एचएनपीव्ही (HNPV) उत्पादनाची घरगुती पद्धत

0

हेलिओथिस अळी म्हणजेच बोंडअळी किंवा घाटेअळी, या अळीमुळे कापूस, तूर, हरभरा या पिकांप्रमाणेच मका, ज्वारी, सूर्यफूल, टोमॅटो अशा अनेक पिकांचे अपरिमीत नुकसान होते. बाजारात उपलब्ध असलेल्या कीटकनाशकांना या किडीची प्रतिकारक्षमता वाढली आहे. तसेच रासायनिक कीटकनाशकांच्या अवास्तव फवारण्यांमुळे पीक उत्पादनात विषारी अंश (Residue) दृष्टोत्पत्तीस येवू लागले आहेत. बोंडअळीचे नियंत्रण करण्यासाठी परिणामकारक व कमी खर्चाची जैविक कीड नियंत्रण पद्धत प्रचलित झाली आहे. यामध्ये भक्ष्यक कीटक, परोपजीवी कीटक व किडीमध्ये रोग निर्माण करणारे सूक्ष्मजीव यांचा वापर केला जात आहे .

हेलिकोवर्पा न्युक्लिअर पॉलिहेड्रॉसिस विषाणू ( HNPV )

एच.एन.पी.व्ही. मोठया प्रमाणावर उत्पादन करुन घाटेअळी /बोंडअळी नियंत्रणासाठी वापरात येतो. ग्रामीण भागातील महिलांनी एच.एन.पी.व्ही. निर्मिती व वापर तंत्रज्ञानाबाबत आता प्रशिक्षण घेतले पाहिजे. एच.एन.पी.व्ही.च्या फवारणीमुळे प्रभावी कीड नियंत्रण होते. यासाठी महिलांनी हे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पुढाकार घ्यावा. म्हणून एच.एन.पी.व्ही. निर्मितीची सोपी व घरगुती पद्धत समजावून घेणे गरजेचे आहे.

पिके                     हेलिओथिस अळीची ओळख
हरभरा                   घाटेअळी
ज्वारी, बाजरी, मका         कणसातील अळी
गहू                      ओंबी खाणारी अळी
तूर, मूग, चवळी, वाटाणा      शेंगा पोखरणारी अळी
कपाशी                   अमेरिकन बोंडअळी
सूर्यफूल, झेंडू              फुलांवरील अळी
करडई                         बोंडअळी
टोमॅटो, कारली, मिरची फळ पोखरणारी अळी

एच.एन.पी.व्ही. निर्मितीसाठी लागणारे साहित्य :-


१. लहान कुपी किंवा पारदर्शक डबी अथवा बाटली.
२. दोनशे मिली एच. एन. पी. व्ही. मातृवाण
३. मातीचे भांडे
४. भेंडी किंवा हरभरा
५. पांढरा शुभ्र कापूस
६. काळे कापड
७. मध किंवा साखर

एच.एन.पी.व्ही. निर्मितीची सोपी पद्धत :-


शेतातील कपाशी, तूर अथवा हरभरा पिकातून काही बोंडअळया वेचून प्रत्येक कुपीत किंवा डबीत एक याप्रमाणे ठेवावी.

१. या अळयांना कोषावस्थेत जाईपर्यंत (म्हणजे २ ते १० दिवस) कुपीमध्ये किंवा डबीमध्ये भेंडी किंवा कपाशीची कोवळी बोंडे खायला द्यावीत.

२. तळाशी ओली वाळू असलेल्या मातीच्या भांडयात तयार झालेले कोष पसरवून काळया कापडाने भांडयाचे तोंड व्यवस्थित बंद करावे.

३. ग्लासभर पाण्यामध्ये एक चमचा साखर मिसळून द्रावण तयार करावे.

४. या तयार केलेल्या साखरेच्या किंवा मधाच्या द्रावणात कापूस बुडवून पिळून काढावा. नंतर कोषातून बाहेर पडलेल्या पतंगावस्थेतील प्रौढ कीटकाला हाच कापूस खाद्य म्हणून मातीच्या भांडयाच्या तळाशी ठेवावा. भांडयाचे तोंड मात्र काळया कापडाने झाकून घ्यावे.

५. मातीच्या भांडयातील पतंगांनी काळया कापडावर घातलेली अंडी गोळा करावीत.

६. अगोदरच भिजविलेले हरभरा/भेंडी, पारदर्शक डबी/बाटलीत घेऊन त्यामध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे अंडी टाकावीत.

७. अंडयातून बाहेर पडलेल्या अळयांचे १० दिवसांपर्यंत पारदर्शक डबी/बाटलीत संगोपन करावे.

८. ९ मिली पाण्यामध्ये १ मिली एच.एन.पी.व्ही. मातृवाण मिसळल्याने द्रावण सौम्य होते.

९. अळी १० दिवसांची झाल्यावर तिच्या तिस-या अवस्थेपर्यंतच्या काळात सौम्य एन. पी. व्ही. द्रावणात भिजवलेले हरभरा खाद्यासाठी वापरल्याने अळीस एन. पी. व्ही. विषाणु ची बाधा होते.

१०. अशा एन. पी. व्ही. विषाणूग्रस्त अळीमध्ये सूस्तपणा येणे, पोटाचा भाग गुलाबी होणे, नशरीरातू द्रव स्त्रवणे यासारखी लक्षणे दिसू लागतात. नंतर अशी रोगग्रस्त अळी लवकरच मरते.

११. या मेलेल्या अळया गोळा करुन उकळून थंड केलेल्या पाण्यात एक आठवडाभर साठवाव्यात.

१२. अळया पाण्यात पूर्णपणे चिरडून द्रावण तयार करावे. हे मिश्रण ढवळून घ्यावे आणि असे मिश्रण कापडाच्या सहाय्याने गाळून घ्यावे.

१३. हे द्रावण थंड ठिकाणी साठवून बोंडअळीच्या नियंत्रणासाठी ठराविक कालावधीमध्ये वापरता येते. तसेच त्याचा त्वरित वापर करावयाचा असल्यास ही फवारणी संध्याकाळच्या वेळेस पिकावर केल्याने बोंडअळीचे प्रभावीपणे नियंत्रण होते.

टीप :-

५ मि.ली. एन.पी.व्ही. मातृवाणापासून तयार केलेले ५० मिली द्रावण ७५० अळयांना एन.पी.व्ही. चा प्रादुर्भाव होण्यासाठी पुरेसे असते. या रोगग्रस्त अळयांपासून तयार केलेले एन.पी.व्ही. विषाणूयुक्त द्रावण १ एकर फवारणीसाठी पुरेसे आहे. ४० एकर पिकावर फवारणी करण्यासाठी लागणारे द्रावण आणि त्यासाठी पुरेशा प्रमाणात रोगग्रस्त अळया मिळण्यासाठी कृषि विद्यापीठे तथा संशोधन केंद्राकडून उपलब्ध झालेले २०० मि.ली. एच.एन.पी.व्ही. मातृवाण पुरेसे होते.

महत्वाची सूचना :- सदरची माहिती हि कृषी सम्राट यांच्या वैयक्तिक मालकीची असून आपणास इतर ठिकाणी ती प्रसारित करावयाची असल्यास सौजन्य:- www.krushisamrat.com असे सोबत लिहणे गरजेचे आहे.

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.