हळद पीक- लागवड आणि तंत्रज्ञान

2

जगाच्या ८०% हळदीचे उत्पादन दरवर्षी एकट्या भारतात घेतले जाते. पण भारतातील त्याचा प्रचंड वापर बघता, केवळ २०% हळद दरवर्षी निर्यात होते. हळद उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र हे भारतात सहाव्या क्रमांकाचे राज्य आहे. रोजचा आहार, आयुर्वेदिक औषधे, सौंदर्य प्रसाधने, जैविक कीटकनाशके आणि अशा अनेक पदार्थांमध्ये हळदीचा वापर मुख्य घटक म्हणून केला जातो. सामाजिक कार्यात हळदीला अत्यंत महत्त्व आहे. कोणतेही मंगलकार्य आणि धार्मिक कार्यक्रम असो, पूजा, भंडारा, लग्नकार्य अशा सर्व ठिकाणी हळद भरपूर प्रमाणात वापरली जाते. हळद हे प्रमुख मसाला पीक म्हणून ओळखले जाते.

हळदीचे आरोग्यविषयक बरेच फायदे आहेत. रक्त शुद्ध करण्याचे काम करते. त्वचेचा रंग उजळतो. डाळीचे पीठ आणि हळद मिश्रित करून स्नान केल्यास कांती उजळते. सध्या हळद लागवडीमध्ये बरेच यांत्रिकीकरण झाल्यामुळे महाराष्ट्रात हळद पिकवण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हळदीमध्ये चांगले उत्पन्न घेता येऊ शकते. याची कारणे अशी आहेत. हळदीच्या दरांत कायम चढउतार होत असतात. हळदीचे चांगले वाण लावणारे क्षेत्र फार कमी आहे. सेंद्रिय खतांची कमतरता भासते. त्याचप्रमाणे मशागतीला येणारा खर्च जास्त असतो. हळदीची बाजारपेठ अनियंत्रित आहे. यांत्रिक पद्धतीने हळदी पिकाची काढणी करावी लागते. या सर्व बाबींचा विचार करता, हळद लागवड जास्तीत जास्त केल्यास भरपूर उत्पादन आणि उत्पन्न येवू शकते.

उपयुक्त हवामान-

मे ते जून महिन्यात हळदीची लागवड करण्यासाठी अनुकूल हंगाम असतो. ३० अंश ते ३५ अंश सेल्सिअस एवढे तापमान असलेले उष्ण आणि कोरडे हवामान हळदीला चांगले मानवते. वाढीच्या काळात ३० अंश सेल्सिअस आणि समशीतोष्ण हवामान योग्य असते. परंतु तापमान 11 अंश सेल्सिअसच्या खाली गेल्यास पिकाची वाढ खुंटते. तसेच नोव्हेंबर ते जानेवारी या काळात थंड हवामान असूनही हळद पीक घेता येते कारण हळदीचे कंद भरण्यासाठी हिवाळी थंड हवा अनुकूल असते. मध्यम पाउस आणि स्वच्छ सूर्यप्रकाश यातही पिकाची चांगली वाढ होते. प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडला आणि शेतात पाणी साचून राहिले तर पिकाची अवस्था ढासळते. पण थंडीमध्ये पानांची वाढ थांबते तर कंदांची वाढ चांगली होते. महाराष्ट्राच्या ज्या भागात उसाची बागायत जास्त आहे किंवा ओलिताखाली क्षेत्र जास्त आहे, तिथे हवेतील दमटपणा हळदी पिकाच्या वाढीसाठी अनुकूल असतो. महाराष्ट्रातील हवामान हळद लागवडीस अत्यंत अनुकूल असल्यामुळे हळदीच्या क्षेत्रात वाढ होण्यास इथे खूप वाव आहे.

 

लागवडीसाठी योग्य जमीन-

समुद्रसपाटीपासून १५०० मीटर उंचीवर असलेली जमीन हळद लागवडीसाठी उपयुक्त असते. पण चांगले उत्पादन मिळण्यासाठी लागवडीपूर्वी शास्त्रीय दृष्टीकोनातून जमिनीची पूर्वमशागत करावी. हळद लागवडीचे यश हे आपण कोणती जमीन निवडतो यावरच अवलंबून असते. क्षारयुक्त, पाणथळ, चिबड, पाण्यचा पूर्ण निचरा न होणारी, उन्हामुळे कडक होणारी जमीन हळदीचे पीक चांगल्याप्रकारे उत्पादित करू शकत नाही. मध्यम काळी, भुसभुशीत आणि कसदार जमीन या पिकासाठी निवडावी. जमिनीची खोली २५ ते ३० सेमी असावी. आधी हळद लागवड केली असेल तर त्या जमिनीवर पुन्हा हळद लागवड करू नये. कारण हळदीच्या पिकावर पडलेल्या रोगांची बीजे व किडींचे कोष जमिनीत सुप्तावस्थेत असतात. त्यामुळे हळदीची पुन्हा लागवड केल्यास कीड आणि रोगाचा पुन्हा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यात हरळी, कुंद

, लव्हाळी असे तण नसावेत. असल्यास ते मुळासकट उपटून जाळून टाकावेत. अगोदरच्या पिकांच्या काड्या उचलून घ्याव्यात. टमाटे, वांगे, मिरची, तंबाखू, बटाटे या पिकांनंतर हळद लागवड करू नये. कारण या पिकांमुळे जमिनीतून उद्भवणारे रोग पुन्हा हळद पिकावर येतात.  हळद लागवड करण्यापूर्वी जमिनीचे भौतिक, रासायनिक, जैविक गुणधर्म व जमिनीचा पोत, जडण-घडण या सर्वांचा सखोल अभ्यास करावा. हलक्या, माळरानाच्या जमिनीतसुद्धा हळदीचे पीक घेता येते. पण माळरान जमिनीवर भरघोस पीक घ्यायचे असल्यास सूक्ष्म अन्नद्रव्ये वापरल्यास, जमिनीची सुपीकता वाढवल्यास, चांगली मशागत केल्यास हे पीक चांगले उत्पन्न मिळवून देवू शकते. कुजलेले शेणखत उपलब्ध असल्यास ते एकरामागे १० ते १२ अशा प्रमाणात शेतावर पसरून टाकावे. शेणखत नसेल तर गांडूळ खत, कंपोस्ट खत, मासळी खत, गवताची पेंड अशी खते वापरावीत. चुनखडीयुक्त जमिनीत हळद पीक घेतल्यास ते पिवळे पडते आणि पूर्ण वाढ होत नाही तसेच अन्नद्रव्यांची कमतरता जाणवते. पाणी साचून राहणाऱ्या जमिनीत हळदीचे कंद नासतात. हळदीचे कंद चांगले पोसले जावेत म्हणून जमिनीमध्ये हवा खेळती राहणे आवश्यक आहे. हळद लागवड करण्यापूर्वी जमिनीची उभी-आडवी नांगरणी करून घ्यावी. मातीची ढेकळे फोडावीत. आम्लधर्मी जमिनीत हळदीचे पीक चांगले येत नाही. जास्त पाउस पडणाऱ्या भागातील तांबडी जमीन हळदीसाठी उत्तम असते. अशा जमिनीत खत आणि पाणी व्यवस्थापनही चांगले होते. काळ्याशार जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमत जास्त असते म्हणून हळदीचे पीक त्यामध्ये जास्त येत नाही. पूर्वीचे पीक काढल्यावर हळदीचे पीक लागवड करण्यापूर्वी जमिनीची १८ ते २२ सेमी खोल नांगरणी करावी. मे महिन्यात जमीन चांगली तापल्यावर वखराने दुसरी नांगरणी करावी.

हळदीच्या बेण्याची निवड-

बेण्याची सुप्तावस्था संपलेली असावी. हे बेणे रोगमुक्त आणि कीडमुक्त असावे. बेण्याची लागवड करण्यापूर्वी १५ दिवस अगोदर बेण्यावर पाणी मारावे. मऊ बेणे लागवडीसाठी योग्य नसते कारण त्यावर कीटकांचा प्रादुर्भाव झालेला असतो. बेण्याम्ध्ये इतर जातींची भेसळ नसावी. बियाणे पेरण्यापूर्वी स्वच्छ करून घ्यावे. एक एकरला हळदीचे १००० किलो बियाणे लागते. या कंदापासून तयार केलेल्या ३० दिवसांच्या वयाच्या रोपापासून लागवड करण्याचीही पद्धत आहे.

खते व्यवस्थापन-

हळद पिकासाठी जीवाणू खते विकत आणल्यावर ती सर्व पाकिटे सावलीत आणि थंड ठिकाणी ठेवावीत. सूर्यप्रकाश आणि अतिउष्णतेपासून रक्षण न केल्यास त्यातील जीवाणू मरतात. जीवाणू खते ही रासायनिक खते नसतात, त्यामुळे ती रासायनिक खतांसोबत मिसळून जमिनीला घालू नयेत. कीटकनाशक किंवा बुरशीनाशक फवारायचे असेल तर आधी ते फवारावे आणि मग जीवाणू खतांची प्रक्रिया करावी. ज्या बियाण्यांवर जैविक खताची प्रक्रिया केली आहे, ते वाळवू नयेत. एक तासाच्या आत ती पेरणी करावीत. हळद पिकासाठी खतामधील घटकांची कमी–अधिक प्रमाणात गरज असते. काही शेतकऱ्यांचा असा अनुभव आहे की रासायनिक खतांमुळे हळद पिकावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे शक्य तेवढ्या प्रमाणात आपण सेंद्रिय खतांचा वापर करावा. सेंद्रिय खतांमध्ये कोंबडी खत आणि गांडूळ खत अत्यंत महत्त्वाचे आहे. लागवडीच्या वेळी ही खते द्यावीत. कोंबडी खताचा वापर केल्यास कंद पोसले जातात आणि उत्पादन वाढते. एकरामागे १० टन शेणखत, २ टन गांडूळ खत, २०० किलो सुपर फॉस्फेट कोबडी खतात मिसळून ते जमिनीला द्यावे. रासायनिक खतांमध्ये एकरामागे ८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद, ६० किलो पालाश देण्याची पद्धत आहे. यामधून गंधक आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये मिळतात. खत पेरतांना खोल जागा करावी कारण नंतर याच खड्ड्यात कंदांची लागवड करायची असते. लागवडीनंतर ४५ दिवसांनी कॅल्शिअम अमोनिअम नायट्रेट एकरामागे १०० किलो द्यावे.

हळद पिकाची आंतरमशागत-

हळदीचे कोंब उगवत असतांना तण वाढू देवू नये. वेळोवेळी आवश्यकतेप्रमाणे खुरपणी करून तण काढावे. रासायनिक खतांची मात्रा १ ते दीड महिन्यांनी द्यावी.

 

https://krushisamrat.com/control-of-diseases-of-turmeric-crop/

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

 

2 Comments
  1. Anonymous says

    3

  2. […] हळद पीक- लागवड आणि तंत्रज्ञान […]

Leave A Reply

Your email address will not be published.