हल्ली सेंद्रिय शेतीबद्दल बरैच ऐकावयास मिळते. अगदी गल्लीपासून ते दिल्ली पर्यंत सगळीकडे सेंद्रिय शेती बद्दल चर्चासत्रे / परिसंवाद/ कार्यशाळा सुरू असतात. त्यात मी काही जगा वेगळे न सांगता, यातील बारकावे आणि सेंद्रिय शेती करावयाची पद्धती येणाऱ्या पुढील लेखात सविस्तर सांगणार आहे. हे सांगण्याचे कारण म्हणजे सेंद्रिय शेतीबद्दल अजूनही बरेच गैरसमज आहेत. आणि शास्त्रोक्त पद्धतीने सेंद्रिय शेती कशी करावी याबाबत अपूर्ण माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे सेंद्रिय शेती करणारा शेतकरी बऱ्याच वेळा नुकसान सोसतो. हेटाळण्यासाठी ही लेखमालिका.
या प्रथमलेखात आपण जाणून घेऊया की सेंद्रिय शेती का करावी आणि कोणी करावी?
रासायनिक खतांचा वापर भारतात १९६० नंतर सुरू झाला. त्या आधी भारतात सर्वत्र सेंद्रिय शेती होत होती. स्वातंत्र्यानंतर भारताची सर्वात सूपीक जमीन, सिंधू नदीचा परिसर पाकिस्तानला मिळाला. त्याचा सर्वात जास्त तोटा भारताच्या अन्नधान्य उत्पादनात झाला. भारताला अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली. ही टंचाई भरुन काढण्यासाठी भारतात हरित क्रांती घडवून आणली गेली. अशाप्रकारे भारतीय शेतीत रासायनिकखतांचा शिरकाव झाला. रासायनिकखतांच्या वापरामुळे शेतीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. हळूहळू शेतकऱ्यांचा रासायनिक खतांच्या वापरावर विश्र्वास निर्माण झाला. आणि त्याच्या परिणामस्वरूप रासायनिक खतांच्या वापराची स्पर्धा शेतकऱ्यांत सुरू झाली. वर्षानुवर्षे सेंद्रिय खतांचा भारतात वापर असल्याने रासायनिक खतांचा दुष्परिणाम दिसून यायला बराच काळ लागला. आणि आता स्पष्टपणे दिसून येत आहे.
रासायनिक खतांचे दुष्परिणाम :
१) शेतजमीन नापीक होणे:
कोणतेही रासायनिक खत हे जसेच्या तसे पिकाला लागत नाही. सूक्ष्मजीवांद्वारे अथवा इतर घटकांमुळे रासायनिक खतांचे विघटन होते आणि पिकाला घेता येईल अशा प्रकारात (Available Form) ते पिकाला मिळते. सर्वच खत पिकाला लागत नाही. काही खतांचा विघटन न झालेला भाग शेतजमीनीत तसाच राहतो. आणि असा वापर न झालेला भाग जमिनीत असलेल्या इतर मुलद्रव्यांबरोबर संयोग होतो. अशाप्रकारे शेतजमीनीत क्षार तयार होतात. आपण शेतजमीनीच्या वरच्या भागात/पृष्ठभागावर पांढरा रंगाचा पट्टा दिसून येतो. हा पट्टा क्षारांचा तयार झालेला असतो. तितका शेतजमिनीचा भाग हा नापीक होत असतो. पंजाबमध्ये फार मोठा शेतजमिनीचा भाग हा रासायनिक खतांच्या वापरामुळे नापीक झालेला आहे.
२) जमिनीतील पाण्याचे जलप्रदूषण :
आता तुम्ही म्हणाल की रासायनिक खतांच्या वापरामुळे जलप्रदूषण कसे होते? तर या प्रश्नाचे उत्तर देताना जास्त तांत्रिक बाबीत न जाता सोप्या भाषेत सांगतो. वर सांगितल्याप्रमाणे रासायनिक खतांचा पूर्णवापर होत नाही. काही खताचे क्षारमध्ये रूपांतर होते तर काही खत हे पाण्यात विरघळते. पिकाला खत दिल्यानंतर पाणी देण्याची पद्धत आहे. बरीचशी खते पाण्यात विरघळतात. पाण्याचा जमिनीत निचरा होत असतो. या पाण्याबरोबर खतांचाही निचरा होतो. जास्त पाणी दिले गेले तर हळूहळू हे खतमिश्रित पाणी जमिनीच्या आतील जलसाठ्यात मिसळते. अशा प्रकारे या पाण्याचे प्रदुषण होते. ही प्रक्रिया संथपणे सुरू असते. काही वर्षांनंतर ज्यावेळी दूष्फेन होते त्यावेळी आपल्याला कारणच नाही सापडत. पाण्याचा सामू वाढतो. आणि असे पाणी शेतीसाठी उपयुक्त राहत नाही.
३) मानवी शरीरावरील परिणाम :
भारतात रासायनिक खतांच्या आणि रासायनिक औषधांच्या (किटकनाशके, जंतूनाशकेइ.) वापरावर कोणतेही बंधन नाही. आणि असले तरी ते कागदोपत्रीच आहे. किती प्रमाणात तसेच किती वेळा रासायनिक औषध वापरावेयाचे कोणतेही नियम भारतात नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा प्रमाणापेक्षा कितीतरी अधिक विषपिकावर फवारले जाते. आणि नाही म्हणावे तरी या औषधांचा अंशफळ/भाजीपाला इ. यात येतोच. असे फळ/भाजीपाला आपल्या शरीरात गेल्यावर त्याचा हळूहळू फरक आपल्यावर दिसून येतोच. याला Slow Poisoning म्हणतात. आणि काही वर्षांत आपण अशा आजारांमध्ये सापडतो की तिथून ठीक होणे नाहीच. कर्करोग, हृदयरोग इ. यांची संख्या आजकाल खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येते आहे. कर्करोगाच्या बाबतीत तर भारत संपूर्ण जगात प्रथम क्रमांकावर आहे. ही सगळ्यात धोकादायक बाब आहे. आणि हे होण्याचं कारण रासायनिक खते व औषधे हेच.
४) शेतीचा उत्पादन खर्चात झालेली वाढ:
५ – १० वर्षांपूर्वी एखादा शेतकरी जितके रासायनिक खतांचा वापर करत होता त्याहून जास्त त्याच शेतात वापर करतो. आणि त्यामानाने उत्पादनात वाढ न होता काही वेळा तर कमी झालेले असते. म्हणजेच ५-१० वर्षांपूर्वीपेक्षा आजचा उत्पादन खर्च वाढलेला आहे. त्यापटीने शेतमालाचे भाव वाढलेले नाही. कोणताही व्यवसाय फायद्यात आणण्यासाठी उत्पादन खर्च कमी केला जातो. फक्त रासायनिक खते-औषधांचा वापर केला तर उत्पादन खर्च कमी न होता तो वाढतच जाणार. आणि अशी शेती फायद्यात येणे जवळजवळ अशक्यच. याशिवाय रासायनिक खते-औषधांची किंमतही खूप जास्त असते. या उलट सेंद्रिय खते-औषधाची किंमत ही स्वस्त असते.
या सर्व कारणांमुळे रासायनिक खतांच्या आणि औषधांच्या वापराची शेती पद्धती आपणांस बदलणे अपरिहार्य आहे. कितीही दुष्परिणाम असले तरी कोणतेही सरकार नोटबंदीप्रमाणे रासायनिक खते-औषधांवर बंदी आणू शकत नाही. यासाठी एकच पर्याय राहतो तो म्हणजे सेंद्रिय शेतीबद्दल जनजागृती करणे. ही जनजागृती या घडीला बऱ्यापैकी झालेली आहे. आता आहे ती म्हणजे नेमकी सेंद्रिय शेतीची सुरुवात कशी करावी आणि पीक काढणी पर्यंत काय काय पद्धत वापरावी याची.
घराच्या परसबागेत, शेताच्या जास्तीत जास्त १ एकर तुकड्यात, शहरातील रहिवासी असतील तर गच्चीवरील बागेत (Terrace Gardening) अशा स्थानापासून सेंद्रियशेतीची सुरुवात करावी. ( शेतकऱ्यांनी सेंद्रियशेतीची सुरुवात करताना कधीच संपूर्ण शेत वापरू नये ) .
लेखक
भावेश सोमाणी
मोबाईल नं : – ८३२९२१५४९०
https://krushisamrat.com/organic-and-chemical-fertilizers/
सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.