सध्या पावसाचे प्रमाण चांगले असल्यामुळे हळदीच्या शेतात पाणी साचून राहिल्याने कंदकुज रोगाचा प्रादुर्भाव दिसतो. हा रोग बुरशी किंवा जिवाणूंमुळे होतो. कंद्कुज बुरशीजन्य आहे कि जिवाणूजन्य आहे ते ओळखून मगच नियंत्रणाचे उपाय करावेत.
बुरशीजन्य कंदकुज प्रतिबंधासाठी जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा प्लस दोन ते अडीच किलो प्रतिएकरी २५० ते ३०० किलो सेंद्रिय खतामध्ये मिसळून दोन महिन्याच्या अंतराने दोन ते तीन वेळा वापरावे. पाण्याचा योग्य निचरा ठेवावा.कंदकुजीस सुरुवात झाल्यानंतर कॉपर ऑक्झी क्लोराईड ४ ते ५ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यामध्ये मिसळून किंवा १ % बोर्डो मिश्रणाची आळवणी करावी. रोगाची तीव्रता जास्त असल्यास, मेटालॉक्झिल ८% अधिक मॅन्कोझेब ६४% ( संयुक्त बुरशीनाशक ) ४ग्रॅम प्रतिलिटर पाण्यामध्ये मिसळूनआळवणी केल्यानंतर पिकास थोडासा पाण्याचा ताण द्यावा. गरज वाटल्यास पुन्हा एकदा वरील औषधांची आळवणी करावी.
जिवाणूजन्य कंदकुज ओळखण्यासाठी रोगग्रस्त पाल्याचा भाग धारदार ब्लेडने कापून स्वच्छ काचेच्या ग्लासमध्ये पाणी घेऊन त्याचे टोक त्यामध्ये बुडवावे, त्यामधून दुधासारखा स्त्राव पाण्यामध्ये आल्यास जिवाणूजन्य कंदकुज आहे हे ओळखावे.जिवाणूजन्य कंदकुज असल्यास स्ट्रेप्टोमायसीन २ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून आळवणी करावी.
ढगाळ वातावरण सतत राहिल्यास आणि आर्द्रता ९० % चे वर राहिल्यास करपा रोगाचा प्रादुर्भाव होतो. करपा रोगाच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्झी क्लोराईड ३ग्रॅम किंवा हेक्झाकोनाझील १ मि.ली. प्रतिलिटर पाण्यात मिसळूनफवारणी करावी. फवारणीच्या द्रावणात सर्फेक्टंटचा वापर करावा.
सौजन्य:- डॉ. देविकांत देशमुख, प्रमुख शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, पोखर्णी.
महत्वाची सूचना :- सदरची माहिती हि कृषी सम्राट यांच्या वैयक्तिक मालकीची असून आपणास इतर ठिकाणी ती प्रसारित करावयाची असल्यास सौजन्य:- www.krushisamrat.com असे सोबत लिहणे गरजेचे आहे.

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.