खा. शिवाजी आढळराव पाटील
नारायणगाव:
सरकारच्या नियोजन अभावामुळे शेतकर्यांच्या कांद्याला भाव मिळत नाही. या करिता सरकारने आयात निर्यातीचे व्यापक धोरण अंमलबजावणीची गरज आहे असे प्रतीपादन शिरूर लोकसभेचे खा. शिवाजी आढळराव पाटील यांनी व्यक्त केले. ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे दि. 3 ते 6 जानेवारी 2019 या कालावधीदरम्यान ग्लोबल फार्मर्स कृषी प्रदर्शन आयोजन करण्यात आले होते.
यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरीचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरीचे कृषी विस्तार संचालक मा. डॉ. किरण कोकाटे, माजी सनदी अधिकारी अरविंद झांब, सहाय्यक जिल्हाधिकारी खेड तथा प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास प्रकल्प आयुष प्रसाद, जिल्हा परिषद पुणेचे सदस्या व गटनेत्या आशाताई बुचके तसेच ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन कृषीरत्न अनिल मेहेर, ग्रामोन्नती मंडळाचे अद्यक्ष प्रकाश पाटे, कार्यवाह रवींद्र पारगावकर तसेच मंडळाचे संचालक उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना खा. आढळराव पाटील म्हणाले की, त्याचबरोबर उत्तर पुणे जिल्हा हा भाजीपाला उत्पन्नात अग्रेसर असून प्रक्रिया उद्योग आणि मुल्यावर्धानात कृषी पदवीधारकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. अल्पावधीतच नारायणगावच्या कृषी विज्ञान केंद्राने शेतकर्यासाठी नाविन्यापूर्ण पिक प्रात्यक्षिकाबरोबर मोलाचे मार्गदर्शन करून सोय सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या केंद्राने उभारलेले उपक्रम राज्यात पथदर्शी ठरत असून खर्या अर्थाने शेतकर्यांना फायदेशीर ठरतील असा विश्वास आढळराव पाटील यांनी व्यक्त केला. कृषी विज्ञान केंद्राना आधुनिक तंत्रज्ञानाने संपन्न करण्याकरिता केंद्र सरकारकडून भरीव निधी मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणार आहे आहे असे मत यावेळी व्यक्त केले.
या वेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरीचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की, भारतीय शेती ही वातावरणाच्या बदलामुळे चिंतेची ठरत संरक्षित शेती फायद्याची ठरणार आहे. शेतकर्यांनी जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खत नियोजन करून उत्पादन खर्च कमी करण्यावर प्रयत्न केला पाहिजे असे असे मत यावेळी व्यक्त केले.
सहाय्यक जिल्हाधिकारी खेड तथा प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास प्रकल्प आयुष प्रसाद म्हणाले कि फार्मर्स प्रोड्यूसर कंपन्यांच्या माध्यामतून कोल्ड स्टोरेज, वाहतूक साखळी, प्रक्रिया व मूल्यवर्धित पदार्थांची निर्मितीत पुढाकार घेणे गरजेचे आहे. कृषी क्षेत्रात काम करणार्या संस्था खरोखर उत्कृष्ट काम करतात. यासारख्या संस्थाना सरकारने आर्थिक पाठबळ देऊन मोठे करायाला हवे तर देश प्रचंड गतीने प्रगती करेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरीचे कृषी विस्तार संचालक डॉ. किरण कोकाटे म्हणाले कि उत्पादित झालेल्या मालावर प्रक्रिया करणे व त्यामाध्यामातुन त्याची विक्री व्यवस्थापन करणे हि आजची गरज आहे. कमी पिकवा परंतु दर्जेदार पिकवा असा सल्ला यावेळी कोकाटे यांनी दिला. गेल्या सात वर्षापासून केव्हीकेच्या कामाचा आलेख चढता असून काम शेतकर्यांच्या प्रती उल्लेखनीय आहे.
यावेळी मान्यवरांनी कृषी प्रदर्शनातील वेगवेगळ्या प्रकल्पांना भेटी दिल्या. खासकरून तीन महिने अगोदर उभारलेली पिक प्रात्यक्षिके कृषी प्रदर्शनाचे आकर्षण ठरत आहे. शेतकर्यांचा या कृषी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातील 25 ते 30 हजाराहून अधिक शेतकर्यांनी मोठ्या संख्येने भेटी दिल्या आहेत अशी माहिती केंद्राचे चेअरमन कृषीरत्न अनिल मेहेर यांनी दिली.