प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा हप्ता भरण्याची मुदत 31 डिसेंबर
उस्मानाबाद / प्रतिनिधी
रब्बी हंगामात नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगांमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकर्यांना विमा संरक्षण देण्यासाठी शासनाने प्रधानमंत्री पीकविमा योजना चालू रब्बी हंगामात राबविण्यासाठी मान्यता दिली आहे. या रब्बी हंगामात पीकविमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत कर्जदार शेतकर्यांना व बिगर कर्जदार शेतकर्यांना 31 डिसेंबर 2018 ही आहे.
पीकविमा योजना ही कर्जदार शेतकर्यांना अधिसूचित महसूल मंडळातील अधिसूचित पिकांसाठी बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकर्यांना ऐच्छिक आहे. या योजनेअंतर्गत शेतकर्यांनी भरावयाचा विमा हप्ता रब्बी हंगामासाठी दीड टक्के व नगदी पिकांसाठी पाच टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे.
शेतकर्यांना ज्या पिकाचा विमा उतरावयाचा आहे ते पीक शेतात पेरण्याबद्दलचे स्वयंघोषणापत्र, सातबारा उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक या कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जवळच्या बँकेत किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर विमा हप्ता भरुन संरक्षित करावे आणि या पीकविमा योजनेत जास्तीत जास्त शेतकर्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाटगे यांनी केले आहे.
शेतकर्यांनी अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी किंवा बँकेशी संपर्क साधावा. संरक्षित रकमेवर दिल्या जाणार्या पीकविमा दराप्रमाणे विमा हप्ता भरावयाचा आहे त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
गहू (बागायत) विमा संरक्षित रक्कम 34 हजार 600,विमा हप्ता दर टक्के रु.दीड, विमा हप्ता रक्कम (शेतकरी हिस्सा) रु.519, गहू (जिरायत) विमा संरक्षित रक्कम रु. 24 हजार, विमा हप्ता दर टक्के रु.दीड, विमा हप्ता रक्कम रुपये 360, ज्वारी (बागायत) विमा संरक्षित रक्कम रु.27हजार 300, विमा हप्ता दर टक्के रु.दीड, विमा हप्ता रक्कम रु.409 रुपये 50 पैसे, ज्वारी (जिरायत) विमा संरक्षित रक्कम रु.25हजार200, विमा विमा हप्ता रक्कम रुपये 378, हरभरा विमा संरक्षित रक्कम रु.23 हजार 100, विमा हप्ता दर टक्के रु.दीड, विमा हप्ता रक्कम रुपये 346रु.50 पैसे, करडई विमा संरक्षित रक्कम 7 हजार, विमा हप्ता दर रु.दिड, विमा हप्ता रक्कम रुपये 105, रब्बी कांदा विमा संरक्षित रक्कम रु.72 हजार 600, विमा हप्ता दर टक्के रु.5,विमा हप्ता रक्कम रुपये 3 हजार 630, उन्हाळी भुईमूग विमा संरक्षित रक्कम रु.37 हजार 800, विमा हप्ता दर टक्के रु. दिड, विमा हप्ता रक्कम रु.567.