उन्हाळ्यात केळीची काळजी

0

साधारणतः फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून तापमानात वाढ होण्यास सुरुवात होते. त्याच वेळीस हवेतील आद्रतेचे प्रमाणही कमी – कमी होत जाते. वाऱ्याचा वेग वाढण्यास सुरुवात होते, जमिनीचे तापमान वाढते तसेच, सूर्यप्रकाशाचे एकुण तास व तीव्रता वाढीस लागते. उत्तर महाराष्ट्रात एप्रिल ते जूनमध्ये सोसाट्याचे वारे तसेच चक्रीवादळे येऊन खूपच नुकसान होते. केळीसाठी तापमानाचा अनुकूल पट्टा हा १६ ते ३५ अंश सें.ग्रे इतका आहे, उन्हाळ्यात तापमान ३५ सेंटीग्रेड पेक्षा जास्त असते. वाऱ्याचा वेग हा २० कि. मी प्रती तास यापेक्षा जास्तीचा असतो. काही ठिकाणी स्थानिक चक्रीवादळे येतात.

उन्हाळ्यात विहिरी, विंधन विहिरींच्या पाण्याची पातळी खोलवर जाते. त्यामुळे जेमतेम पाणीपुरवठा करतांना योग्य ते नियोजन करावे लागते. पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी आच्छादन, बाष्परोधकाचा वापर करावा लागतो. सूर्यप्रकाशाचा अधिकतम कालावधी तसेच तीव्रतेमुळे झाडांवर, पानांवर, फळांवर, फळदांड्यांवर चट्टे पडून नुकसान होते. फळांची गुणवत्ता खालावते, झाडे कोलमडणे, घड सटकणे अशा विकृती आढळून येतात.

थोडक्यात केळी हे ऊष्ण कटिबंधीय पिक असून योग्य वाढ, उत्पादन तसेच गुणवत्तेसाठी सर्वसामान्य तापमान तसेच आद्र्तेची गरज असते. महाराष्ट्रात ऊष्ण कटिबंधीय हवामान फक्त जुलै ते सप्टेंबर अखेरपर्यंतच असते. इतर काळातील हवामान फारसे अनुकूल नसते. तरीसुद्धा आपण केळी उत्पादनात अग्रेसर आहोत. जागतिक सरासरीपेक्षा २ ते २.५ पट जास्त आपली उत्पादकता आहे. या यशाची गुरुकिल्ली म्हणजे शेतकऱ्यांनी शास्त्रोक्त संशोधनाचा वापर , तसेच अनुभवाचा व संशोधनाचा योग्य मेळ घालून घेतलेले केळीचे चांगले उत्पादन.शेतकरी बांधव हे केळी पिकाची जवळ जवळ लागवड, लागवडीनंतरचे व्यवस्थापन करून पिकाची चांगली वाढ, उत्पादन आणि गुणवत्ता साधतात.वर्षभरातील जुलै ते सप्टेंबर हा कालावधी सोडला तर इतर काळातील हवामानाचे घटक हे केळीस अपायकारक असतात.

सद्यस्थितीत एकूण तीन – चार अवस्थेतील केळी बागा आपणास आढळून येतील . काही कापणीच्या, काही फळवाढीच्या, काही सूक्ष्म गर्भनिर्मितीच्या तर काही बाल्य अवस्थेत असतील. या चारही प्रकारच्या केळीबागा  हवामानाच्या ( विशेषतः उन्हाळ्यातील ) सर्व घटकांना अतिशय संवेदनशील अश्या आहेत. उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या या नैसर्गिक आपत्ती घटकापासून पिकांचे होणारे संभाव्य नुकसान टळावे म्हणून केळी बागांच्या व्यवस्थापनाचे योग्य नियोजन होणे गरजेचे ठरेल.

उन्हाळ्यातील व्यवस्थापनातील महत्वाच्या बाबी

१.वारारोधक कुंपण

सोसाट्याचा वारा अडवला जाऊन वाऱ्यामुळे पाने फाटणे, झाडे वाकणे, उन्मळून पडणे किंवा झाडे मध्यातून मोडणे, घड सटकणे, बाष्पीभवनाचा ( जमिनीतून व पानातून ) वेग वाढणे, पानांवर धूळ साचून प्रकाश संश्लेषण क्रियेचा वेग मंदावणे, जमिनी लवकर वाफसावरून कोरड्या होणे असे दृष्य व अदृष्य परिणाम होतात. या परिणामांची तीव्रता कमी होण्यासाठी बागेभोवती किमान पश्चिमेस व उत्तरेस वारारोधक कुंपण असावे.यात दोन प्रकार आहेत.

सजीव कुंपण- बाग लागवडीच्या वेळी बागेच्या कडेच्या ओळीपासून ६ ते ७ फुटांवर शेवरी, सुबाभूळ,गजराज गवत इत्यादीची लागवड करावी. तद्नंतर वेळेवर लागवड करावयाची असल्यास उंच वाढणारी तूर,बाजरी, मका यांच्या दोन ओळी दाट लावाव्यात.

निर्जीव कुंपण- सर्व साधारणतः उन्हाळ्याच्या सुरुवातीस उपलब्ध असणाऱ्या कपाशी पऱ्हाट्या, तुरीच्या तुरकाड्या, बाजरीचा कडबा यांचा वापर करून झापा करावा. या झापा बागेभोवती एकमेकास बांधून वारारोधक कुंपण करावे. या प्रकारचे साहित्य उपलब्ध न झाल्यास ५० टक्के शेडनेट कापडाचा वापर करून वारारोधक भिंत उभारावी.

.बागेची सर्वसाधारण स्वच्छता

बागा ताणमुक्त ठेवाव्यात. मुख्य खोडाशेजारी येणारी पिल्ले धारदार विळ्याने जमिनीलगत २ ते ३ आठवड्यातून      कापावीत. हि पिल्ले मुख्य पिकांशी हवा, पाणी, अन्न, सूर्यप्रकाश या बाबतीत स्पर्धा करतात. केळीची कोणतीही हिरवी पाने कापू नयेत. फक्त रोगग्रस्त पाने किंवा पानाचा भाग कापून नष्ट करावा. घडातील पूर्ण फण्या निघाल्यावर केळफूल कापावे. घडत इच्छित फण्यांची संख्या ठेवून खालच्या कमी दर्जा असणाऱ्या फण्यांची विरळणी करावी. केळफूल व कापलेल्या फण्या गुरांचे खाद्य म्हणून वापरावेत.

.बागेची आंतरमशागत व वाफेबांधणी

 बाल्य अवस्थेतील केळी बागेची उभी – आडवी कुळवणी करावी. मोठ्या बागेत टिचणी व बांधणी करून वाफ्यातील जमीन तडे विरहीत व भुसभुशीत करावी. वाफ्याची व्यवस्थित दुरुस्ती करावी.

.आच्छादन

उपलब्ध पाण्याचा पुरेपूर वापर करावा. जमिनीचे तापमान योग्य राखले जावे व तणांचे व्यवस्थापन व्हावे या उद्देशाने केळी बागेत आच्छादन करावे. आच्छादनासाठी उपलब्ध असलेला शेतातील काडी – कचरा, जुना गव्हाचा भुसा, सोयाबीन काड, बाजरी सरमट, केळीची रोगविरहित कोरडी पाने, बुंध्याच्या भोवती पसरावीत. सर्वसाधारणतः १० से.मी जाडीचा थर असावा. नवीन गव्हाचा भुसा आच्छादनासाठी वापरू नये. जर वरील सेंद्रिय आच्छादनाचे साहित्य उपलब्ध नसल्यास ३० मायक्रॉन जाडीचे चंदेरी – काळे प्लास्टिक पेपर ( मल्चिंग पेपर ) वाफ्यात अंथरावेत.

.बाष्परोधकाचा वापर

तापमान व सूर्यप्रकाशाची तीव्रता जास्त असल्यास व पाण्याची उपलब्धता कमी असल्यास पानांतून होणारे बाष्पीभवन रोखण्यासाठी ८ % ‘ केओलीन ’ या बाष्परोधकाची फवारणी करावी. यामुळे पानांवर पांढरा थर तयार होऊन त्यावरून प्रकाश किरणे परावर्तीत होतात. बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन पानाचे तापमानसुद्धा योग्य राखले जाते.

.पाणीपुरवठा

केळी पिक हे पाण्याच्या बाबतीत अतिशय संवेदनशील आहे. या पिकाच्या एकूण सर्वच अवस्थांमध्ये पाणी महत्वाचे असते. योग्य वेळी, प्रमाणात आणि योग्य पद्धतीने पाणी देणे गरजेचे आहे. जमिनीचा प्रकार, तापमान, पिकाची अवस्था, वाऱ्याचा वेग या सर्व घटकांचा विचार करून पाणीमात्रा व वेळ ठरवावी. अलीकडे एकूण केलीखालील क्षेत्रापैकी जवळपास सर्व केळी पिकास ठिबक सिंचन पद्धतीने पाणीपुरवठा केला जातो. वाफा पद्धतीच्या बागांना उन्हाळ्यात ४ ते ५ दिवसाच्या अंतराने पाणीपुरवठा करावा. ठिबक सिंचन पद्धतीत संचाची नियंत्रित देखभाल व दुरुस्ती महत्वाची ठरते. लागवडीपासून ३ महिने पर्यंतच्या बागेस प्रती दिन प्रती झाड ५ लिटर तर ४ ते ६ महिने पर्यंतच्या बागेस प्रती दिन प्रती झाड १५ ते २० लिटर व त्या पुढील वयाच्या बागांना २५ ते ३० लिटर पाणी प्रती दिन प्रती झाड द्यावे. हलक्या जमिनीत पाणी सरळ मुरते व ओलीतक्षेत्र टक्केवारी कमी असते. अश्या परिस्थितीत कमी पाण्यामुळे विकृती निर्माण होऊन वाईट परिणाम संभवतात. अशा वेळी जेथे पाणी पडते तेथे १ ते २ किलो शेणखत / गांडूळखत पसरावे. शिफारसीच्या मात्रेत पाणीपुरवठा केल्यास हवामानाच्या विपरीत घटकांच्या वाईट परिणामांची तीव्रता कमी होते.

.घड व्यवस्थापन

घडातील केळफूल व अतिरिक्त फण्या कापणीनंतर घडावर ०.००२५ % अॅसिटामिप्रिड किंवा ५ % निंबोळी अर्क यांची फवारणी करावी. यामुळे रस शोषणाऱ्या किडी जसे मावा, लालकोळी, फुलकिडी व तुडतुडे यांचे प्रभावी नियंत्रण करता येते. सध्या जैविक कीडनाशकाचा वापर सुद्धा प्रचलित आहे. यात व्हर्टिेसेलीअम लेकॅनी ३ ग्रॅम / लिटर या प्रमाणात फवारावे. घडावर त्यानंतर ०.५ % पोटॅशियम हायड्रोजन फॉस्फेट + १ % युरियाच्या संयुक्त द्रावणाची फवारणी करावी.

.घड झाकणे

घडावर फवारण्या केल्यानंतर घड दांड्यासहित झाकावेत. घड झाकणीसाठी ४ ते ६ % सच्छिद्र असलेली १०० गेज जाडीची पांढऱ्या रंगाची प्लास्टिक बॅग वापरावी. पिशवी घडाच्या दांड्यावर वरच्या बाजूस सुतळीने बांधावी व खालची बाजू मोकळीच ठेवावी यामुळे घडाच्या आजूबाजूस सूक्ष्म वातावरण निर्मिती होते. फळवाढीस चालना मिळून घडाचे तीव्र सूर्यप्रकाशापासून संरक्षण होते.

.झाडांना आधार देणे

निसवलेल्या तसेच फळवाढीच्या अवस्थेत असणारी झाडे हि घड असलेल्या दिशेने कलतात, थोड्याश्या वादळाने घडासहित झाडे मध्यातून मोडतात किंवा उन्मळून पडतात, यामुळे घडाचे नुकसान होते. घड निसवन्यापुर्वी वाफ्याची बांधणी करून झाडांना मातीने आधार द्यावा. तसेच उपलब्ध झाडांच्या फांद्या वापरून घडास / झाडास टेकू लावून आधार द्यावा. अलीकडे शेतकरी पॅकिंग पट्ट्यांचा वापर करून झाडे एकमेकांना बांधून आधार देतात.

१०.योग्य वेळी कापणी

घडांची योग्य वेळी कापणी करून कमीतकमी हाताळणी होईल अशी व्यवस्था करून घडांची विक्री करावी.

https://krushisamrat.com/improved-method-of-cultivation-of-banana-and-practical-benefits/

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.