पुणे /प्रतिनिधी
वायव्य भारतातील पश्चिमी चक्रावाताची तीव्रता अधिक असल्याने उत्तरेकडील थंड वार्याचे प्रवाह कमी झाले आहेत. राज्यात बहुतांशी ठिकाणी किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी कमी झाली आहे. पश्चिमेकडील आणि पूर्वेकडील वार्यांच्या परस्परविरोधी क्रियेमुळे शुक्रवार दि.25 जानेवारीनंतर महाराष्ट्रासह मध्य भारतात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
पाकिस्तान, जम्मू काश्मिर आणि हिमालय पर्वतालगतच्या भागात तीव्र पश्चिमी चक्रावात सक्रीय आहे. वायव्य भारतात जमिनीलगत जोरदार वारे वाहणार आहेत. उत्तर भारतामध्ये जोरदार हिमवृष्टी होत असून, पंजाब, हरियाणा, उत्तर राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशात गारपीट होण्याची शक्यता आहे.
उत्तरेकडील वार्यांना अडथळा निर्माण झाल्याने महाराष्ट्रासह देशाच्या मध्य, पश्चिम व वायव्य भागाच्या किमान तापमानात 2 ते 3 अंशांची वाढ होण्याचा अंदाज आहे. उत्तरेकडून येणारे वारे कमी झाल्याने, तसेच बंगालच्या उपसागरावरून येणार्या वार्यांमुळे राज्याच्या तापमानात वाढ होत आहे. रविवारी धुळे येथील कृषी महाविद्यालयात नीचांकी 7.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. निफाड येथे 9.2 अंश, नागपूर येथे 8.8 अंश, तर गोंदिया येथे 9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नागपुरात थंडीचा कडाका अधिक आहे. तर उर्वरित राज्यात गारठा कमी झाला आहे. मंगळवारपर्यंत किमान तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.