सोंगणीचा खर्चही निघणे कठीण
शेतकरी हवालदिल
पाचोड / प्रतिनिधी
पैठण तालुक्यातील आडूळ, पाचोड परिसरात तूर, सोयबीन, मका आदी पिकांच्या सोंगणीला सुरुवात झाली असून पावसाने दांडी मारल्याने या पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली असून आलेल्या उत्पन्नातून सोंगणीचा खर्चही निघणे कठिण झाल्याने परिसरातील शेतकरी पुरता हवालदिल झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
यावर्षी पावसाने तब्बल दोन ते अडीच महिने खंड दिल्यामुळे खरीप हंगामात परिसरातील हजारो हेक्टरवरील पिके वाया गेल्यात जमा आहेत. त्यामुळे काही शेतकर्यांनी सोयबीन, तूर, मका आदी पिकांत जनावरे चारायला सोडली आहेत. यामुळे यंदा शेतकर्यांनी शेतीसाठी लावलेला खर्चदेखील निघणे अवघड आहे. याचा धसका घेतलेला शेतकरी हतबल झाला आहे. अशा परिस्थितीतही पिकांचे पंचनामे प्रशासनाकडून होत नसल्याने शेतकरी वैतागले आहेत.
मागील वर्षी कपासीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले होते. याची नुकसान भरपाई म्हणून अल्पशी मदत देऊन शासनाने शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. यंदा चांगला पाऊस पडेल, अशी अपेक्षा शेतकरी बाळगून होता, मात्र निसार्गाने यंदाही हात दाखवत मागील दिवस समोर आणल्याने शेतकरी दिवसेंदिवस कंगाल होत आहे.
यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला पेरणीयुक्त पाऊस पडल्याने शेतकर्यांनी कपाशी, सोयबीन, तूर, मका, मूग आदी पिकांची हजारो हेक्टरवर पेरणी केली होती. रिमझिम पावसावर कशीबशी पीकं तग धरून होती. मात्र ऑगष्टपासुन तालुक्यात पावसाने आतापर्यंत दडी मारल्याने तूर, सोयबीन या पिकांमध्ये दानेच भरले नाहीत. यामुळे मळणी यंत्रातून दाण्याच्या जागी केवळ भुसाच बाहेर निघत आहे.
प्रशासनाने तातडीने शेतकर्यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी परिसरातील मुरमा, थेरगाव, लिंबगाव, रांजगाव, दादेगाव, हार्षी, केकतजळगाव, कोळीबोडखा, दावरवादी आदी ठिकाणच्या शेतकर्यांकडून होत आहे.
खर्चही निघाला नाही
मी 5 एकर क्षेत्रात तूर लागवड केली होती. पाऊस नसल्याने त्या तुरीच्या झाडाला शेंगाच लागल्या नाहीत. कपाशीने दगा दिला, वाटलं तूर साथ देईल परंतु तसे काही झाले नाही. उसनवारी करून शेतीला खर्च केला, पण तो लावलेला खर्चही यावर्षी निघत नाही.
–साईनाथ मापारी, शेतकरी
कर्ज कसे फेडवायचे
यंदा शेतकरी दुहेरी संकटात सापडलेला आहे. निसर्गाची अवकृपा, झाल्याने हातची पिके वाया गेली. उत्पादन कमी झाल्याने उसनवारीचे घेतलेले कर्ज कसे फेडायचे हिच चिंता सतावत आहे.
-कडुबा निर्मळ, शेतकरी, मुरमा.