पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड पपई, कोबीने साधली उन्नती

0

औरंगाबाद / बाबासाहेब मुजमुले
परभणी जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या मागे दरवर्षी सातत्याने निसर्गाचे शुक्लकाष्ट लागल्याचे आपण पाहतो. अशा निसर्गाच्या अवकृपेखाली नानाविध संकटांशी दोनहात करीत येथील बळीराजा स्वतःसह इतरांच्या उदरनिर्वाहासाठी शेती पिकवतो आहे. निसर्गाला दोष देत रडत-कुडत बसणारे अनेक शेतकरी आपण पाहतो. पण या निसर्गाशी संघर्षरत शेतात विविध प्रयोग करणारा शेतकरी एक आशेचा किरण घेऊन येतो. असाच एक तरूण युवा शेतकरी मौजे केकरजवळा ता. मानवत येथील रंगनाथ लाडाणे याचे नाव घ्यावे लागेल. आपल्या शेतीला आधुनिकतेची जोड देत लाडाणे यांनी शेंद्रीय पद्धतीने शेती करत जिल्ह्यातील शेतकर्‍यांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.

रंगनाथ लाडाणे यांना 17 एकर शेती आहे. त्यातून 5 एकर पपई आणि 2 एकर कोबीचे उत्पन्‍न घेतले आहे. पपईचे तैवान 786 या वाणाची लागवड बेड पद्धतीने 6 बाय 8 अशा अंतरावर केली. त्यात शेंद्रीय खतांचा वापर केला आहे. तसेच कोबी या पिकाची लागवड अडीच बाय एक अशा अंतराने केली आहे. यातही शेंद्रीय खताचा वापर केला आहे. लाडाणे यांचे अशी जैविक व रासायनिक पद्धतीने शेती करण्याचे हे पहिलेच वर्ष असल्याने मनात यशापयशाबाबत धाकधुकच होती. पण शेंद्रीय खतांचा सकारात्मक परिणाम दिसून आल्याने लाडाणे यांना दिलासा मिळाला.

रंगनाथ लाडाणे यांनी 5 एकर पपई पीक घेण्यासाठी सुमारे दोन ते अडीच लाखांचा खर्च केला. पपई आणि कोबी या दोन्ही पिकांसाठी पाणी व्यवस्थापन ठिबक सिंचनाद्वारे करण्यात आले. यामुळे पाण्याची मोठी बचत करण्यास मदत झाली. यासाठी विहीरीसह एक बोअरही घेतला आहे. यातून पहिला बहार परभणी, मानवत आणि पाथरी येथील बाजारात विक्रीस गेला. यातून आत्तापर्यंत 5 लाखांचे उत्पन्‍न मिळविले आहे. या बागेेतून आणखी दोन ते तीनपट उत्पन्‍न निघण्याची अपेक्षा लाडाणे यांना आहे. पपईपासून 15 ते 20 लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची आशा असून सद्या बाजारात पपईला कमी भाव असल्याची खंत त्यांनी व्यक्‍त केली. कोबी या पिकाच्या लागवडीसाठी 50 हजार रुपये खर्च करण्यात आला. यातून एक बहार काढणीस आला असून उत्पन्‍न चांगल्या पद्धतीने निघण्याची अपेक्षा लाडाणे यांना आहे. यासाठी पूूर्वमशागत उत्तम प्रकारे केल्याने उत्पन्न अधिक निघण्याची अपेक्षा आहे.

दोनशे ट्रॅक्टर शेणखताचा वापर लाडाणे यांनी जमीनीचा पोत सुधारण्यासाठी शेतात शेणखताचा चांगल्याप्रकारे वापर केला. त्यांच्याकडे 13 गायी आणि 2 म्हशी आहेत. यातून मिळणार्‍या शेणापासून 200 ट्रॅक्टर शेणखत शेतात वापरले. यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत झाली.

शेतकर्‍यांच्या मालाला चांगला भाव न मिळाल्याने शेतकरी नेहमीच तोट्यात आहे. शासन हमी भावाप्रमाणे शेतकर्‍यांच्या मालाला भाव मिळाला पाहीजे आम्ही रात्रंदिवस शेतात कष्ट करत असून व्यापार्‍यांचे खीसे भरले जातात. यामुळे शेतकर्‍याला तोटा सहन करावा लागत आहे. शेतकर्‍यांच्या पिकाला व्यापारी भाव न देता शासन हमीभाव देण्यात यावा.

 

-रंगनाथ लाडाणे, शेतकरी.

 

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

Leave A Reply

Your email address will not be published.