हरितगृहातील पिकांसाठी विद्राव्य खतांचा वापर

0

१. गुलाब   २. कार्नेशन

भारतामध्ये हरितगृह तंत्रज्ञानाचा अवलंब मोठ्या प्रमाणावर वाढत असून पिकांची उत्कृष्ट वाढ होण्यासाठी आवश्यक वातावरण नियंत्रण केले जाते. उन्हाळ्यात अति तापमानापासून पिकांचे संरक्षण होण्यासाठी हरितगृह उपयोगी ठरते. हरितगृहामध्ये फुलशेती व भाजीपाला लागवड करता येते.

 

१. गुलाब :

गुलाब लागवडीसाठी विद्राव्य खतांचा वापर :

आपल्या देशात गुलाबाचा वापर सणासुदीला समारंभाकरिता व कार्यालयाची शोभा वाढविण्याकरिता केला जातो. परंतु १९९० नंतर हरितगृहातील उच्च जातीचा गुलाब उपलब्ध झाल्यानंतर लोकांचा कल बदललेला आढळतो. शिवाय डच जातीची फुले निर्यात करण्यासाठी मोठा वाव आहे. त्यासाठी उत्तम प्रतीचे फुले उत्पादित करावी लागतात. त्याकरिता योग्य जातींची निवड, वातावरण नियंत्रण योग्य मशागत इ. बाबींचा वापर करावा लागतो.

जमीन/ माती:

माती ही लाल रंगाची लॅटेराईट प्रकारची असावी. त्यामध्ये पाण्याचा निचरा चांगला होतो. हरितगृहासाठी निवडावयाच्या मातीचा सामू ६.५ ते ७.० च्या दरम्यान व क्षारता १ सें.मी. होज प्रति सें.मी. पेक्षा कमी असावी.

मातीचे निर्जंतुकीकरण :

लागवडीपूर्वी मातीचे निर्जंतुकीकरण करणे गरजेचे असते. हरितगृहामध्ये लावायच्या रोपांचा खर्च तुलनेने जास्त असल्यामुळे मातीमध्ये असणारे बुरशीजन्य रोग नियंत्रित करावे लागतात. याची पद्धत पुढील प्रमाणे आहे.

  • मातीमध्ये पाणी द्यावे.
  • वाफसा आल्यानंतर फॉरमॅलीन ६ टक्के प्रमाण किंवा बसामीड ४० ग्रॅम प्रती चौ.मी. वापरावे.
  • बासामीडसाठी जमीन वर खाली करावी लागते. यामुळे बासामीड जमिईत मिसळते. त्यानंतर झारीच्या सहाय्याचे हलके पाणी मारावे. पुर्ना जमिनीवर काळ्या रंगाची पॉलीफिल्म पसरावी व फिल्मच्या तुकड्याच्या काडावर चारी बाजूंनी माती घालावी.
  • दोन ते तीन दिवस थांबावे, नंतर कागद काढून भरपूरपाणी द्यवे.
  • वाफसा आल्यानंतर बेड बांधणी करावी.

बेड(गादीवाफे) बांधणी :

हरितगृहातील पिके ही बेड करून लावली जातात व निर्जंतुकीकरणापुर्वी मातीमध्ये वाळू अथवा भाताचे तुस व शेणखत मिसळावे लागते. त्याचे प्रमाण माती ६० टक्के वाळू अथवा भाताचे तूस – २० टक्के व शेणखत – २० टक्के इतके आहे. गुलाब लागवड करण्याकरिता बेडची रुंदी ९० व पायाची रुंदी ६० सें.मी. असते. बेडची उंची २५ ते ३० सें.मी. ठेवावी. गुलाबाची रोपे प्रती चौ.मी. ६ ते ७ घनतेने लावली जातात.

हवामान :

गुलाबाच्या लागवडीसाठी थंड व कोरडे हवामान आवश्यक असते. गुलाबाच्या चांगल्या वाढीसाठी आणि फुलांच्या जास्त उत्पादनासाठी तापमान २० ते ३० सें.मी. असावे लागते. वातावरण नियंत्रणासाठी पुढील बाबींचा अवलंब करावा लागतो.

  • तापमान कमी करण्यासाठी व आर्द्रता वाढवण्यासाठी फॉगर / मिस्टींग पद्धतीचा वापर.
  • तापमान व सूर्यप्रकाश तीव्रता कमी करण्यासाठी पॉलीफिल्मवर चुना मारणे.
  • हरितगृहातील मोकळ्या जागेमध्ये पाणी मारणे.
  • ५० टक्के शेडींग बेल्टचा वापर करणे.

खत व्यवस्थापन :

हरितगृहात गुलाबाची लागवड व त्याला लागणारी खते यांचा अभ्यास सविस्तर झालेला नसला तरी झाडांची वाढीव संख्या, झाडांची सतत होणारी वाढ, उंचावलेली गुणवत्ता आणि अधिक उत्पादन या सर्वासाठी खत व्यवस्थापनाचे नियोजन लागवडी पूर्वी माती परिक्षण अहवालानुसार करणे आवश्यक असते. साधारणपणे प्रत्येक झाडास २०० पी.पी.एम. नत्र, २०० पी.पी.एम. स्फुरद, २०० पी.पी.एम. पालाश, १२० पी.पी.एम. कॅल्शियम, १२ पी.पी.एम. मॅग्नेशियम आणि २ ते ५ पी.पी.एम. गंधक, सुक्ष्म अन्नद्रव्ये लोह १.०० ते १.२० पी.पी.एम., मलिब्डेड ०.०५ ते ०.०६ पी.पी.एम. ही अन्नद्रव्ये मिळावयास हवीत. सेंद्रिय खतयुक्त जमिन असल्यास सुक्ष्म अन्नद्रव्ये जमिनिद्वारे मिळावयास हवीत. सेंद्रिय खतयुक्त जमीन असल्यास सुक्ष्म अन्नद्रव्ये जमिनिद्वारे गुलाब पिकाला मिळू शकतात. मात्र वरील अन्नघटकांचा पुरवठा करण्यासाठी योग्य तो आखीव कार्यक्रम बसवावा लागतो. त्याचा समन्वय आवश्यक असतो. वरील खतांच्या मात्रा आठवड्यातून दोन वेळा सात महिनेपर्यंत द्याव्यात.

 

२. कार्नेशन

हवामान :

थंड हवामान, कमी आर्द्रता, भरपूर सूर्यप्रकाशात या पिकांची वाढ चांगली होते.

तापमान :

स्वच्छ व भरपूर सुर्याप्रकाशाबरोबरच कमी तापमानाची आवशकता असते. हिवाळ्यात रात्रीचे तापमान १० ते २० सें.ग्रे. व उन्हाळ्यातील १३-१५ सें.ग्रे. तापमान मानवते. १८ सें.ग्रे. दिवसाचे तापमान राहिल्यास अत्युच्च प्रतीची फुले मिळतात. तापमानातील बदलाचा कार्नेशन पिकावर फार मोठा परिणाम होतो. जर वाढीच्या अवस्थेत तापमान बदलत गेले तर फुलांचे उत्पादन वाढते प्रत बिघडते. फुलांचा आकार पाकळ्यांची संख्या, दांड्याची लांबीही कमी होते.

कार्बन डायऑक्साईड :

सर्वसाधारणपणे हवेत कार्बनचे प्रमाण २५० पी.पी.एम. असते. ते ५०० पी.पी.एम. पर्यंत वाढविले तर फुलांची प्रत सुधारण्याबरोबरच उत्पादनात १०-३० टक्के वाढ होते. त्यासाठी तापमान मात्र १४ ते १५.४ सें.ग्रे. पर्यंत असावे.

जागेची निवड :

कार्नेशनच्या यशस्वी लागवडीमध्ये जागेची निवड फारच महत्वाची ठरते. निवडलेल्या जागा स्वच्छ सूर्यप्रकाशित असाव्यात. तसेच तेथील हवामान थंड असावे. अन्यथा फुलांच्या प्रतीवर विपारित परिणाम होतो.

जमिन:

मध्यम प्रतीच वाळू मिश्रित सुपीक जमिनीत हे पिक चांगले होते. जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी. कारण कार्नेशनची मुळे अतिशय संवेदनक्षम असतात. सामू ६-७ च्या दरम्यान असावा.

अभिवृद्धी :

छाट कलमाने करतात. अतिशय जोमदार, निरोगी व फुले न घेतलेल्या झाडापासून छाट कलमे करतात. स्टँडर्ड प्रकारात शेंड्याकडील १०-१५ सें.मी. लांबीची फांदी वापरतात, तर स्प्रे प्रकारात ७-१० सें.मी. लांबीची फांदी वापरतात. रोपे तयार करण्यास थोडी लांब वापरल्यास आखूड फांदीच्या तुलनेत लवकर फुले येतात पण फुलांच्या प्रतीत काहीही फरक पडत नाही. मुळे फुट्यासाठी माध्यम म्हणून वाळू, परलाईट किंवा व्हर्मीक्युलाइट फायदेशीर ठरतो. रोपांना प्रादुर्भाव होवू नये म्हणून झायनेब, बेनोमील सारख्या बुरशीनाशकांचा वापर करावा. भरपूर सूर्यप्रकाश व तुषार सिंचन असल्यास रोपांना चांगल्या मुळया फुटतात. एनएए ४००-५०० पीपीएमसारख्या संजीवकात फांद्या बुडवून लागण केल्यास मुळ्या फुटण्याचे प्रमाण वाढते. फाटे कलमापासून २२-२५ दिवसात त्यांना मुळे फुटतात.

फांद्यांची साठवण :

निरोगी झाडांपासून छाट कलमे घ्यावीत. ती प्लास्टिकच्या पिशवीत पॅक करून शीतगृहात १-३० सें. तापमानात ठेवावीत. अशी छाट कलमे कित्येक महिने चांगल्या प्रकारे राहू शकतात.

जमिनीची मशागत :

गादीवाफ्यावर किंवा पॉटमध्ये कार्नेशनची लागवड केली जाते. त्यामागे पाण्याचा योग्य निचरा व्हावा हीच अपेक्षा असते. रोपांच्या लागवडीकरिता चांगले माध्यम करण्याकरिता जमिनीत  शेणखताबरोबरच नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशची योग्य मात्रा मिसळावी शेणखत व फॉस्फरस जमीन तयार करताना मिसळावे तर नायट्रोजन व पोटॅश दोन हाप्त्यामध्ये द्यावे.

लागवडीचे अंतर :

उच्च प्रतीच्या फुलांच्या अधिक उत्पादनाकरिता १५ x १५ सें.मी. अंतरावर लागवड करावी अशाप्रकारे लागवड केल्यास ४४ झाडे प्रती चौरस मीटर क्षेत्रात बसतात. आपल्याकडे २० x २० सेंटीमीटर वर लागवड करणे योग्य, यामध्ये दर चौरस मी. क्षेत्रात २५ झाडे बसतात. दर दोन वर्षांनी नवीन लागवड करावी. रोपांची लागवड जास्त खोलवर करू नये. अन्यथा रोगाचा प्रादुर्भाव होतो. तो टाळण्यासाठी छाट कलमे अगोदर जेवढी जमिनीत होती तेवढीच खोलवर लावावीत.

खते :

खताचा योग्य प्रमाणात पुरवठा करावा. वर्षाला २०० ग्रॅम नत्र, ६० ग्रॅम स्फुरद, २०० ग्रॅम पालाश, १२५ ग्रॅम कॅल्शिअम, आणि ४० ग्रॅम मग्नेशिअम प्रति चौ.मी. १५ दिवसांच्या अंतराने विभागून दिल्यास झाडांची चांगली वाट होवून उत्तम प्रतीची फुले मिळतात. प्रत्येक पाण्याच्या वेळेस २०० पी.पी.एम. नत्र व पालाश प्रती झाड दिल्यास झाडांची चांगली वाढ होऊन अधिक उत्पन्न मिळाल्याचे आढळले आहे.

 

 

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

Leave A Reply

Your email address will not be published.