आटोळा येथील मुजावर कुटूंबावर निसर्गाचा घाला
5 लाखाच्या नुकसानाने दोन कुटुंब रस्त्यावर
पं. स. सदस्य व सरपंचांनी केली मदतीची मागणी
आंबेवाडी/प्रतिनिधी
आटोळा येथील दोन कुटुंबांनी मेहनतीने उभा केलेल्या कुक्कुटपालन व्यवसायात हाताला आलेले उत्पादन थंडीच्या लाटेने गेले आहे. एका रात्रीत एक हजार कोंबड्या गारठ्याने दगावल्याचा पंचनामा सज्ज्याचे तलाठी यांनी केला आहे तर तालुका पशुवैद्यकीय अधिकारी आणि पशुधन विकास अधिकारी यांनी शवविच्छेदन करुन तपासणी अहवाल दिला आहे.
चाकूर तालुक्यातील आटोळा येथील शेतकरी हुशेन बशीर मुजावर यांनी त्यांच्या गट क्रमांक 174 मध्ये तीन महिन्यापूर्वी शेतीला जोड व्यवसाय म्हणून 1200 कोंबड्यांचे कुक्कुटपालन सुरू केले. 25 बाय 30 फुट क्षेत्रात 50 हजार रूपये खर्च करून शेड उभे केले. त्यात 30 प्रतिनग या प्रमाणे 36 हजार रूपयाचे पिल्ले, 1 लाख 30 हजार रुचे खाद्य आणले, अडीच महिन्यात त्या कोंबड्या सरासरी अडीच किलो वजनाच्या झाल्या. सध्याचा बाजारभाव पाहता 200 रूपये प्रति किलो दराने त्या कोंबड्यांची विक्री होणार आणि 5 लाखाच्या उत्पादनातून मुजावर कुटुंबाचे हैराणीचे दिवस संपणार असे त्यांना वाटत होते पण निसर्गाचा मारा कोणाच्याही लक्षात आला नाही. विदर्भातील गारपिटीमुळे आलेल्या थंडीच्या लाटेने मुजावर कुटुंबाचे सर्व स्वप्ने धुळीस मिळवले. 27 जानेवारी रोजीच्या रात्री उच्चांकी गारठ्याने 12 शे पैकी 1 हजार कोंबड्या मृत्यू पावल्या आहेत. नेमकी परिस्थिती लक्षात येईपर्यंत एक हजार कोंबड्या दगावल्या होत्या.
सदर घटनेची माहिती मिळताच गावच्या सरपंच रेणुका हावगीराव तोडकरी व आटोळा गणाचे पंचायत समिती सदस्य महेश वत्ते यांनी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एन. फड व नळेगाव येथे पशुधन विकास अधिकारी डॉ. एस. जी. दापके आटोळा सज्ज्याचे तलाठी पवार यांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार 28 जानेवारी रोजी जायमोक्यावर जाऊन घटनेचा पंचनामा केला तर पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने मृत कोंबड्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनानंतर कडाक्याच्या थंडीचा अटॅक असल्याचे निष्पन्न झाले आहे.
5 लाखाचे नुकसान झालेल्या हुशेन बशीर मुजावर आणि त्यांच्या बंधू फारुख मुजावर या दोघांच्या कुटुंबातील 14 सदस्यांचा उदरनिर्वाह 4.20 एकर जमिनीतील उत्पादनावर चालत असे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतातील उत्पादन पुरेसे होत नसल्याने त्या शेतीला पुरक व्यवसाय म्हणून 2.5 लाख रूपये गुंतवणूक करून कुक्कुटपालन हा व्यवसाय सुरू केला होता. सदर पंचनाम्यावर पंचायत समिती सदस्य महेश वत्ते, ग्रामपंचायत सदस्य माधव कलवले, पोलीस पाटील गणपती फुलारी, शिवहार धुमाळे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, हावगीराव तोडकरी, आनंद कलवले, परमेश्वर शेटे, विश्वनाथ शेटे, व्यंकट शेरे, खदिर दरोगो, पिडीत शेतकरी हुशेन कुरेशी यांच्या स्वाक्षर्या आहेत.
मुलीचे लग्न करायचे होते
शेतीत उदरनिर्वाह चालवून लग्नाकार्य करण्यासारखे उत्पादन मिळत नाही. मुलगी लग्नाची असल्याने पाहुण्याकडून उसनवारी पैसे घेऊन हा कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला होता. गावरान कोंबड्यांना मागणी चांगली असल्याने त्याला भाव ही चांगलाच आहे. 12 कोंबड्या मागे जवळपास 5 लाखाचे उत्पादन अपेक्षित होते. त्यामुळे यंदा मुलीचे लग्न करायचे होते. पण या थंडीच्या गारठ्याने आमचा संसारच थंड केला आहे.
हुशेन बशीर मुजावर, पिडीत शेतकरी, आटोळा, ता. चाकूर.
मदत मिळणे गरजेचे आहे
हुशेन व फारुख मुजावर हे दोघे भाऊ काबाडकष्ट करून आपली शेती कसतात. त्यांनी दोन महिन्यापूर्वी सुरू केलेला कुक्कुटपालन व्यवसाय हा शेतीपूरक तर होताच शिवाय कुटुंबाला हातभार लावणारा होता. मुलांच्या लग्नासाठी होत असलेली धडपड निसर्गाने कडवट बदलल्याने आलेल्या गारठ्याने त्या कुटुंबातील व्यवसायच संपल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे.
रेणुका हावगीराव तोडकरी, सरपंच आटोळा.
महेश वत्ते, सदस्य पंचायत समिती चाकूर.