खाडेवाडीच्या माणिक मुरकुटे यांची आदर्श शेती
बीड
उच्च शिक्षण घेतल्यानंतर नोकरी मिळाली नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा शेतीमध्ये काहीतरी करून दाखवण्याच्या जिद्दीने माजलगाव तालुक्यातील खाडेवाडी येथील शेतकरी माणिक मुरकुटे यांनी सीताफळाच्या एक एकरच्या बागेमध्ये आंतरपीक म्हणून चवळी आणि वांग्याचे यशस्वी पीक घेतले आहे. दुष्काळी परिस्थितीमध्येही त्यांना त्यापासून एकरी 3 लाख रुपयांचे उत्पादन मिळणे अपेक्षित आहे.
खाडेवाडी येथील माणिक मुरकुटे यांनी शिक्षण झाल्यावर शेतीमध्ये काहीतरी करून दाखवण्याचे ठरवले. शेतीला जोड म्हणून ऊसतोड मुकादमकीचा व्यवसाय सुरू केला. घरची 10 ते 12 एकर जमीन असल्याने त्यांनी ऊस या पिकाला प्रथम प्राधान्य दिले. मात्र उसाला लागणारे पाणी पाहता आणि चार ते पाच वर्षांपासून कमी पडत असलेला पाऊस पाहता मुरकुटे यांनी वेगळ्या पिकाकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी फळबाग लागवडीचा निर्णय घेतला. सोलापूर जिल्ह्यातील बर्याच सीताफळांच्या बागांना त्यांनी भेट दिली. गोल्डन या जातीची सीताफळाची रोपे बार्शी येथून आणली. एकरी 360 रोपे लागली. 40 रुपये दराने रोप मिळाल्याने लागवड खर्चही बराच झाला. 14 बाय 8 फुटावर जून 2018 मध्ये सिताफळ रोपांची लागवड केली. पाण्याचे नियोजन ठिबकच्या माध्यमातून करण्यात आले. दोन ओळीतील अंतर 14 फूट असल्याने आंतरपीक घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. कापूस व इतर कोणतेही पीक न घेता त्यांनी भाजीपाल्याची पिके घ्यावी, असा सल्ला त्यांना काही जाणकारांनी दिला. त्यानुसार मुरकुटे यांनी अंकुर जातीची वांग्याची रोपे व चवळीची लागवड 7 फुटावर केली. चवळीच्या 2 ओळी तर वांग्याची एक ओळ या पद्धतीने सीताफळाच्या बागेत आंतरपीक म्हणून लागवड केली. आतापर्यंत त्यांना या दोन्ही आंतर पिकांमधून दीड लाख रुपयांचे उत्पादन मिळाले असून त्यांचे वांग्याचे पीक मे महिन्यापर्यंत काढणीस येईल. त्यामुळे त्यातून आणखी दीड लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. सुरुवातीला त्यांनी भाजी मार्केटमध्ये चवळी आणि वांगी पाठवली, मात्र त्यांना अपेक्षित भाव न मिळाल्याने आठवडी बाजारात विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते सिरसाळा, दिंद्रुड, सोनपेठ, परळी, आणि वडवणी येथील बाजारात स्वतः वांगी व चवळीची विक्री करतात. त्यातून चांगला दरही मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
आठवड्यातून एक वेळा फवारणी व खताचे व्यवस्थापन केले जाते. त्यामुळे दोन्ही आंतरपिके जोमात असून रोगमुक्त आहेत. त्यांना आतापर्यंत चवळी आणि वांगी या पिकासाठी अंदाजे 50 हजार रुपयेपर्यंत खर्च आला असून या दोन्ही आंतरपिकातून चार महिन्यात 2 ते अडीच लाख रुपयांचा नफा अपेक्षित आहे. भाजीपाल्याची शेती योग्य व्यवस्थापन व सातत्याने केली तर शेती फायदा देणारी होऊ शकते हे मुरकुटे यांनी दाखवून दिले आहे.