भोपाळ : मध्यप्रदेशमधील एका शेतकऱ्याने लाचखोर तहसिलदाराला चांगलाच धडा शिकवला आहे. शेत जमिनीचे खातेफोड करण्यासाठी तहसिलदाराने या शेतकऱ्याकडे एक लाखाची लाच मागितली होती. मात्र, इतके पैसे या शेतकऱ्याकडे नसल्याने, त्याने चक्क आपली दुभती म्हैस तहसीलदारांच्या गाडीला आणून बांधल्याचे समोर आले आहे. गरीब शेतकऱ्याने परिस्थितीसमोर हतबल होऊन, म्हैस गाडीला आणून बांधल्याने तहसिलदाराची लाचखोरी चव्हाट्यावर आली आहे.
जमिनीचे नामांतरण (खातेफोड) करून देण्यासाठी या शेतकऱ्याकडे तहसीलदारांनी १ लाख रुपयांची मागणी केली होती. शेतकऱ्याने तहसिलदारांना ५० हजार रुपये दिलेही. मात्र, उर्वरीत ५० हजार रुपये दिल्यानंतर काम होईल. असे या तहसीलदाराने शेतकऱ्याला सांगितले. अधिकाऱ्याने पैसे दिल्याशिवाय काम होणार नाही. असे सांगितल्याने शेतकऱ्याने ५० हजार रुपयांच्या बदल्यात आपली म्हैसचं तहसिलदाराच्या जीपला बांधली.
त्यानंतर, तहसिलदाराला काय करावे हेच कळेना. त्यामुळे लवकरच काम करतो, असे आश्वासन तहसिलदाराने दिले. तसेच पोलिसांना बोलावून ती म्हैसही घेऊन जाण्यास बजावले. त्यावर, पोलिसांनी जीपला बांधलेली म्हैस सोडवून एका झाडाला बांधली. त्यामुळे तात्पुरती तहसीलदाराची सुटका झाली. पण, या घटनेची वाच्यता सर्वत्र झाली असून, या जीपचे फोटोही व्हायरल झाले आहेत. त्यामुळे तहसिलदारांपुढे यक्षप्रश्न उभा राहिला. तसेच ही बातमी जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत पोहोचल्यामुळे त्यांनी एसडीएसकडे याबाबत विचारणा करत अहवाल मागितला आहे.
देवगाव येथील शेतकरी लक्ष्मण यादव यांच्याबाबत ही घटना घडली असून खरगापूरचे तहसिलदार चौकशीच्या फेऱ्यात चांगलेच अडकले आहेत. दरम्यान, याप्रकरणी बलदेवगडच्या एसडीएम वंदना राजपूत यांनी चौकशी सुरू केली असून, तहसिलदार सुनिल वर्मा दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे संकेतही राजपूत यांनी दिले आहेत.
सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल