गंगापूर तालुक्यातील भयावह परिस्थिती
आता ‘एक लढा जलक्रांतीचा’
संतोष जाधव छेडणार महा जनआंदोलन
नांदूर मधमेश्वर कालव्याचे पाणी देण्याची मागणी
गंगापूर / प्रतिनिधी
गंगापूर तालुक्यातील लासूरस्टेशन परिसरात असलेल्या 55 गावांची तहान भागावी या उद्देशाने शासनाने अनेक योजनांच्या माध्यमातून आतापर्यंत कोट्यवधींचा चुराडा केला आहे, मात्र प्रशासकीय पातळीवर नियोजनाचा अभाव आणि अधिकार्यांची उदासिनता यामुळे या गावातील नागरिकांची तहान भागवणे कठीण झाले आहे. अशी भयावह परिस्थिती गेल्या दशकापासून असून प्रशासन यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याऐवजी आपल्या हिताचे सोन्याचे अंडे देणारे टँकर सुरू करून मलमपट्टी करत आहे. हा प्रकार थांबवून या 55 गावांची तहान भागविण्यासाठी आता जि. प. चे माजी सभापती संतोष जाधव यांनी परिसरात नांदूर मधमेश्वर कालव्यातील पाणी देण्याची मागणी केली आहे. त्यासाठी लवकरच ‘एक लढा जलक्रांतीचा’ या माध्यमातून महा जनआंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
गंगापूर, वैजापूर विधानसभा मतदारसंघातील शिल्लेगाव परिसरात असलेले नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून पाण्यासाठी त्रस्त आहेत. हा परिसर गेल्या 10 वर्षांपासून सलग दुष्काळी छायेत असून शेतीचे सिंचन तर कोसो दूर राहिले असून उलट सर्व नागरिकांना आपला जीव, पशूधन वाचविण्यासाठी पाण्याच्या शोधात दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे. या भागात निसर्गाची कायमच अवकृपा होत असल्याने शासनाने देखील उपाययोजन केल्या आहेत. त्यात या गावांसाठी वरदान ठरलेल्या शिवना नदीवर 7 कोल्हापुरी व सिमेंट बंधारे, मार्तंडी नदीवर सलग 35 साखळी सिमेंट बंधारे, नारळी नदीवर 6 कोल्हापुरी व सिमेंट बंधारे यासह शिल्लेगाव-शिरेगाव मध्यम प्रकल्प, गवळीशिवरा पाझर तलाव, गोळेगाव पाझर तलाव यासह विविध गावात छोटे-मोठे साठवण तलाव यांचा समावेश आहे. यासाठी शासनाने एकूण 431 कोटी रुपये खर्च केले आहेत. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, भारत निर्माण, राष्ट्रीय पेयजल, मुख्यमंत्री पेयजल, वित्त आयोगासह विविध योजना अंतर्गत 133 कोटी रुपये खर्च केले, मात्र करोडो रूपयांचा चुराडा करूनही आज घडीला निर्माण केलेल्या या योजना पूर्णतः बंद आहेत. या टंचाईग्रस्त 55 गावात गेल्या 10 वर्षांपासून तात्पुरत्या स्वरुपात टंचाई अंतर्गत पाण्याचे टँकर कायमस्वरूपी सुरु असून त्याचा मार्च 2018 पर्यंत गेल्या 10 वर्षातील खर्च तब्बल 281 कोटी 74 लक्ष रुपये झालेला आहे. शिवाय याच कालवधीत या 55 गावातील बंद पाणी पुरवठा योजनेचे वीज बिल एकूण 9 कोटी 14 लक्ष 63 हजार इतके आहे. गेल्या दशकभरात केवळ पाण्यावर एकूण 854 कोटी 88 लक्ष 63 हजार रुपये खर्च करून देखील अद्यापही या गावांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची शाश्वत व्यवस्था नाही. यावर गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नांदूर मधमेश्वर कालव्याची लांबी वाढवून शिल्लेगाव मध्यम प्रकल्प तसेच वेगवेगळ्या नद्यांवरील कोल्हापुरी, सिमेंट बंधारे, पाझर तलाव, साठवण तलाव आदी जलसाठ्यात पाणी सोडण्यात यावे तसेच संबंधितास तात्काळ सर्वेक्षणाचे आदेश देऊन पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची व जनावरांची होणारी भटकंती थांबवावी अशी मागणी जि. प. चे माजी सभापती संतोष जाधव यांनी केली आहे. अन्यथा एक लढा जलक्रांतीचा या माध्यमातून 55 गावांतील नागरिकांच्यावतीने रस्त्यावर उतरून ‘महा जनआंदोलन’ करण्यात येईल असा इशारा जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मंत्री बबनराव लोणीकर, शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आ. विनायक मेटे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आदींकडे निवेदनाद्वारे दिला आहे.
या गावांचा घसा पडला कोरडा
हर्सूल, अनंतपूर, सावंगी, देवळी, खडकनाराळा, सुलतानाबाद, आरापूर, वसुसायगाव, महम्मद्पूर, हनुमाननगर, चिंचखेडा, आगाठान, शिरेगाव, मंजरपूर, शिल्लेगाव, गवळीशिवरा, प्रतापपूरवाडी, फुलशिवरा, महेबुबखेडा, भागाठाण, काटेपिंपळगाव, शंकरपूर, बुट्टेवाडगाव, गोळेगाव, देरडा, गवळीधानोरा, सिंगपूर, गाजगाव, खादगाव, शेकटा, वजनापूर, शिरेसायगाव, गोपाळवाडी, रोटस्थळ, खडक वाघलगाव, झोडेगाव, खोपेश्वर, बोलठाण, वडाळी, सिद्धनाथ वाडगाव, शहापूर, पळसगाव, येसगाव, डोमेगाव, घोडेगाव, तांदुळवाडी, उत्तरवाडी, मेंढी, म्हसा, भालगाव, हदियाबाद, मालूंजा, कोळघर, कणकोरी अशी 55 गावे आजघडीला तहानलेली आहेत.