ठिबक सिंचन संच दीर्घकाळ चालण्यासाठी ड्रिपर्स, लॅटरल्स, उपनळी, मुख्य नळी आणि गाळण यंत्रणेची योग्य देखभाल करणे आवश्यक आहे. ठिबक संचाची योग्यरित्या निगा राखल्यास संच खराब होऊन होणारे नुकसान टाळता येईलव आर्थिक हानी होणार नाही. तसेच ठिबक संच दीर्घकाळ टिकेल.
ड्रिपर्सची देखभाल –
1) ड्रिपर्समधून ठराविक प्रवाह दराने झाडास पाणी मिळते की नाही यासाठी शेतामध्ये फिरून संचाचे वेळोवेळी निरीक्षण करावे.
2) झाडाजवळील जमिनीचा भाग सारख्या प्रमाणात ओला झाला की नाही हे पाहावे. ज्या झाडाजवळ जमिनीचा भाग कमी प्रमाणात ओला झाला असेल, त्या झाडाजवळील ड्रिपर्स उघडून पाहावे व स्वच्छ करावे.
3) ड्रिपर्सचा प्रवाह दर ठराविक दाबावर अपेक्षित प्रवाह दरापेक्षा कमी आढळून आल्यास ड्रिपर्स उघडून स्वच्छ करावे.
4) ड्रिपर्सची छिद्रे पाण्यातील जिवाणू, सूक्ष्म जीवजंतू व शेवाळामुळे बंद पडू नये म्हणून ठिबक सिंचन संचास पंधरा दिवसांच्या किंवा महिन्याच्या अंतराने क्लोरिन प्रक्रिया द्यावी. क्लोरिन प्रक्रिया देण्याकरिता कॅल्शिअम हायपोक्लोराईड किंवा सोडिअम हायपोक्लोराईडचा उपयोग करावा.
5) ड्रिपर्सची छिद्रे पाण्यातील क्षारामुळे बंद पडू नये म्हणून ठिबक सिंचन संचास पंधरा दिवसांच्या किंवा महिन्याच्या अंतराने आम्ल प्रक्रिया द्यावी.
6) तज्ञांच्या सल्ल्याने क्लोरिन प्रक्रिया करावी. संचातून वाहणारे क्लोरीनमिश्रित पाणी पिण्यासाठी वापरू नये.
7) हायड्रोक्लोरिक आम्ल हे अपायकारक आहे. तेव्हा आम्ल प्रक्रिया देताना आम्ल काळजीपूर्वक हाताळावे.
8) आम्ल प्रक्रियेसाठी पाणी व आम्लाचे मिश्रण तयार करताना पाणी आम्लामध्ये सोडू नये, नेहमी आम्ल पाण्यामध्ये सोडावे.
9) क्लोरिन व आम्ल नेहमी पाण्यामध्ये गाळणीयंत्राच्या अगोदर सोडावे.
10) आम्ल व क्लोरिन प्रक्रिया दिल्यानंतर संच २४ तास बंद ठेवावा.
11) संच पुन्हा सुरू केल्यानंतर गाळणीयंत्र, मुख्य नळी, उपनळ्या व लॅटरलर्स स्वच्छ कराव्यात.
12) आम्ल व क्लोरिन प्रक्रिया नेहमी पाणी देत असताना शेवटच्या अर्ध्या तासात द्यावी.
लॅटरल्सची देखभाल –
1) लॅटरल्स आठवड्यातून एक वेळा स्वच्छ कराव्यात, लॅटरल स्वच्छ करण्याकरिता लॅटरलचे शेवटचे टोक उघडावे.
2) एकाच वेळी एक लॅटरल स्वच्छ करावी, लॅटरलमधून स्वच्छ पाणी येऊ लागले म्हणजे लॅटरलचे शेवटचे टोक बंद करावे.
3) शेतामध्ये फिरून लॅटरलचे निरीक्षण केले पाहिजे. लॅटरलमध्ये गळती आढळून आल्यास गुफ प्लगच्या साहाय्याने बंद करावीत.
4) तण काढणे, कोळपणी करणे इत्यादी शेतातील कामे करताना लॅटरलला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
5) लॅटरल ही झाडापासून जमिनीवर योग्य अंतरावर ठेवलेली असावी.- उप नळीची देखभाल –
1) उपनळ्या आठवड्यातून एक वेळा स्वच्छ कराव्यात.
2) उपनळ्या स्वच्छ करण्याकरिता त्यांच्या शेवटच्या टोकाजवळील फ्लश व्हॉल्व्ह उघडून जास्त दाबाने पाणी बाहेर सोडावे.
3) एका वेळी एकच उपनळी स्वच्छ करावी.
4) उपनळीतून स्वच्छ पाणी येऊ लागल्यानंतर फ्लश व्हॉल्व्ह बंद करावा.
5) उपनळीत गळती असल्यास दुरुस्ती करावी.
मुख्य नळीची देखभाल –
1) मुख्य नळी आठवड्यातून एक वेळ स्वच्छ करावी.
2) मुख्य नळीच्या शेवटच्या टोकाजवळील फ्लश व्हॉल्व्ह उघडून जास्त दाबाने मुख्य नळी साफ करावी.
3) मुख्य नळीतून स्वच्छ पाणी येऊ लागल्यानंतर फ्लश व्हॉल्व्ह बंद करावा.
4) मुख्य नळीमध्ये गळती असल्यास दुरुस्ती करावी.
- गाळणी यंत्राची देखभाल –
1) वाळूचे व जाळीचे दोन्ही गाळणीयंत्र आठवड्यातून एक वेळा स्वच्छ करणे अत्यंत आवश्यक आहे.
2) वाळूचे गाळणीयंत्र साफ करण्याकरिता नेहमीप्रमाणे वाहत असलेल्या प्रवाहाची दिशा उलट करून गाळणीयंत्र स्वच्छ करावे.
3) गाळणीयंत्रातील वाळूमध्ये जास्त प्रमाणात घाण अडकलेली असल्यास गाळणीयंत्राचे झाकण उघडून वाळू स्वच्छ करावी.
4) वाळूचे गाळणीयंत्र स्वच्छ करताना पाण्याबरोबर वाळू वाहून जाणार नाही याची काळजी घ्यावी.
5) ड्रेनव्हॉल्व्ह उघडून जाळीमध्ये अडकलेली घाण बाहेर काढून टाकावी, तसेच गाळणीयंत्राचे झाकण उघडून आतील जाळी स्वच्छ करावी.
6) गाळणीयंत्राच्या दोन्ही बाजूंची रबर सील काढून, उलटी करून, स्वच्छ धुऊन पुन्हा जाळींवर घट्ट बसवावीत अन्यथा पाण्याच्या दाबामुळे सैल भागातून न गाळलेले पाणी पुढे जाण्याची शक्यता असते.
7) ठिबक सिंचन संचातील सर्व व्हॉल्व्ह सहजरीत्या उघडता व बंद करता यावेत यासाठी व्हॉल्व्हला वंगण तेल द्यावे.
- ठिबक सिंचन संच बंद करताना घ्यावयाची काळजी –
हंगाम संपल्यानंतर ठिबक सिंचन संच बंद करताना खालील काळजी घ्यावी –
1) मुख्य नळी, उपनळी, लॅटरलस स्वच्छ कराव्यात.
2) गाळणीयंत्र स्वच्छ पाण्याने साफ करावे, वाळूचे गाळणीयंत्र उघडून त्यातील वाळू फेकून द्यावी .
3) संचासोबत खते देण्याची टाकी असल्यास ती स्वच्छ करावी.
4) ठिबक सिंचन संच वापरात नसताना लॅटरलर्स काढून ठेवायच्या असल्यास त्यांची गोल गुंडाळी करावी व सुरक्षित ठिकाणी ठेवावी.
5) ठिबक सिंचन संच बंद असताना नादुरुस्त असलेले घटक- उदा. नळ्या, व्हॉल्व्हज इत्यादी दुरुस्त कराव्यात.
6) ठिबक सिंचन संचास बंद करण्यापूर्वी आम्ल व क्लोरिन प्रक्रिया देणे अधिक चांगले.
- ठिबक सिंचन संच सुरू असताना घ्यावयाची काळजी –
1) ठिबक सिंचन संचातील व्हॉल्व्ह , पाणीमापक व दाबमापक व्यवस्थित काम करतात किंवा नाही हे तपासणे व्हॉल्व्हमध्ये गळती असल्यास दुरुस्ती करावी, पाणीमापक व दाबमापक व्यवस्थित काम करीत नसल्यास बदलावीत.
2) जाळीच्या गाळणीयंत्रात जाळी व्यवस्थित आहे, की नाही ते पाहावे, जाळी फाटलेली असल्यास नवीन बसवावी, तसेच रबर सिल्स व्यवस्थित आहेत की नाही ते पाहावे, गाळणीयंत्रे स्वच्छ धुवावीत, वाळूच्या जाळणीयंत्रात वाळू योग्य प्रमाणात आहे की नाही ते पाहावे. वाळू कमी असल्यास गाळणीयंत्रात वाळू टाकावी.
3) लॅटरर्स संपूर्ण लांबीपर्यंत तपासाव्यात. लॅटरलर्सवर ड्रिपर्स आहेत की नाही ते तपासावे, लॅटरलसला कुठे छिद्रे आढळून आल्यास गुफ प्लगच्या साहाय्याने छिद्रे बंद करावीत. लॅटरल्स शेतामध्ये व्यवस्थित टाकाव्यात.
4) मुख्य नळी, उपनळी व लॅटरल्स स्वच्छ कराव्यात.
5) ठिबक सिंचन संचातील सर्व व्हॉल्व्हला वंगण तेल द्यावे.
सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.