शेतीमध्ये पाण्याचा कार्यक्षम वापर करायला हवा

0

औरंगाबाद / प्रतिनिधी
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि महाअ‍ॅग्रो यांच्या माध्यमातून दि. 1 ते 4 फेब्रुवारी दरम्यान औरंगाबाद येथील पैठण रोडवरील कृषी विज्ञान केंद्र व कृषीतंत्र विद्यालय परिसरात कृषी प्रदर्शन, क्षेत्रीय पीक प्रात्यक्षिक आणि चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून दि. 1 फेब्रुवारी रोजी राज्य विधानसभाचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

व्यासपीठावर कुलगुरु डॉ. अशोक ढवण, औरंगाबाद मनपाचे महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा परिषद अध्यक्षा अ‍ॅड. देवयाणीताई डोणगांवकर, विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य तथा आमदार श्री. सतिशभाऊ चव्हाण, मराठवाडा विकास वैधानिक मंडळाचे अध्यक्ष श्री. भागवत कराड, विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदिप इंगाले, प्रगतशील शेतकरी श्री. विजयअण्णा बोराडे, महाअ‍ॅग्रोचे मुख्य समन्वयक अ‍ॅड. वसंतराव देशमुख, संशोधन सहसंचालक डॉ. सुर्यकांत पवार, प्राचार्य डॉ. किरण जाधव, सौ. दिप्ती पाटगावकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात विधानसभेचे अध्यक्ष श्री. हरिभाऊ बागडे म्हणाले की, मराठवाडयातमागील कित्येक वर्षापासून पाऊस हा कमी-अधिक प्रमाणात पडत असुन भुगर्भातील पाण्याचा होणारा उपसा चिंताजनक आहे. शेतीमध्ये पाण्याचा कार्यक्षम वापर करावा लागेल. दिवसेंदिवस जमिनीचे भाऊ हिस्से वाढत आहे, शेतकर्‍यांचे जमिनधारण क्षेत्र कमीकमी होत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे कमी क्षेत्रावरही शेतीत चांगले उत्पादन घेऊ शकतो. शेतकर्‍यांनी विविध पिक पध्दतीचा अवलंब करून नवनवीन प्रयोग आपल्या शेतीत करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

कुलगुरु डॉ. अशोक ढवण म्हणाले की, कृषी प्रदर्शन हे कृषी तंत्रज्ञान प्रसाराचे मोठे माध्यम आहे, या माध्यमातून कृषी तंत्रज्ञान प्रभावीरित्या शेतकर्‍यांसमोर मांडता येते. प्रक्षेत्रावर घेण्यात आलेल्या विविध पिक प्रात्यक्षिक हे शेतकरी बांधवासाठी दिशादर्शक ठरतात. चर्चासत्रातुन कृषी शास्त्रज्ञ आणि शेतकरी यांच्यामध्ये सुसंवाद साधता येतो. बदलत्या हवामानामुळे शेती प्रश्‍न उग्ररुप धारण करीत असुन बदलत्या हवामानास अनुकूल विद्यापीठ विकसित तंत्रज्ञानाचा शेतकरी बांधवानी अवलंब करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

कार्यक्रमात मराठवाडयातील विविध पिकांमध्ये विक्रमी उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची आखणी प्रकाश उगले यांनी केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालक साठे यांनी केले तर आभार डॉ. किरण जाधव यांनी मानले. चार दिवस चालणार्‍या कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्र व कृषी तंत्र विद्यालय परिसरात विद्यापीठ व खाजगी कंपन्या विकसित विविध पिकांचे वाणांचे व तंत्रज्ञानाचे क्षेत्रीय पिक प्रात्यक्षिक घेण्यात आले असुन शेतकरी बचत गट निर्मित विविध पदार्थ विक्रीची दालनाचा समावेश प्रदर्शनीत आहे. कार्यक्रमास मराठवाडयातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

 

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा  8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

 

Leave A Reply

Your email address will not be published.