महाराष्ट्रात उसाची लागण पारंपारिक पद्धतीने टिपरीपासूनच केली जाते. त्यामुळे लागण करतांना बेणे खोल दाबले गेले, खोडव्याचे बेणे वापरले, ११ महिन्यापेक्षा जास्त वयाचे बेणे वापरले तर उगवण कमी होते. नांगे मोठ्या प्रमाणात पडतात आणि गाळपालायक उसांची अपेक्षित संख्या मिळू शकत नाही. काही वेळा टिपरीची टक्कर पद्धतीने किंवा दीडकीने लागण केली जाते. त्यामुळे फुटव्याची संख्या मोठ्या प्रमाणत वाढून उसाची जाडी कमी राहते. पर्यायाने उत्पादनात घट येते. पूर बाधीत क्षेत्रामध्ये हंगाम साधण्यासाठी किंवा शेतातील उभे पिक काढणीस अवकाश असल्यास ऊसाची रोपे तयार करून त्यापासून लागण केल्यास हंगाम साधता येतो, अपेक्षित उसाची संख्या राखणे शक्य होते. आणि त्यामुळे उत्पादनात वाढ होते.
उसाची रोप लागवड करून उसाची लागण केली तर उत्पादनात वाढ होऊन पाणी व खर्चात बचत होते. उसाची लागण नेहमीच्या पद्धतीने केल्यास २ डोळा टिपरी वापरून केल्यास हेक्टरी ३ ते ४ मे. टन उसाचे बेणे लागते. असे पीक सुरुवातीस दाट आणि अतिशय हिरवेगार दिसून येते. परंतु पुढे सुर्यप्रकाश आणि अन्नद्रव्ये यांच्या कमतरतेमुळे ऊस तोडणीचे वेळी गाळपा योग्य उसांची संख्या अपेक्षित मिळत नाही. यासाठी शेतकऱ्यांनी रोप लागणीकडे वळणे आवश्यक आहे.
ऊस रोप लागणीचे फायदे :
१) सुरवातीचा उगावणीचा काळ, एक ते दीड महिन्यापर्यंत रोपे पिशवीत वाढत असल्यामुळे या काळात जमिनीस विश्रांती मिळते. या काळात हिरवळीचे पिक घेण्यास किंवा हंगामामधील घेतलेल्या काढणीस अवधी असल्यास रोपे पिशवित वाढवून हंगाम साधता येते.
२) सुरुवातीच्या काळात पाणी उपलब्ध नसल्यास किंवा मान्सून उशीरा सुरु झाल्यास हंगामात लागवड करता येते.
३) तणांचा बंदोबस्त सुरुवातीच्या काळात औजारांच्या सहाय्याने करता येतो.
४) रोपांची लागवड केल्यामुळे ९० ते १०० टक्के उगवण होऊन योग्य प्रमाणात फुटव्याचे प्रमाण ठेऊन, अपेक्षित गाळपालायक ऊसाची संख्या येते.
५) बेण्याच्या खर्चात बचत होते.
६) फुटव्याची मर कमी होते.
७) बेण्याची वाहतुक कमी खर्चात व कितीही लांब अंतरावर करता येते.
८) पिकाचा कालावधी कमी होतो.
९) पाणी वापर क्षमता वाढते. तसेच खतांचा कार्यक्षम वापर होतो.
करण्यासाठी बेणे निवड :
१) बेणे जड, रसरशीत व निरोगी असावे.
२) बेणे किड व रोगमुक्त असावे.
३) बेणे ९ ते ११ महिने वयाचे असावे.
४) खोडवा ऊस बेण्यासाठी वापरू नये.
ऊस रोपे तयार करण्याच्या पद्धती :
१) गादीवाफ्यावर ऊस रोपे तयार करणे –
गादी वाफ्याच्या क्षेत्राची चांगली मशागत करून गरजेनुसार शेणखत मिसळून १ मी. * २० ते २५ सें.मी. उंच असे गरजेनुसार गादी वाफे तयार करून घ्यावेत. गादी वाफ्यावर लागवड करण्यासाठी बेण्याचे १.५ ते २.५ इंच लांबीचे (डोळ्याच्या वरील बाजूस १ इंच व मुळाकडील बाजूस १.५ ते २ इंच) तुकडे तयार करावेत. लागण केलेल्या वाफ्यावर ऊसाचे बारीक केलेले पाचट किंवा भाताचा भुसा यांचा ०.५ ते १ इंच जाडीचा थर पसरून त्यावर १ ते १.५ इंच चांगल्या गाळाच्या मातीचा थर दयावे. साधारणपणे ३० ते ४० दिवसांनी रोपांना ३ ते ४ हिरवी पाने आल्यानंतर ही रोपे शेतात लागवडीसाठी वापरावीत.
२) एक डोळा रोपांची प्लास्टिक पिशवीतील रोपनिर्मिती –
प्लास्टीक पिशवीत रोपे तयार करण्यासाठी १ मी. रुंद आणि रोपांच्या संख्येनुसार ५ ते १० मी. लांब आकाराचे वाफे तयार करावेत. चांगले कुजलेले शेणखत (३.१) या प्रमाणात घेऊन त्यामध्ये २५ किलो युरिया, ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट टाकून चांगले मिश्रण करावे.
शेतात रोपांची पुर्नलागण करणे –
लागण करण्यापूर्वी शेताला हलके पाणी दयावे व ४-५ दिवसांनी वाफसा आल्यानंतर सऱ्यांमध्ये / दोन रोपांमध्ये जमिनीच्या प्रकारानुसार व व्यवस्थापनाच्या कौशल्यानुसार 45 सें.मी. किंवा ६० सें.मी. अंतर ठेवूनरोपांची लागण करावी. जास्त रूंदीच्या सरीसाठी कोएम ०२६५, को ८६०३२ कोएम ८८१२१, कोव्हीएसआय-९८०५ या जाती जास्त फुटवे येणाऱ्या असून त्यांचा वापर करणे योग्य होईल.
सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.