शेतकरी बचत गटाने दिला उत्साह

0

ओंमकार शेतकरी बचत गटाची यशस्वी वाटचाल
परभणी / प्रतिनिधी
पूर्णा तालुक्यातील माखणी हे गाव जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रातील असल्यामुळे भुईमूग, ऊस व कापूस या नगदी पिकासह पारंपारिक पिकांच्या उत्पादनात नेहमीच अग्रेसर म्हणून परिसरात परिचत असायचे. परंतु काही वर्षांपासून निसर्गाच्या अवकृपेमुळे कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी त्याचबरोबर रासायनिक खताचा अति वापरामुळे उत्पादकतेत मोठी घट होऊन येथील शेती व्यवसाय घाट्यात होत असे. शेतकर्‍यांना नेहमीच आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागते. शेतीमधून वर्षाकाठी जेमतेम उत्पादन हाती लागते. यामुळे शेती व्यवसाय तोट्याचा होत आहे. या पार्श्‍वभूमीवर येथील प्रयोगशील शेतकरी जनार्धन आवरगंड यांनी पुढाकर घेत गावातील सुशिक्षीत तरुणांना एकत्र करुन 1 ऑगस्ट 2018 रोजी (आत्मा) कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या माध्यमातून गावात ओंमकार शेतकरी बचत गटाची स्थापना केली.
या बचत गटाच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या कृषी विषयक योजना शेतकर्‍यांना समजू लागल्या. गटाने आयोजित केलेल्या शिवार फेरीमुळे थेट कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन शेतकर्‍यांना बांधावरच मिळत आहे. यामुळे शेतकरी एकत्र बसुन शेतीच्या विविध बाबीवर चर्चा करु लागले आहेत. कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे प्रत्यक्ष शेतीत नवनवीन तंत्रज्ञान वापराचे प्रमाण वाढत आहे. मागील एक वर्षाच्या कालावधीत बचत गटाच्या माध्यमातून विविध कृषी विषयक चर्चासत्र, शेतीशाळा व शेती विषयक गप्पा गोष्टी गावात होऊ लागल्या आहेत.

बचत गटाच्या वाटचालीविषयी माहिती देतांना गटाचे अध्यक्ष आवरगंड म्हणाले की, गटाचे शेतकरी एकत्र बसून चर्चा करत आहेत. गटातील शेतकर्‍यांसह अन्य शेतकर्‍यांनाही याचा लाभ होत आहे. बचत गटात गावातील एकुण 20 स्त्री-पुरुष शेतकर्‍यांचा सहभाग आहे. विविध शासकीय योजनांची माहिती आमच्या गावातील शेतकर्‍यांना या बचत गटाच्या माध्यमातून दिली जाते. याबरोबरच सुधारीत बियाण्यांचा वापर, बीजप्रक्रीया व शेद्रीयशेती या बाबतीत माहिती देण्यात येते या सर्वाचा सकारात्म परिणाम होऊन उत्पादनात वाढ होत आहे. गटाच्या 28 एकर क्षेत्रावर मागील वर्षी (सन 2017) सोयाबीन- 140 क्विंंटल, तूर (अंतर पिक)- 42 क्विंटल झाले तर यावर्षी तुलानात्मकदृष्ट्या मोठी वाढ होऊन हे उत्पादन (सन 2018) मध्ये सोयाबीन- 252 क्विंटल, तुर (अंतर पिक)- 112 क्विंंटल झाले आहे. यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला. त्याचबरोबर शेतकर्‍यांचा शेतीत नवे प्रयोग करण्याचा हुरुपही वाढत आहे. गटाच्या माध्यमातून गटातील शेतकर्‍यांच्या मातीचे व पाण्याचे परीक्षण, बीज प्रक्रीया व त्याचे प्रात्यक्षिक, खत व्यवस्थापन, ठिबक सिंचन, बांधावर फळ लागवड, गटातील सदस्यांना दुग्ध व्यवसायासाठी आर्थिक मदत, बायोगॅस प्रकल्प, आंतरपिके, खोडवा व्यवस्थापन, यांत्रिकीकरण, जनावरांचा चारा व्यवस्थापन, गांडुळ खत उत्पादन या बाबतीत पुढील काळात उपक्रम राबविण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

ओंमकार शेतकरी बचत गटाला आता पर्यंत आत्माचे प्रकल्प संचालक के.आर.सराफ, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठाचे से.नि.शास्त्रज्ञ डॉ. एन. आर.सिरस, तालुका कृषी अधिकारी खुपसे, जेष्ठ शेतिनिष्ठ शेतकरी अ‍ॅड. गंगाधर (दादा) पवार, पुर्णा तालुक्याचे रेशीम शेतीचे प्रणेते मधुकरराव जोगदंड, अ‍ॅड.रमेशराव गोळेगावकर, पांडुरंग शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांनी भेट देऊन मार्गदर्शन केले आहे. तर आत्माच्या स्वाती घोडके, रमेश सिरस, आर.टी.इकर, कृषी सहाय्यक जी.डब्लु. रनेर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल सुरु आहे.

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushi[email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल
Leave A Reply

Your email address will not be published.