भाजीपाल्याचे वर्गीकरण

0

भारतात अनेक जाती जमाती आहेत. अशी अनेकतेतून एकता साधताना प्रांताप्रांतांतून अनेकविध वनस्पती भाजीपाला म्हणून वापरल्या जातात. अशा अंदाजे सव्वाशे वनस्पती आहेत. विशिष्ट प्रांतात तेथील मातीच्या व हवामानाच्या गुणधर्मांनुसार वनस्पती उगवत असतात. त्यापैकी ज्या खाद्य म्हणून अनुकूल असतात त्या वनस्पती औषधी गुणधर्माने युक्‍त असतात.

या सव्वाशे वनस्पतींपैकी अर्ध्या अधिक अशा वनस्पती आहेत की त्या देशाच्या कानाकोपर्‍यात वेगवेगळ्या ऋतूत/मोसमात उगवतात किंवा पिकवल्या जातात. शाकभाजी म्हणून त्या आवडीने खाल्या जातात. या वनस्पती कुठे जास्त तर कुठे कमी प्रमाणात उगवतात. हे तेथील जमिनीच्या उगवण शक्‍तीवर तसेच हवामानावर अवलंबून असते. अशा वनस्पती आपण आपल्या जमिनीतसुद्धा काळजीपूर्वक लागवड करून उत्पादन घेऊ शकतो. या वनस्पतींना प्रांतानुसार, चवीनुसार वेगवेगळी नावे असू शकतात. यांचे वर्गीकरण चव, स्वाद, प्रांत, नाव अशा विविध आधारावर केले जाते. तसेच विज्ञान, वनस्पतीच्या विविध अंगाने उपयोग, संवर्धनाच्या पद्धती, वनस्पती उगवण्याचा ऋतू किंवा मोसम, तापमान यानुसारही वनस्पतींचे वर्गीकरण केले जाते. कृषितज्ज्ञ व वैज्ञानिक या विषयावर संशोधन करत असतात व आपले निष्कर्ष मांडतात. शेती विषयाच्या अभ्यासकांना व विद्यार्थ्यांना ही माहिती उपयुक्‍त होते.

वनस्पती विज्ञानाचा दृष्टिकोन ः
भाजीपाल्याचे वर्गीकरण करताना वनस्पतीशास्त्रानुसार भाजीचे रोपटे कोणत्या कुळातील आहे, त्याचा वंश कोणता, त्यांची जात किंवा उपजात कोणती याचा विचार केला जातो.
खाण्यायोग्य सर्व वनस्पतींचे चार ढोबळ उप प्रकारातून विचार केला जातो. हे उपप्रकार 1. थॅलोफायदा 2. ब्रायोफायटा, 3. टेरीडोफायटा, 4. स्परमोफायटा.
शेवटच्या स्परमोफायटाची सुद्धा दोन वर्गात विभागणी होते.
1. जिमनोस्पर्म, 2. एंजियोस्पर्म.
या आधीच्या जिमनोस्पर्म मध्ये कोणतीही भाजी प्रकार नसतो. मात्र एंजिओस्पर्ममध्ये दोन छोटे वर्ग मानले जातात.
1. मोनोकॉटीलेडोनी, 2. डायकोटीलेडोनी. यांना त्यांचे कूळ, जाती, वंश यानुसार ओळखले जाते. सर्व भाजी प्रकार यात वर्गीकृत केले जातात. संक्षेपाने सांगायचे असेल तर
1. एमेरीलिडेसी कुळात कांदा-लसून येतात.
2. एरेसी कुळात अळू येतो.
3. डायोस्कोरियेसी कुळात सुथनी येते.

रोपट्यांच्या अवयवांचा उपयोग ः
काही रोपट्यांची पानेच भाजी म्हणजे खाल्‍ली जातात, तर काहींचे देठ या मुळे खाल्‍ली जातात. काहींची फुले तर काहींची फळे भाजीसाठी वापरली जातात. भाजी म्हणून रोपट्याचा कोणता भाग वापरला जातो, कोणता भाग खाण्यायोग्य नाही, याचीही माहिती असणे जरुरीचे आहे. यामुळे भाज्यांचे वर्गीकरण करणे सोपे होते. उदा.
अ) मुळा, बीट, गाजर या भूमिगत मूळभाजी आहेत.
ब ) सुरण, बटाटे, अखरोट या कंदभाज्या आहेत.
क) भेंडी, टरबूज, राजमा, पडवळ, दोडको, दुधी भोपळा, टोमॅटो, मिरची, चवळी यांना फळभाजी वा शेंगभाजी म्हणतात.
ड) ज्या भाजीचीपाने वापरले जातात, उदा. कोबी, करडई, पालक, मेथी, शेपू यांना पालेभाज्या म्हणतात.
इ) कांदा, लसूण हा शल्क कंद प्रकार होय.
फ) ब्रोकली, फ्लॉवर ही फूल प्रकारातील जाती होय.

संवर्धनातून भाजीप्रकार ः
काही भाज्या अशा असतात की ज्यांचे संवर्धन एकाच प्रकाराने करता येते. या समूहात येणार्‍या भाज्यांच्या रोपांची लागवड करणे, खतपाणी देणे आणि विशिष्ट तापमान राखणे ही कामे एकाच प्रकाराने करतात.
यांचेही चार विभाग पाहुया. त्यामुळे हा संवर्धनाचा विषय सोपा होऊन समजले.
अ) प्रतिरोपणातून ज्यांचे संवर्धन केले जाते, त्या प्रकारात बियाणे कसेही शिंपडून रोपटी वाढवली जातात, नंतर ही रोपटी उपटून त्यांना वाढीसाठी योग्य असे वाफे बनवून ही उपटलेली (मुळासह काढलेली) रोपटी रोपली/रोवली जातात, म्हणजेच प्रतिरोपण केले जाते. उदाहरणार्थ कांदा, मिरची, टोमॅटो , कोबी यासाठी प्रतिरोपण प्रकार केला जातो.
ब) काही भाज्या फळ स्वरुपात वेलीवर येतात. उदाहरणार्थ पडवळ, दुधी भोपळा, दोडका, तोंडली आदी.
क ) काही भाजी प्रकार पापुद्रे प्रकारातील कंदाप्रमाणे असतात. उदाहरणार्थ लसूण, आले, बटाटे.
ड) प्रतिरोपण म्हणजे एका जागेवरून उपटून पुन्हा रोवणे, या वेल स्वरुपात ज्यांना आधार द्यावा लागतो. तसेच भूमिगत उगवणारी असे तीन प्रकार आपण पाहिले. चौथ्या प्रकारातील भाजी लावण्यासाठी बिया वापरल्या जातात. बिया अंकुरित होतात व तयंची रोपटी होतात. यांना हलवणे योग्य नसते. त्यांना इजा पोचल्यास त्या सुकून (वाळून) मरतात. यांचे प्रतिरोपण करता येत नाही. उदाहरणार्थ नवलकोल, मुळा, गाजार, लाल भोपळा, खरबूज, कलिंगड आदी.

ऋतूनुसार वर्गीकरण ः
भाजीपाला खरीप, रब्बी व हंगामानुसार येत असतो. हिवाळा, उन्हाळा व पावसाळा या ऋतूत कोणता भाजीपाला भरपूर उगवतो याची माहिती असावी. कारण भारतात हे तीन ऋतू प्रमुख आहेत. अर्थात तीन प्रकारचा भाजीपाला पिकवला जातो.
अ) खरीपाचे पीक पावसाळ्यात घेतात. यावेळी काकडी, दुधी भोपळा, भेंडी यांचे उत्पादन घेतले जाते.
ब) हिवाळ्यात रब्बी हंगाम असतो. या हंगामात गाजर, मटार, पालक इत्यादींचे उत्पादन घेतले जाते.
क) हंगामी उन्हाळी भाजीपाला म्हणून वांगी,आळू, चवळी इत्यादींचे उत्पादन घेतात.

रोपट्याच्या आयुर्मानानुसार वर्गीकरण ः
भाजीपाल्याच्या रोपट्याच्या आयुर्मानाप्रमाणे वर्गीकरण करताना रोपटे एक वर्षीय, द्विवर्षीय, बहुवर्षीय अशा तीन श्रेणीचा विचार करतात. याचा अर्थ असा, की काही रोपटी पहिल्या मोसमातच उत्पादन देऊन संपतात. तर काही रोपट्यांना देान मोसमात उत्पादन देण्याची क्षमता असते. तसेच काही रोपटी वर्षापेक्षा अधिक काळ उत्पादन देतात.

भाजीपाल्याची परिपक्‍वता ः
भाजी पिकणे व ती खाण्यायोग्य होण्याच्या दोन श्रणी आहेत.
1) गाजर, मटार, पालक, कोबी हे भाजीप्रकार हिवाळ्यात येतात तेव्हाच त्याची काढणी/ तोडणी केली जाते.
2. खरबूज, टोमॅटो, मिरची, वांगी, काकडी हे उन्हाळी भाजी प्रकार आहेत. उन्हाळ्यात यांची काढणी/तोडणी केली जाते.

चुनामिश्रित मातीतील उत्पादन ः
कोणत्या भाजी प्रकारासाठी मातीत किती प्रमाणात चुना असावा याचाही विचार केला जातो. यामुळे रोपटी चांगली, आरोग्यपूर्ण होतील व फळे/पाने चांगली येतील.
अ ) ज्या जमिनीत जुन्याचे प्रमाण अधिक असते त्यात नवलकोल, पालक यांचे उत्पादन चांगले येते.
ब ) ज्या जमिनीत मध्यम प्रमाणात जुना असतो अशा जमिनीत वांगी, फ्लॉवर, कोबी चांगले उगवतात.
क) ज्या भूमीत चुन्याचे प्रमाण कमी आहे, अशा भूमीत काशीफळ भोपळा, गाजर, काकडी यांचे उत्पादन घ्यावी.
ड) ज्या भूमीत चुन्याचे प्रमाण नग्य आहे किंवा चुना नसेल अशा भूमीवर बटाटे, मुळा, आळू, टोमॅटो, गाजर, नवलकोल यांचे उत्पादन घ्यावे.

श्‍वसनानुसार वर्गीकरण ः
तोडलेला, छाटलेला व उपटलेला भाजीपालासुद्धा श्‍वसन करीत असतो. हवेचा अशा भाजीपाल्यावर थेट परिणाम होत असतो. काही भाजीपाला काढणी/तोडणीनंतर लवकरच सुकू/वाळू लागतो तर काही भाजीपाला बराच काळ हरित राहतो.
1) लसूण, कांदा, बटाटा यांची काढणीनंतर श्‍वसनक्रिया अतिशय मंद असते,साहजिकच ते बराच काळपर्यंत टिकून राहतात. त्यामुळे यांची साठवणूक केली जाते. हे लवकर खराब होत नाही.
2) काही फळभाज्यांची श्‍वसनक्रिया कमी असते त्यामुळे काढणीनंतर ते काही दिवस ताजेतवानेच राहतात. पाणी मारून यांचा ताजेपणा टिकवता येतो. या प्रकारात नवलकोर, कोबी, फ्लॉवर येतात.
3) काही भाजीपाल्याची काढणी नंतरची क्षमता मध्यम प्रमाणात असते. काकडी, खरबूज, गाजर, टोमूटो आणि बीट या प्रकारात येतात.
4) चौथ्या प्रकारातल्या शेंगभाज्या बीन्स, शेवग्याच्या शेंगा, वालपापडी इ. जलद श्‍वसन करतात. त्यांच्यावर पाणी मारून त्या काही काळ ताज्या ठेवता येतात.
5) ज्यांचा श्‍वसन दर जास्त आहे अशा भाज्या उदाहरणार्थ मटार, पालक, ब्रोकली इ. या लवकर खराब होतात. यांचा ताजेपणा फार काळ टिकत नाही.
खारटपणा सहन करणारा भाजीपाला ः
खारटपणा सहन करू शकणार्‍या भाज्या असेही वर्गीकरण करता येते.
अ) भोपळा, आळू, भेंडी, टोमॅटो इ. भाज्यांमध्ये खारटपणा सहन करण्याची अजिबात शक्‍ती नसते.
ब) खारटपणा अल्पशा प्रमाणात सहन करणार्‍या भाज्या म्हणून बटाटा, बीट, कोबी, गाजर इ. भाज्यांचा उल्‍लेख होतो.
क ) खारटपणा सहन करण्याची बर्‍यापैकी क्षमता असणार्‍या भाज्या म्हणून मिरची, कांदा, पालक, नवलकोल , बीट यांचा उल्‍लेख होतो.

उष्णता-गारठा सहन करणार्‍या भाज्यांचे वर्गीकरण ः
उष्णता सहन करणार्‍या व गारठा (थंडी) सहन करणार्‍या भाज्या असेही वर्गीकरण करता येते.
1) उष्णता सहन करणार्‍या भाज्या-मिरची, टोमॅटो, काकडी,वालपापडी, टरबूज.
2) गारठा सहन करणार्‍या भाज्या-मटार, मुळा, कोबी, गाजर, पालक व बीट.
हौसेने अगर व्यवसाय म्हणून भाजी पिकवणार्‍यांनी वरील वर्गीकरण लक्षात ठेवले पाहिजे. गारठा (थंडी) व उष्णता (उन्हाळा) सहन करणार्‍या भाज्या लक्षात ठेवून त्याप्रमाणे साठवणुकीचे वा विक्रीचे नियोजन करावे.

 

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

Leave A Reply

Your email address will not be published.