रासायनिक शेतीचे सेंद्रिय शेतीत संक्रमणाचे टप्पे भाग – २

2

आपल्या शेताचे सेंद्रिय शेतीत रूपांतरणाचे मुख्यतः तीन टप्पे आहेत.

१) सेंद्रिय शेती पद्धती बद्दल संपूर्ण माहिती मिळवणे.

२) यातील आपल्या वातावरणात आणि शेतीच्या प्रकारात मानवणारी सेंद्रिय शेती पद्धती आपल्या शेताच्या लहान तुकड्यात प्रयोग करावी.

३) यशस्वी झालेली सेंद्रिय शेतीची पद्धत आपल्या संपूर्ण शेतात वापरावी.

हे टप्पे आपण आता सविस्तर जाणून घेऊ.

१) सेंद्रिय शेती पद्धती बद्दल संपूर्ण माहिती मिळवणे:

यशस्वी सेंद्रिय शेतकरी बनण्यासाठी नैसर्गिक घटकांचा उदा. किटक, मित्रकिड, जमीनीतील सूक्ष्मजीव इ. गुणधर्म आणि कार्यपद्धती समजून घेणे आवश्यक आहे. आपल्या परिसरातील सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना भेटून त्यांच्या कडून माहिती मिळवावी. काही अडचणी असतील तर त्या समजून घ्याव्यात. शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती सुरू करण्याआधी खालील बाबींचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे.

1) शेतजमिनीची / मातीची सुपीकता कशी वाढवावी.

2) आपले पीक निरोगी कसे ठेवावे.

3) आपल्या शेतात नैसर्गिक घटकांची विविधता कशी वाढवावी.

4) आपल्या जनावरांना निरोगी कसे ठेवावे.

5) आपल्या शेतात पिकलेल्या मालाची किंमत कशी वाढवावी आणि ते अधिक किमतीत कसे विकावे.

२) सेंद्रिय शेतीची पद्धत जाणून घेणे:

सेंद्रिय शेती बद्दल संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर व त्याचा अभ्यास केल्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सेंद्रिय शेतीची सुरुवात करावी. सुरुवात करताना शेताचा लहान तुकडा निवडावा. त्या तुकड्यात आपल्याला सेंद्रिय शेतीचे प्रयोग करायचे असते. हे प्रयोग सुरू करताना आपल्याला कमी भांडवल लागेल, कमी मजुरी लागेल, आणि यात नुकसान जरी झाले तरी त्याचा आपल्यावर जास्त परिणाम होणार नाही याची दक्षता घ्यावी.

 

सेंद्रिय शेतीमध्ये खालील बाबींचा समावेश होतो :

1) आच्छदन/मल्चिंग : शेतजमीनीवर पिकांचे कापणीनंतर राहीलेले अवशेष आच्छादन करावे. यामुळे तणावर नियंत्रण ठेवता येते. आणि जमीनीत ओलावा टिकून राहतो.

2) आंतरपिके : सेंद्रिय शेतीत एकच पिक घेतले जात नाही. बरेचसे शेतकरी सेंद्रिय शेती करताना हीच चूक करतात आणि त्यामुळे सेंद्रिय शेती यशस्वी होत नाही. सेंद्रिय शेतीत एका तुकड्यात दोन किंवा तीन पिके एकाच वेळी घेतले जातात. एक कडधान्य एक धान्य पिक आणि एक भाजीपाला पिक असे मिश्र पद्धतीने शेती केली जाते. या पद्धतीत पिकांची निवड करताना पिके एकमेकांशी पाणी आणि पोषक घटकांसाठी स्पर्धा करणार नाही याची काळजी घ्यावी

3) कंम्पोस्ट : सेंद्रिय शेतीत कंपोस्टचा वापर करणे सर्वात फायदेशीर आहे. कंपोस्ट खत तयार करण्यासाठी शेतातील पालापाचोळा, कापणीनंतर राहीलेले पिकांचे अवशेष, जनावरांचे मलमूत्र यांचा वापर केला जातो. कंपोस्ट तयार करण्यासाठी शास्त्रिय पद्धत च वापरावी. कंपोस्ट तयार करण्यासाठी त्याबद्दल चे ज्ञान, अनुभव आणि शेतमजूरांची गरज लागते पण हे बनवण्याचा खर्च अत्यल्प लागते.

4) हिरवळीचे खत : शेतात नायट्रोजन चा साठा वाढवण्यासाठी हिरवळीच्या खतांचा वापर करतात. हिरवळीच्या खताने जमिनीची सुपीकता वाढते. यासाठी शेतात डाळवर्गीय पिकांची लागवड केली जाते. आंतरपिक म्हणून यांचे विशेष महत्त्व आहे. हिरवळीच्या खतांबद्दलचे ज्ञान आणि त्याच्या जाती, आपणांस योग्य ते पिक निवडण्यास मदत करते.

5) जैविक किडनियंत्रण : किड आल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा किड येवू नये यासाठी सेंद्रिय शेतीत व्यवस्थापन केले जाते. सहसा किडीला बळी न पडणारे पिक निवडावे. पेरणीच्या वेळेत बदल करणे म्हणजे वातावरणानुसार होणारा किडींच्या हल्ल्याची तीव्रता कमी करता येईल, जमिनीचे स्वास्थ राखून जमिनीतील किडींच्या त्रास कमी करता येईल, पिकांची फेरपालट, मित्रकिडीबद्दल जाणून घेऊन त्यांची वाढ करणे, किडींच्या नैसर्गिक शत्रू मार्फत नियंत्रण ठेवणे, बांधावर थोडे उंच पीक लावून किडीसाठी अडथळा निर्माण करणे, ट्रॅपरचा वापर करणे.

6) सेंद्रिय बियाण्याची निवड : बियाण्याची किंवा रोपांची निवड करताना ते निरोगी आहेत की नाही याची खात्री करून घ्यावी. योग्य बियाण्याची निवड व त्यावर बिजप्रक्रिया ह्या दोन्ही गोष्टी सेंद्रिय शेतीत खूप महत्त्वाच्या आहेत. शक्यतोवर देशी बियाण्याची निवड करावी कारण त्या आपल्या वातावरणात वाढलेल्या असतात.

7) सेंद्रिय खत आणि औषधे : जीवामृत, पंचगव्य, पंचकव्य, गांडूळखत गांढूळपाणी, दशपर्णी अर्क, नीमतेल इ. बनवण्याची पद्धत तसेच वापराचे ज्ञान यावर आपले उत्पादन अवलंबून आहे.

३) संपूर्ण सेंद्रिय शेतीचा विकास :

सेंद्रिय शेती चे लहान लहान प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आणि आपल्याला आत्मविश्वास आल्यावर संपूर्ण शेती चे सेंद्रिय शेतीत रूपांतरण करू शकतात.

यानंतर शेतकरी सेंद्रिय शेती चे प्रमाणपत्र मिळवू शकतात. हे प्रमाणपत्र मिळवणे अत्यावश्यक आहे. कारण त्याद्वारेच आपले उत्पादन हे सेंद्रिय म्हणून विकले जाईल आणि आपल्याला सेंद्रियचा दर मिळेल. PGS प्रणाली ही सर्वात कमी खर्चिक प्रमाणपत्र मिळवण्याची पद्धत असून त्याद्वारे आपल्या स्वतः सोबत आपल्या शेतकरी समुहाचा देखील विकास होईल.

भावेश सोमाणी  – 8329215490 

https://krushisamrat.com/the-importance-of-organic-farming/

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

2 Comments
  1. […] रासायनिक शेतीचे सेंद्रिय शेतीत संक्र… […]

Leave A Reply

Your email address will not be published.