महाराष्ट्रामध्ये खान्देश, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा विभागात उन्हाळी बाजरीचे पीक घेतले जाते. उन्हाळी हंगामातील ढगविरहित स्वच्छ हवामान व भरपूर सूर्यप्रकाश या पिकाला मानवते. पिकवाढीस योग्य तापमान व हवामानाचे इतर अनुकूल घटक यांमुळे रोग व किडींचा फारसा प्रादुर्भाव होत नाही. उन्हाळी हंगामामध्ये बाजरीचे उत्पादन (धान्य व चारा) खरीप हंगामापेक्षा सव्वा ते दीडपटीपेक्षा अधिक मिळते. धान्य व चाऱ्याची गुणवत्तादेखील चांगली मिळते. ज्या ठिकाणी सिंचनासाठी पाण्याची सोय असेल, अशा ठिकाणी उन्हाळ्यात बाजरीची लागवड करणे फायदेशीर ठरेल.
जमिनीची निवड व पूर्वमशागत:
उन्हाळी बाजरीच्या लागवडीसाठी सपाट मध्यम ते भारी खोलीची, पाण्याचा उत्तम निचरा असणारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू ६.२ ते ८ असावा. भारी जमिनीमध्ये ओलावा अधिक काळ टिकवून धरण्याची क्षमता असते. जमिनीची पूर्वमशागत करताना १५ सें.मी. खोलीपर्यंत एक नांगरट व कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. जमिनीत असलेल्या पूर्वीच्या पिकाची धसकटे, हरळी यांच्या काड्या वेचून जमीन स्वच्छ करावी. दुसऱ्या कुळवणीपूर्वी एकरी २.५ ते ३ टन (५ ते ६ बैलगाड्या) शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतात पसरून टाकावे व दुसऱ्या कुळवणीच्या वेळी ते जमिनीत चांगले मिसळून घ्यावे.
पेरणी:
उन्हाळी हंगामातील बाजरीची पेरणी थंडी कमी झाल्यावर जानेवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात ते फेब्रुवारी महिन्याचा पहिल्या पंधरवड्यात करणे फायदेशीर ठरते. तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा खाली गेलेले असल्यास उगवणीवर अनिष्ट परिणाम होतो. तर पेरणीस उशीर झाल्यास पीक जात निहाय ५० ते ५५ दिवसांनी फुलोऱ्यात येते. अशावेळी तापमान ४२ अंश से.पेक्षा अधिक असल्यास परागकण मरतात व उत्पादनात घट होण्याची शक्यता असते. तसेच उन्हाळी पिक काढणीस विलंब झाल्यास खरीप हंगामातील पिक पेरणीस उशीर होतो.
जातींची निवड :
संकरित जात – श्रद्धा, सबुरी, शांती, आदिशक्ती
सुधारित जात – आयसीटीपी ८२०३ व धनशक्ती
बियाण्याचे प्रमाण व बीजप्रक्रिया :
प्रति एकरी १.२ ते १.६ किलो प्रमाणित बियाणे वापरावे. बीजप्रक्रिया केलेले प्रमाणित बियाणे उपलब्ध नसल्यास अरगट रोग प्रतिबंधासाठी बियाण्याला पेरणीपूर्वी २० टक्के मिठाच्या द्रावणाची (२ किलो मीठ १० लिटर पाण्यामध्ये) प्रक्रिया करावी. या द्रावणामध्ये बाजरीचे बियाणे सोडावे. पाण्यावर तरंगणारे बुरशीयुक्त हलके बियाणे बाजूला काढून टाकावे. तळाला राहिलेले आणि वजनाने जड असलेले बियाणे वेगळे करून पाण्याने २ ते ३ वेळा धुऊन घ्यावे व त्यानंतर सावलीत वाळवावे. गोसावी रोगाच्या प्रतिबंधासाठी सावलीत वाळविलेल्या बियाण्यास मेटॅलॅक्झिल (३५ एसडी) ६ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. रासायनिक बीजप्रक्रीयेनंतर बियाण्यास ॲझोस्पिरिलियम व स्फुरद जीवाणू प्रत्येकी २५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळून प्रक्रिया करावी. जीवाणू संवर्धनाच्या प्रक्रियेमुळे नत्र व स्फुरद खतात २० ते २५ टक्के बचत होऊन उत्पादनात १० टक्के वाढ होते. उगवण एकसमान होऊन पीकाची प्रारंभिक वाढ चांगली होते.
पेरणी:
पेरणीपूर्वी शेत ओलवून वापसा आल्यावर पेरणी करावी. दोन ओळीतील अंतर ३० सें.मी. व दोन रोपातील अंतर १५ सें.मी. ठेवावे. जमिनीच्या उतारानुसार ५ ते ७ मीटर लांबीचे व ३ ते ४ मीटर रुंदीचे सपाट वाफे तयार करावेत. दोन चाड्याच्या पाभरीने करावी, म्हणजे खते आणि बियाणे एकाच वेळी पेरता येतात. पेरणी २ ते ३ सें.मी. पेक्षा जास्त खोलीवर करू नये.
खत व्यवस्थापन:
पेरणीच्या वेळी प्रति एकरी १८ किलो नत्र (३९ किलो युरिया), १८ किलो स्फुरद (११२ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि १८ किलो पालाश (३० किलो म्युरेट ऑफ पोटॅश) द्यावे. तसेच पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी एकरी १८ किलो नत्र (३९ किलो युरिया) दुसरा हप्ता द्यावा.
विरळणी:
एकरी रोपांची योग्य संख्या राखण्यासाठी पहिली विरळणी पेरणीनंतर १० दिवसांनी करावी आणि दुसरी विरळणी पेरणीनंतर २० दिवसांनी करून दोन रोपातील अंतर १५ सें.मी. ठेवावे. प्रति एकरी ४८,००० रोपे राहतात.
आंतरमशागत :
पेरणीपासून सुरवातीचे ३० दिवस शेत तणविरहित ठेवणे आवश्यक आहे, कारण याच कालावधीत तण व पीक यांच्यात हवा, पाणी, अन्नद्रव्ये आणि सूर्यप्रकाश मिळविण्यासाठी स्पर्धा होत असते. दोन वेळा कोळपणी व गरजेनुसार दोन वेळा खुरपणी करावी. मजुरांची कमतरता असल्यास प्रति एकरी ४०० ग्रॅम ॲट्राझिन २०० लिटर पाण्यात मिसळून पेरणीनंतर परंतु पीक उगवणीपूर्वी जमिनीवर फवारणी करावी व पेरणीनंतर २५-३० दिवसांत खुरपणी करावी.
पाणी व्यवस्थापन :
पेरणीनंतर पिकास ३ ते ४ दिवसांनी हलके पहिले पाणी (आंबवणी) द्यावे. त्यानंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे, पिकवाढीच्या संवेदनशील अवस्थ्येमध्ये १० ते १२ दिवसांचे अंतराने ५ ते ६ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पाण्याची उपलब्धता मर्यादित असल्यास, पहिले पाणी फुटवे येण्याच्या वेळी (पेरणीनंतर २० ते २५ दिवसांनी), दुसरे पाणी पीक पोटरीत असताना (पेरणीनंतर ३५ ते ४५ दिवसांनी) आणि तिसरे पाणी दाणे भरतेवेळी (पेरणीनंतर ६० ते ६५ दिवसांनी) द्यावे.
काढणी व उत्पादन:
उन्हाळी हंगामात पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत म्हणजे उगवण ते फुटवे येण्याच्या वेळेस तापमान कमी असल्यामुळे पिकाची वाढ हळुवार होते. त्यामुळे पिकाच्या वाढीसाठी जास्त काळ लागतो, म्हणून उन्हाळी बाजरीचे पीक खरीप बाजरीपेक्षा १० ते १५ दिवसांनी उशिरा काढणीस येते. उन्हाळी बाजरीची संकरीत किंवा सुधारित वाणांचा वापर, योग्य रोपसंख्या संतुलित खतमात्रा व पाणी व्यवस्थापन केल्यास प्रति एकरी १४ ते १६ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. तसेच दुभत्या व इतर जनावरांसाठी चारा उपलब्ध होतो.