तुतीच्या बागांना टँकरचा आधार जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकरी संकटात

0

उस्मानाबाद / प्रतिनिधी
सध्या मराठवाड्यासह उस्मानाबाद जिल्ह्याला देखील दुष्काळाची झळ बसत आहे. ग्रामीण भाग वगळता शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. ग्रामीण भागात शेतीला पाण्याची टंचाई असून जिल्ह्यातील पळसप येथील रेशीम उत्पादक शेतकरी लागवडीवर खर्च करुन देखील संकटात आले आहेत. दुष्काळाचा त्यांनाही याचा फटका सहन करावा लागत आहे. तुतीला जगविण्यासाठी चक्क टँकरने पाणी देण्याची वेळ आली आहे.

पळसप येथील राजेंद्र माळी यांनी आतापर्यंत टँकरने पाणी देऊन तुती जगवण्याचा प्रयत्न केला आहे. या शिवारात ऊसासोबतच रेशीम उत्पन्न घेणारे शेतकरी आहेत. गेल्यावर्षी चांगला पाऊस झाल्याने येथील जवळपास 18 शेतकर्‍यांनी 20 एकर क्षेत्रावर रेशीम शेती केली आहे. पारंपारिक शेतीला बगल देऊन येथील काही शेतकरी रेशीम शेतीकडे वळले मात्र, या शेतकर्‍यांना आता दुष्काळी परिस्थितीचा फटका सहन करावा लागत आहे. यावर्षी कमी पर्जन्यमान झाल्याने विहीरी आटल्या, त्याच बरोबर विंधन विहिरीदेखील बंद पडल्या. शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे तुती जगवण्यासाठी पाणीच नसल्याने रेशीम उत्पादक शेतकरी पार मेटाकुटीला आला आहे.

रेशीम (तुती) ची शेती जगविण्यासाठी माळी यांनी पदरमोड करून टँकरच्या सहाय्याने पाणी घालून रेशिम शेती हिरवी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी त्यांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यांना वेळोवेळी 700 रुपये खर्च करून पाच हजार लिटर पाण्याचे टँकर घ्यावे लागत आहे. असा खर्च करुनही त्यांना फायदा होण्याची शक्यता कमीच वाटत आहे.

 

शेतकर्‍यांचे मोठे नुकसान
सध्या रेशीम कोषाला प्रतिकिलोला 100 ते 250 रुपये प्रमाणे भाव मिळत आहे. याची कर्नाटकमध्ये विक्री करावा लागते. त्यामुळे रेशीम कोष व्रिकीसाठी किलोमागे जवळपास 30 ते 40 रुपये शेतकर्‍यांना वाहतूक खर्च येतो. कर्नाटक राज्यात रेशीम कोषाला किलोमागे 50 रुपये प्रोत्साहन अनुदान शेतकर्‍यांना दिले जाते. मात्र, किलोमागे 30ते 40 रुपये वाहतूक खर्च शेतकर्‍यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे रेशीम उत्पादक शेतकर्‍यांना मोठा तोटा सहन करावा लागत असून कर्नाटकप्रमाणेच महाराष्ट्र शासनाने देखील प्रोत्साहन अनुदान देण्याची मागणी शेतकरी करत आहेत. गेल्या वर्षी रेशीम कोषाचा दर 475 ते 650 पर्यंत होता. मात्र, यावर्षी दुष्काळी परिस्थिती असताना देखील दर घसरले असल्याने शेतकरी मोठया अडचणीत आले आहेत. त्यातच दुष्काळामुळे पाण्याची समस्या निर्माण झाल्याने टँकरने पाणी द़यावे लागत असल्यामुळे अडचणीत आणखीनच भर पडली आहे.

 

 

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

Leave A Reply

Your email address will not be published.