महाराष्ट्र राज्य फळझाडांच्या लागवडीमध्ये देशात अग्रेसर आहे. रोजगार व योजनेच्या माध्यमातून फळझाडांची लागवड या योजनेमुळे फळझाडांच्या लागवडीखालील क्षेत्रात ३.०० लाख हे क्षेत्रावरुन १५.०० लाख हे. क्षेत्र एवढी वाढ झालेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या या यशस्वी योजनेचा आदर्श घेऊन केंद्र शासनाने सन २००५ सालापासून राष्ट्रीय फलोत्पादन योजना चालू केलेली आहे. सदरच्या योजनेमध्ये फळझाडांच्या लागवडीबरोबरच रोपवाटिकेसंदर्भात अनेक घटक समाविष्ट केले आहेत. त्यामुळे राज्यातील व देशातील फळझाडांच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ होणार आहे.
- पाणी व्यवस्थापन व आच्छादनाचा वापर :
उन्हाळी हंगामात पाणी व्यवस्थापन व अच्छादनाचा वापर अतिशय महत्वाचा आहे. कारण चांगल्या गुणवत्तेची व दर्जेदार कलमे तयार करणे या बाबीवरच अलंबून आहेत. रोपवाटिकेतील कलमे/रोपांना पाटपाणी, प्लास्टिक नळी, झारी, सुक्ष्म तुषार सिंचन इ. द्वारे पाणी दिले जाते. ज्या कलमांचे हार्डनिंग पूर्ण झालेले आहे अशी कलमे/रोपे चरात किंवा सपाट वाफ्यात ठेवून त्यांना वर नमूद केलेल्या वेगवेगळ्या पद्धतीपैकी एखाद्या पद्धतीने पाणी द्यावे. पाटपाणी द्यावयाचे असल्यास चार ते पाच दिवसाच्या अंतराने हलकेसे पाणी द्यावे जेणेकरून चरात किंवा वाफ्यात पाणी जादाकाळ साठून राहणार नाही. पाणी जास्त काळ साचून राहू नये म्हणून चरास/वाफ्यास किंचित (०.१ ते ०.५ टक्के) उतार द्यावा.
सूक्ष्म तुषारची सोय असल्यास प्रती दिन तास याप्रमाणे सूक्ष्म तुषारसंच चालवून कलमा/रोपाना पाणी द्यावे. सुक्ष्म तुषार संचाचा वापर केल्यामुळे तीव्र सूर्यप्रकाशामुळे कलमांचे होणारे नुकसान टाळता येते आणि रोपवाटिकेत जमिनीलगत आर्द्रता तयार होवून कलमा/रोपांची जोमदार वाढ होते. सूक्ष्म तुषाराद्वारे मिळणारे पाणी हे अतिशय असल्यामुळे नाजूक कलमा/रोपांना कोणत्याही प्रकारची इजाहोत नाही. तसेच सर्वसाधारणपणे २५-३०% पाण्याची बचत होते.
२. शेडनेट : सध्याबाजारामध्ये ५० आणि ७५ टक्के क्षमतेचे शेडनेट उपलब्ध आहेत. ५० टक्के शेडनेटच्या वापराने ५० टक्के सावली व ५० टक्के सूर्यप्रकाश आणि ७५ टक्के शेडनेटच्या सहाय्याने ७५ टक्के सवली व २५ टक्के सूर्यप्रकाश रोपवाटिकेतील कलमाना दिला जातो. लोखंडी अॅँगल व जीआय पाईपच्या सहाय्याने कायमस्वरूपी किंवा कमी खर्चात निलगिरी, सुरू व बांबूचा वापर करून तात्पुरते उन्हाळी हंगामापुरते शेडनेट हाऊस तयार करावे. उन्हाळी हंगामामध्ये कलमे शेडनेट ऊसमध्ये ठेवल्यास त्याचे अतिउष्णता व कडक सूर्यप्रकाश यापासून संरक्षण होते व कलमे चांगल्या गुणवत्तेची तयार होतात.
३. फॉगर्स व मिस्टरांचा वापर : उन्हाळ्यातील उष्ण व कोरड्या हावामानाचा कलमे व रोपांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते त्यासाठी फॉगर्स व मिस्टर्सचा वापर करावा.
त्यांच्या वापरामुळे उष्णता कमी होऊन हवेतील आद्रता वाढविण्यास मदत होते.त्यामुळे कलमे/रोपे ताजी व टवटवीत राहतात व जोमदार वाढ होते. फॉगर्स व मिस्टर्स चालविण्याकरिता जादा दाब निर्माण करु शकणाऱ्या विजेच्या पंपाचा वापर करावा. लपविण्याकरिता थोड्या कालावधीसाठी पंप सतत चालुबंद करावा लागतो. त्यासाठी पंपावर टायमर बसवावा, म्हणजे पंप आवश्यकतेनुसार आपोआप चालू-बंद होईल.
४. खत व्यवस्थापन :- रोपवाटीकेमध्ये कलमे/रोपे तयार करण्यासाठी खतव्यवस्थापन अतिशय महत्वाचे आहे. उन्हाळी हंगामात योग्य प्रकारे खत व्यवस्थापन केल्यास कलमे/रोपांची जोमदार वाढ होते.
डी.ए.पी. ५०-७० ग्रॅम प्रतिवाफा प्रतिमहिना पाणी देण्यापूर्वी द्यावा. तसेच पाण्यात विराघळणारी खते फवारणीद्वारे सुद्धा देता येतील. त्यासाठी १ टक्का तीव्रतेच्या द्रावणाची कलमे/रोपांच्या पानावर महिन्यातून एकदा फवारणी करावी. सूक्ष्म तुषार संघाची व्यवस्था असल्यास त्याद्वारे पाण्यात विरघळनारी खतेद्यावीत. खते देताना द्रावणाची तीव्रता योग्य त्या प्रमाणात ठेवणे अतिशय म्हत्वाचे आहे. कारण तीव्रतेच्या द्रावणामुळे कलमा/रोपांवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते.
५. माती मिश्रणावर प्रक्रिया करणे व पिशव्या भरणे :
कलमे रोपे तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे माती मिश्रण अतिशय महत्वाचे असते. या मिश्रणामध्ये पोयटा माती, चांगले कुजलेले शेणखत क्रिया कंपोस्ट, गांडूळखत इ.चा वापर करावा. सदरचे मिश्रण तयार करताना दोन भाग पोयटा मातीचे व एक भाग शेणखत, कंपोस्ट किंवा गांडूळखत यांचा असावा. पिशव्यामध्ये भरावयाचे मिश्रण हे उन्हाळी हंगामातच तयार करुन पाऊस लागणार नाही अशा ठिकाणी ठेवावे. माती मिश्रण पिशवीत भरण्यापूर्वी त्यावर काही प्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक असते. भातीमिश्रणात तणाचे बी, छाट, सूत्रकृमी, बुरशी, बॅक्टेरिया इ. असण्याची शक्यता असते. ते रुजणारा बीया, छाट कलमे, इ. ना हानिकारक असतात. वरील सर्व हानिकारक सूक्ष्म जीवांचा व तणांचा बियांचा नाश करण्यासाठी तापविण्याची व रसायनांची प्रक्रिया करणे अतिशय महत्त्वाचे आहे.
माती मिश्रण १४० अंश तापमानाला तापविल्यास हानिकारक जीवांचा नाश होऊन हितकारी जंतूंचा नाश होत नाही. तसेच माती मिश्रणावर पांढरा पॉलिथिन पेपर झाकून ठेवल्यास उन्हाळ्यातील ४०-५५ अंश से. तापमानामध्ये माती मिश्रणाचे चांगले निर्जंतुकीकरण होऊ शकते. माती मिश्रणावर प्रक्रिया करण्यासाठी फॉर्मालीन व मिथिल ब्रोमाईड या रसायनांचा व बुरशीनाशकांचा सुद्धा वापर करावा. सदरचे मिश्रण निर्जंतुकीकरण करून झाकून किंवा शेडमध्ये ठेवावे व गरजेनुसार त्याचा वापर करावा. जेणेकरून येणाऱ्या पावसात ते भिजणार नाही.
निर्जंतुकीकरण केलेले मिश्रण पिशव्या भरण्यासाठी वापरावे. आंबा व खिरणी रोपांच्या निर्मितीसाठी पिशव्यांचा वापर करावा. सदरच्या पिशव्या एप्रिल-मे महिन्यात भरून बियांच्या उपलब्धतेनुसार पिशव्यात पेरणी करावी.
६. कलमे/रोपांवरील किडींचे नियंत्रण :
रोपवाटिकेतील कलमा/ रोपांवर पाने कुरतडणाऱ्या अळ्या, रस शोषनाऱ्या किडी, कोळी, मावा इ. किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. उन्हाळी हंगामामध्ये रोपवाटीकेतील कलमा/रोपांचे किडींपासून संरक्षण करणे महत्वाचे आहे. त्यासाठी खालील उपाय योजावेत.
- पाने कुरतडणाऱ्या अळ्या : पाने कुरतडणाऱ्या अळ्या, कलमा/रोपांची नवीन पाने कुरतडून खातात. त्यामुळे कालमा/रोपे निस्तेज होऊन त्यांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम दिसून येतो. या किडीच्या नियंत्रणासाठी पॉलीट्रीन सि-४४-१० मिली किंवा स्पिनोसॅड ४५ एस.सी. ३ मिली किंवा इन्डोक्झॅकारब १४.५ एस.सी. १० मिली पाण्यात मिसळून १०-१५ दिवसाच्या अंतराने फवारणी करावी.
- रस शोषणाऱ्या किडी : या किडीमध्ये प्रामुख्याने कोळी, मावा, पिठ्या, ढेकुण यांचा प्रादुर्भाव जादा दिसून येतो. सदरच्या किडी कलम/रोपांच्या नवीन व जुन्या पानातील रस शोषून घेतात. त्यांचा अनिष्ट परिणाम कलम/रोपांच्या वाढीवर होतो. या किडींच्या नियंत्रणासाठी इमिडॅक्लोप्रीड ७० डब्लू एस ५ मिली पाण्यात मिसळून १०-१५ दिवस अंतराने फवारावे.
इतर महत्वाच्या बाबी :
१ ) वारा प्रतिबंधक वनस्पतीच्या ताटवा रोपवाटिकेभोवती लावावा. उदा. शेवरी, पांगरा इ. यामुळे उन्हाळी हंगामाप्रसंगी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे तसेच वादळामुळे रोपवाटिकेचे संरक्षण काही प्रमाणात करता येते.
२ ) रोपवाटिकेभोवती तसेच आतमध्ये चर खोदुन त्यात पाणी सोडावे विशेषतः एप्रिल में मध्ये हवेतील तापमान खुपच वाढले असताना या तंत्रामुळे रोपवाटिकेतील तापमान काहीसे कमी होऊन आर्द्रता वाढून त्याचा रोपे/कलमे यांच्या वाढीवर अनुकूल परिणाम होतो. अशा प्रकारे कलमा/रोपांची उन्हाळी हंगामामध्ये योग्य प्रकारे काळजी घेतली तर जातीवंत, शुद्ध व चांगल्या गुणवत्तेची कलमे/रोपे तयार करता येतात.
सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.