अर्थव्यवस्थेसमोरचा यक्ष प्रश्‍न

0

शेतकर्‍यांच्या समोर बाजारपेठेचा प्रश्‍न म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेसमोरचा यक्ष प्रश्‍न आहे. शेतकर्‍यांच्या बाजारपेठेशी बहुतेक सर्व प्रश्‍न निगडित आहेत. बाजारपेठेच्या समृद्धीवर देशाची समृद्धी अवलंबून आहे. असे असतानाही ती कुंठित आणि उपेक्षितही आहे. आठवडी बाजारपेठ ही एक पुरातन बाजारपेठ आजही तग धरून आहे. तिच्या स्वरुपात काही बदल झाले तरी तिने आपले अस्तित्व आजही टिकवून ठेवले आहे. काही नव्या व्यवस्थाही अस्तित्वात आल्या आहेत.

शेतीमालाच्या बाजारपेठेत अडत्याकडून उचल घ्यायची व नंतर त्याच्याच मार्फत माल विकायचा असा प्रघात आहे. अलिकडे शासन स्वतः प्रत्यक्ष बाजारात क्वचित उतरते.
देशात तयार झालेला माल परदेशात नेऊन विकण्याच्या कामात प्रत्यक्ष शेतकर्‍याचा सहभाग नगण्य आहे. शेती मालाची बहुतेक निर्यात सरकारी यंत्रणाद्वारेच केली जाते. बंधने असल्यामुळे खासगी निर्यातदारांची संख्या मर्यादित राहिली. निर्यातीचे प्रमाण वाढले तर देशी बाजारपेठेत अभाव उत्पन्न होतो व देशी बाजारात त्या मालाच्या किमती वाढतात.

सुदृढ बाजारपेठेचा अभाव
शेतकर्‍यांच्या बाजारपेठेसंबंधीच्या अडचणींविषयी अनेक अभ्यास झाले आहेत. शेतीमालाच्या बाजारपेठांचा आजार संरचनात्मक सुधारणा केल्याने बरा होणारा नाही. सुदृढ बाजारपेठेचा अभाव हे दुखणे नीट समजून घेतले पाहिजे.
बाजारपेठ हे वस्तुंचे किमतीत रुपांतर करून उत्पन्न मिळवून देणारे स्पर्धेचे ठिकाण असले तरी गाभ्याला हात घालावा लागतो. शेतकर्‍यांच्या दृष्टीने बाजारपेठ हे खुल्या स्पर्धेचे ठिकाण ठरत नाही हा खरा प्रश्‍न आहे.

मागणी आणि पुरवठ्याच्या तत्त्वावर बाजारभाव ठरावेत ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, परंतु अनैसर्गिक हस्तक्षेपामुळे बाजारभाव सातत्याने कमीच राहिले तर ती बाजारपेठ पक्षपात करणारी ठरते. शेतीमालाची बाजारपेठ सरकारच्या कृत्रिम हस्तक्षेपामुळे सातत्याने शेतकर्‍यांवर अन्याय करीत आली. बाजारपेठेचा मूळ प्रश्‍न इथे आहे. व्यापारी हे परिस्थितीचे लाभार्थी जरूर आहेत, परिस्थितीचे जनक नाहीत. परिस्थितीचे जनक स्वतः सरकार आहे, सरकारी धोरण आहे.
क्रयशक्‍ती का गमावली?

अत्यल्पभूधारक शेतकरी सर्वात आधी बाजारात माल आणतो त्याला पैशाची सर्वाधिक गरज असते आणि थांबण्याची कुवत नसते. क्रयशक्‍ती गमावलेला शेतकरी बाजारात मोठ्या प्रमाणात आला तर भाव कोसळणारच. भाव कोसळले तर त्याचा फायदा व्यापार्‍यांना होणारच. प्रश्‍न असा आहे की, त्याने क्रयशक्‍ती का गमावली.

शेती धंदा सातत्याने तोट्यात चालत आला. शेतकर्‍याकडे बचत साचली नाही. त्यामुळे तो गरजा मारून जगला. गरजांचे मागणीत रुपांतर झाले नाही. मागणी पूर्ण करणारे नवे रोजगार तयार झाले नाहीत. शेतीवरील जादा मनुष्यबळ स्थलांतरित होऊ शकले नाही. बोजा वाढत गेला. वाटण्या होत गेल्या. जमिनीचे छोटे तुकडे जगण्याचे एकमेव आधार बनले. शेतकर्‍यांजवळ चार पैसे शिल्‍लक मागे पडले नाहीत या एकमेव कारणामुळे आणि त्याला कारण सरकारचे धोरण ठरले. शेतकरी व व्यापारी या दोन समूहांच्या क्रयशक्‍तीच्या तफावतीचा परिणाम समजून घेतले पाहिजे.
शेतीमालाला वाजवी भाव मिळू नये यासाठी जे प्रयत्न केले जातात ते थांबावेत. आपला माल कुठे विकावा हे ठरविण्याचे स्वातंत्र्य शेतकर्‍याला नाही.
सहकारातील 38 (अ) चा जाच
सहकार खात्याचे 38 (अ) हे कलम शेतकर्‍यांना बाजारपेठेबद्दल आकर्षण न वाटण्याचे एक मोठे कारण आहे. या कलमाने शेतकर्‍यावरील कर्जाची वसुली त्याने विकलेल्या मालाच्या रकमेतून कपात करण्याचा अधिकार दिला आहे. कोणत्याही कर्ज वसुलीसाठी अशी पद्धत जगात कोठेच अस्तित्वात नसताना शेतकर्‍यांसाठी लागू करण्यात आली आहे.

जागतिक बाजारपेठेत शेतीचे स्थान अव्वल
1990 पासून भारत सरकारने डंकेल प्रस्तावावर सही करून जागतिक व्यापार संघटनेचे सभासदत्व पत्करले. जागतिक व्यापार संघटनेचे कायदे अनेक देशातील व्यापारी संबंधाबद्दल आहेत. देशांतर्गत रचनेशी त्याचा संबंध नाही. हे खरे असले तर जे धोरण तुम्ही जागतिक संदर्भात मान्य करता ते धोरण अंतर्गत व्यवहाराच्या बाबतीत मान्य करणे ही तुमची नैतिक जबाबदारी ठरते. या प्रक्रियेत शेतकर्‍यांना सहभागी करून घेण्यात आले नाही. वास्तविक भारताचे हवामान आणि भौगोलिक रचना पाहता जागतिक बाजारपेठेत शेतीचे स्थान अव्वल ठरते.

देशातला काही माल परदेशात गेला तर इथे तेवढी पोकळी तयार होते त्याचा परिणाम म्हणून देशी बाजारात ही त्या मालाच्या किंमती वाढतात.
बाजारपेठेचा प्रश्‍न संरचनात्मक सुविधांशी कमी, सरकारच्या भावविषयक धोरणाशी जास्त निगडित आहे. शेतकर्‍यांची बाजारपेठ सुदृढ करायची असेल तर शेतकर्‍यांवर घालण्यात आलेले निर्बंध उठविले पाहिजेत. भारतीय शेतकरी जागतिक बाजारपेठ काबीज करू शकतो त्याला अडथळे आणण्याचे काम थांबले पाहिजे.

 

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

Leave A Reply

Your email address will not be published.