ठिबकमध्ये फिल्टर का वापरावे

0

थेंबा-थेंबाने पिकांच्या थेट मुळाशी पाणी देण्याच्या पद्धतीस आपण ठिबक सिंचन असे म्हणतो. जमीन व पिकाचा प्रकार, पिकाचे वय, जमिनीच्या पृष्ठभागावरून होणारे बाष्पीभवन, पानांद्वारे होणारे उत्सर्जन, उपलब्ध पाणी इत्यादी मुलभूत घटक लक्षात घेऊन पिकांच्या मुळांच्या कार्यक्षेत्रात गरजेएवढे पाणी कमी दाबाने या पद्धतीत दिले जाते.

ठिबक सिंचन वापरतांना शेतकऱ्याला पाण्याची उपलब्धता कुठल्या प्रकारच्या स्त्रोतापासून आहे हि एक महत्वाची बाब आहे. नदी, कालवे, विहिरी, कुपनलिका ( बोअर) अश्या विविध स्त्रोतांपासून शेतीसाठी पाणी उपलब्ध होते. ठिबक संचात वापरली जाणारी गाळण यंत्रणा ( फिल्टर्स) हि प्रामुख्याने उपलब्ध पाणी स्रोताच्या प्रकारावर अवलंबून असते.

सूक्ष्म सिंचनाचा आत्मा म्हणजे “ गाळण यंत्रणा ” ( फिल्टर्स) होय. परंतु गाळण यंत्र हे महागडे असल्यामुळे कोणत्या प्रकारचे गाळण यंत्र आपल्याला आवश्यक आहे याचा सखोल अभ्यास केल्यास खर्चात भरपूर बचत होते. ठिबक सिंचनात वापरले जाणारे पाणी गाळून घेणे आवश्यक असते. कारण, ड्रीपर मधून बाहेर पडणाऱ्या छिद्राचा व्यास हा अत्यंत कमी म्हणजे mm मध्ये असतो. त्यामुळे ठिबक मध्ये कचरा, शेवाळ, वाळू इ. अडकल्यास ठिबक चोकअप होते. म्हणून फिल्टर्स हे ठिबक पद्धतीचे आवश्यक घटक आहेत.

चला आता अभ्यासू कोणत्या फिल्टरची केंव्हा व कुठे आवश्यकता आहे ते –

 

१) सर्वसाधारणपणे जाळीचा फिल्टर ( स्क्रिन फिल्टर) हा सर्वच संचामध्ये बसविलेला असतो.

तरीपण पाण्याच्या गुणवत्तेनुसार इतरही फिल्टर बसविणे आवश्यक असते.

२) विहीर व बोअरचे पाणी असेल व कचऱ्याचे प्रमाण कमी असेल तर जाळीचा फिल्टर बसवावा.

 

 

 

३) पाण्यामध्ये शेवाळ व तरंगणारे पदार्थ असतील, साचलेलेपाणी असेल, तलावातील किंवा उघड्या शेततळ्यातील पाणी वापरायचे असेल, तर वाळूचा फिल्टर (सॅंड फिल्टर) लावणे आवश्यक आहे. अन्यथा जाळीचा फिल्टरवारंवार चोक होवून बंद पडतो व पाण्याचा पुरेसा प्रवाह संचास मिळत नाही. पाण्यातून वाळूचे, मातीचे व रेतीचे कण येत असल्यास हे कण संचात जावून ठिबक तोट्या बंद पडू शकतात.

 

 

४) जुन्या बोअरवेल किंवा नवीन खोदलेल्या विहिरीतील पाण्याव्दारे बारीक वाळूचे कण येत असतात. यासाठी हायड्रोसॉयक्लान फिल्टर ( शंकू फिल्टर ) वापरावा. या फिल्टरव्दारे वाळूचे कण जास्त घनता असल्यामुळे पाण्याच्यावेगाने फिल्टरच्या बाहेरच्या भिंतीकडे फेकले जावून तळाशी जमा होतात. नंतर हे कण वेगळे काढता येतात.

 

 

 

 

५) सिंचनाच्या पाण्यात घनपदार्थ, सेंद्रिय पदार्थ व विरघळलेले क्षार कमी प्रमाणात परंतु एकत्रितपणे असल्यास डिस्क फिल्टरची (चकतीचे गाळण यंत्र ) निवड करावी. या फिल्टरमध्ये प्लॅस्टीकच्या चकत्या एका नळीवर एकमेकांना चिकटून बसविलेल्या असतात. या चकत्यावर बारीक व साधारणपणे वर्तुळाकार खाचा असतात. फिल्टरमध्ये शिरलेले पाणी दोन चकत्यामधील खाचातून स्वच्छ होवून बाहेर पडते.

६) पाण्याच्या गुणवत्तेनुसार गरज पडल्यास दोन वेगवेगळे फिल्टर (उदा.जाळीचा व वाळूचा) एकत्रितपणे संचास बसविणे फायद्याचे असते.

ठिबक सिंचन-समज / गैरसमज

 

 सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.