नाही. सावलीत व समशीतोष्ण वातावरणात चवळी बरहते. कडक उन्हात चवळीची वेल कोमेजू लागते.

चवळीसाठी शेत जमीन ः-
चवळीसाठी कोणत्याही प्रकारची शेत जमीन चालते, परंतु अधिक उत्पन्न घ्यायचे असेल तर जमिनीत कार्बनिक तत्त्व असावे लागते. पाणी चवळीच्या मुळाशी साचून राहता कामा नये. चवळी शेतकर्‍यांचे जोडपीक आहे. बांधावर, कुंपणावर, चवळीच्या वेली चढवतात किंवा मुख्य पिकाच्या आधाराने चवळीची जोपासना केली जाते.
फक्‍त चवळीच पिकवायची असेल तर नांगराच्या पलटवार फाळाने जमीन उलटसुलट करून घ्यावी. बैल नांगरट करायची असेल तर दोन वेळा नांगरट करावी. नंतर जमीन सपाट करून घ्यावी.

खते व रासायनिक खते ः-
चवळीला खते व रासायनिक खतांची जास्त गरज नसते. प्रति हेक्टरी 30 ते 35 किलोग्रॅम नायट्रोजन दिले तरी पुरेसे होते. दुसरा एक सल्ला असा की, नायट्रोजन 15 किलोग्रॅम, 60 किलोग्रॅम फॉस्फरस आम्ल व पोटॅश 60 किलोग्रॅम प्रति हेक्टर शेत जमिनीत मिसळून टाकावे. म्हणजे चवळीचे उत्पन्न चांगले मिळते.

जल/वायू ः-
पाऊस पडत असेल तर शेत जमिनीत पाणी तुंबून राहिल्यास मात्र चवळीची हानी होते. चवळीचे उत्पन्न उन्हाळ्यात घेतले जाते. थंडी जास्त पडल्यास चवळीची वाढ थांबते.

चवळीच्या जाती ः-
पुसा दो फसली, पुसा कोमल, पुसा फाल्गुनी, पुसा पावसाळी या चवळीच्या जाती आहेत. शेतकरी आपल्या आवडीनुसार स्थानिक जाती निवडतात.

पेरणीचे प्रमाण ः-
चवळी जर वसंत ऋतूत पेरायची असेल तर प्रति हेक्टर 18 ते 20 किलो पेरावी. पावसाळ्यादरम्यान पेरणार असाल तर 12 ते 13 किलोग्रॅम पुरेसे आहे.

जलसिंचन ः-
पावसाळ्यापूर्वी काही दिवस चवळी पेरली तर दररोज जलसिंचन करावे. रोपटी उगवून आल्यानंतर 8 ते 10 दिवसांनी जलसिंचन करावे.

भांगलण ः-
बरेच शेतकरी चवळीला भांगलणीची गरज नाही असे समजतात. परंतु अनावश्यक गवत भांगलणीने काढल्यामुळे चवळीच्या रोपट्यांना अधिक भूमिगत पोषक द्रव्ये मिळतील व पीक चांगले येईल, म्हणून वरवरची हलकीशी भांगलण जरूर करावी.

शेंगाची तोडणी ः-
चवळी पेरणीनंतर हवामानानुसार अडीच ते तीन महिन्यांत तयार होते.वेलीवर शेंगांचे घोस दिसू लागतात. शेंगात दाणे भरताच गरजेनुसार शेंगांची तोडणी करवी. काहीजण भिंतीच्या आधाराने तर काहीजण तात्पुरता मांडव करून वा कुंपणावरही चवळीचे वेल चढवतात. चवळीचा वेल चांगला पसरतो.

उत्पन्न ः- चवळीच्या हिरव्यागार शेंगा प्रति हेक्टर 55 ते 60 क्‍विंटल पर्यंत मिळतात. जर शेंगा वाळवून त्यसाचे दाणे काढले तर 15 ते 17 क्‍विंटलपर्यंत होतात.

मटार
1) मटारच्या हिरव्या शेंगा सोलून त्याची भाजी बनविली जाते. किंवा मिक्स भाजीत गाजर बटाटे, कोबी, पालक यांच्या जोडीला मटारचे दाणे घालतात. मटार वाळवून हिरवा वाटाणा तयार करतात. हिरवे वाटाणे भिजवून डाळीसारखी आमटी केली जाते.
2) मटारमध्ये प्रोटिनचे प्रमाण जास्त असते. मटार सुकवल्यानंतर कडधान्य होते.
3) शाकाहारी माणांना मटार खाल्ल्याने प्रेटिन मिळते जे शरीरस्वास्थ्यासाठी आवश्यक असते.

जल/वायू ः-
मटार पिकवण्यासाठी थंड हवामान लागते. उष्णता वा उन्हाळा वाढल्यास मटाराच्या पिकावर परिणाम होतो व उत्पन्नात घट होते. थंड वातावरणात शेंगेत दाणे भरतात. ते टचटचीत व भरपूर असतात. तापमान 13 ते 18 अंश सेल्सिअस पर्यंत असावे. धुके मटाराची हानी करते. मटार पेरल्यानंतर तापमान 16 ते 22 अंश सेल्सिअसपर्यंत राहिल्यास अंकुरण चांगले होते.

मटारासाठी शेत-जमीन ः-
1) मातीत आम्ल अधिक नसावे.
2) शेत जमीन सपाट असावी. पी.एच. मानांक 6 ते 7.5 असावे.
3) चिकण माती असो वा रेताड भुसभुशीत माती असो, मटार चांगला येतो.
4) पाण्याचा निचरा होण्यासाठी उतार असलेली जमीन चांगली.
5) शेताची नांगरट पलटवारीने दोन वेळा करून माती बारीक करावी. ढेकळे नसावीत. मग जमीन सपाट करून पेरणी करावी.
6) माती मऊ, भुसभुशीत असेल तर रोपट्यांची मुळे मातीची पकड लवकर घेतात.

मटाराच्या जाती –
पंत उपहार, अर्ली बॅजर,पंत मटार-2, जवाहर, पी-88, न्यू लाइन परफेक्शन, मिटिओर, अर्किल, आझाद-मटार इत्यादी लोकप्रिय जाती आहेत. शेतकरी त्यांच्या आवडीनुसार बियाणे खरेदी करतात.

पेरणी कशी करावी?
1) पहिली पेरीण ऑगस्टच्या आसपास करतात.
2) पठारी प्रदेशात ऑक्टोबरचा पहिला आठवडा ते नोव्हेंबरचा पहिला आठवडा या दरम्यान पेरणी करतात.
3) पहाडी प्रदेशात मार्चच्या दुसर्‍या आठवड्यापासून ते मे अखेरपर्यंत पेरणी चालते.
काहीजण मातीचे उंचवटे करून, तर काहीजण मातीचे गादी वाफे तयार करून मटार पेरतात. कोणी ड्रिल वापरून, तर कोणी मातीत एका ओळीत दाबून मटार पेरतात. दोन बियांमध्ये 6 सें.मी. अंतर असावे, तर दोन सर्‍यांमध्ये 25 ते 30 सें.मी. अंतर असावे.
गादीवाफे योग्य अंतरावर असल्यास जलसिंचन, भांगलण सोपी होते. मटार बी 3 सें.मी. खोलीवर पेरावा.

खते व रासायनिक खते ः-
1) शेतात पेरणी करण्यापूर्वी आधीही मटारचेच पीक घेतले असल्यास यावेळी दुसर्‍या पेरणीला खत कमी लागते. कुजलेले शेणखत 17 ते 18 मेट्रिक टन शेतात टाकावे. कम्पोस्ट खतही थोडेफार मिसळावे. हे खत मातीत एकजीव झाले पाहिजे. म्हणजे मटाराची रोपटी यातून पोषकद्रव्ये सहजपणे घेतील. जे शेत-जमिनीत खत मातीत मिसळून देत नाहीत, अशा पिकात रोगाचे संक्रमण होते.
2) मटार-पेरणीच्या वेळी प्रति हेक्टरी 45 ते 50 किलोग्रॅम नायट्रोजन, 55 ते 60 किलोग्रॅम पोटॅशियम सल्फेट एकत्र करून टाकावे व नंतर पेरणी करावी.
3) नुसतेच शेणखत टाकल्यास रोपटे वाढते. पाने भरपूर येतात, पण शेंगा कमी लागतात. आणखी एका तज्ज्ञांचा सल्‍ला असा की, 25 ते 30 किलोग्रॅम नायट्रोजन प्रति हेक्टरी टाकले तर मटारचे पीक चांगले येते.
जलसिंचन ः- पेरणीचे मटारदाणे पेरणीपूर्वी 4-5 तास भिजवून घ्यावेत. शेतजमीनसुद्धा ओलसर असावी. म्हणजे अंकुरण लवकर होते. जर जमीन ओलसर नाही व मटारही भिजवले नाहीत तर पेरणीनंतर ताबडतोब भरपूर पाणी द्यावे. हवामान कोरडे व उष्ण असेल तर दर आठवड्याला जलसिंचन करावे. वेलीवर फुले येऊ लागली तर जलसिंचन थांबवू नये. शेंगा लागल्या व दाणे भरू लागले तरी शेत जमीन कोरडी पडू देऊ नये. जलसिंचन आठवड्याने करा पण भरपूर करा.

उत्पन्न ः
1) कोणती जात लावली आहे तसेच हवामान कसे आहे यावर उत्पन्न अवलंबून असते. थंडीच्या हंगामात प्रति हेक्टर 95 ते 100 क्‍विंटलपर्यंत उत्पन्न मिळते, तर उन्हाळी मटार 55 ते 65 क्‍विंटल पर्यंत मिळते.
2) लागवडीसाठी मटारचे उत्पन्न घेतले असेल तर मटार दाणे सुकवल्यानंतर प्रति हेक्टर 18 ते 20 क्‍विंटलपर्यंत मिळतात.
वालपापडी
1) वालपापडी हीसुद्धा शेंगभाजी असून, हिंदीत हिला सेम म्हणतात. घरच्या परसबागेत ही सहज लावता येते.तर व्यावसायिकदृष्ट्या शेतात वालपापडीचे पीक घेतात.
2 ) वालपापडीचे भरपूर उत्पन्न घेण्यासाठी दरवर्षी हिची लागवड करावी.
कोठे उगवते ?
1 ) शेताच्या बांधावर, परसबागेच्या कुंपणावर, भिंतीच्या आधाराने पावपापडीची वेल चढवतात.
2) मुख्य पिकाबरोबर जोड पीक म्हणूनही वालपापडी लावतात.
3) वालपापडीच्या वेली उंची छतापर्यंत वाढतात.

वालपापडीच्या जाती ः-
कल्याणपूर टी-1, रजनी, नंबर 21, नुबर 125-36, सिलेक्शन-2, जेडीएल 37, पुसा अर्ली प्रोलिफिक या जाती लोकप्रिय आहेत.
माती कशी असावी?
वालपापडी मध्यम प्रतीच्या वा हलक्या प्रतीच्या मातीतही उगवते.
लागवड केव्हा?
वालपापडीचे बी जून-जुलै दरम्यान पेरतात. पावसाळ्याच्या सुरुवातीस पेरणी करणे योग्य असते. काही शेतकरी सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यानही बी पेरतात. दोन बियांमध्ये 90 ते 120 सें.मी.चे अंतर असावे. परसबागेत ती पेरताना हाताने मातीत दाबतात. मोठ्या शेतजमिनीत नांगरणीच्या वेळी बी पेरतात.

उत्पन्न ः-
पेरणी केल्यानंतर अडीच ते तीन महिन्यांनी वालपापडीचे उत्पन्न मिळू लागते. थंडी पडू लागताच वालपापडीची काढणी करतात. वालपापडीला दुष्काह निवारक पीक म्हटले जाते.

जलसिंचन ः-
पावसाळ्यात वालपापडीची पेरणी केली तर एखाद्या वेळेसच पाणी द्यावे. हवेत उष्मा असल्यास हलकेसे जलसिंचन करावे.

गवार
गवारीच्या शेंगा मऊ, हिरव्यागार असतात. ही चवदार व स्वादिष्ट शेंगभाजी आहे. शेंगा 10-12 सें.मी. लांबींच्या, गरयुक्‍त, दाण्यांसह असतात. जनावरांच्या चार्‍यासाठीही गवार लावली जाते. हे पण दुष्काळविरोधी पीक मानले जाते. गवारीच्या बियांपासून पीठ व टरफलापासून गोंद तयार करतात. कपड्यांच्या मिलमध्ये गवारीच्या शेंगाना मागणी असते.

जल/वायूू ः-
गवारीच्या पीकवाढीला उन्हाळा, उष्मा मानवतो. परंतु पाण्याची आवश्यकताही असते. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये गवार लावली जाते. तर काही प्रांतांत पावसाळ्याच्या जून-जुलै महिन्यांत गवारीचे बी पेरतात. जनावरांच्या चार्‍यासाठी फेब्रुवारी-मार्च महिन्यात गवार लावली जाते.

शेतजमीन कशी?
गवारीला शेतजमीन कशीही असली तरी चालते. तरीसुद्धा रेताड व पाण्याचा निचरा होणारी जमीन गवारीला चांगली. फक्‍त गवारीचेच उत्पन्न घ्यायचे असेल तर शेताची तीन वेळा नांगरणी करावी. जोड पीक म्हणून गवार बांधावर वा मुख्य पिकाच्या मधेमधे लावता येते.

पेरणी ः-
शेत जमिनीत सर्‍या पाडून व दोन सर्‍यांमध्ये 50 सें.मी. अंतर ठेवून गवारीची पेरणी करावी. बियांमध्ये 20 सें.मी. अंतर सोडून पेरणी करावी. प्रति हेक्टर 65 किलोग्रॅम गवारीचे बी पेरणीसाठी वापरावे.

गवारीच्या जाती ः-
पुसा मोसमी, पुसा नलबहार, पुसा सदाबहार इत्यादी.

गवारीला खते व रासानिक खते ः-
कमी टाकली तरी चांगले उत्पन्न मिळते. नांगरट करत असताना 18-20 गाड्या कुजलेले शेणखत वा कम्पोस्ट खत टाकले तरी चालते किंवा 12 किलोग्रॅम नायट्रोजन, 65 किलोग्रॅम फॉस्फेट आणि 65 किलोग्रॅम पोटॅश प्रति हेक्टर शेतात मिसळून टाकावे, म्हणजे उत्पन्न चांगले येते.

जलसिंचन ः-
गवारीला गरजेनुसार आपल्या बुद्धीप्रमाणे जलसिंचन करावे.पावसाळ्यात पाणी देण्याची गरज नसते.

उत्पन्न ः-
गवारीच्या कोवळ्या हिरव्या शेंगाचे उत्पन्न प्रति हेक्टर 55 ते 60 क्‍विंटलपर्यंत मिळते. बियाणांसाठी गवार केली असेल तर शेंगा वाळवून 6 ते 7 क्‍विंटल बिया मिळतात.

 

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

Leave A Reply

Your email address will not be published.