एखाद्या गाय किंवा म्हशीचे दूध हे जगभर कुठेही मिळू शकते, तसेच ते सर्वव्यापी, सहज उपलब्ध, तुलनेने स्वस्त आहे. परंतु एखादी गाय किंवा म्हैस “कासे‘ ला चांगली आहे म्हणजे गाई, म्हशीची दूध उत्पादनक्षमता चांगली असे ज्या वेळेस आपण म्हणतो त्या वेळेस “कासे‘त दूध कसे तयार होते हे माहीत असणे गरजेचे आहे. पशुपालकाला गाई, म्हशीच्या कासेमध्ये दूध कसे तयार होते हे समजले तर दुग्ध व्यवसायातील होणाऱ्या चुका दुरुस्त करणे सोपे जाईल. गाई, म्हशीची दूध उत्पादनाची क्षमता ही प्राधान्ये आनुवंशिक दूध देण्याचा गुणधर्म, कासेचा आकार, त्या कासेची ठेवण, कासेतील दूध पेशी संस्था आणि दूध पेशीची दूध तयार करण्याची क्षमता, सकस, समतोल संतुलित आहार, तो खाण्याची आणि पचवण्याची गाई, म्हशीच्या पचनसंस्थेची क्षमता याचबरोबरीने हवामान आणि गाई, म्हशीचे आरोग्य यावर अवलंबून असते. नियमित वर्षाकाठी एक वेत मिळण्यासाठी गाई, म्हशीची प्रजनन संस्था तिचे आरोग्य आणि कार्यशक्ती या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि या पाच आधारस्तंभाच्या कार्यशक्तीवर दुग्ध व्यवसाय स्थिरावेल आणि दुग्ध व्यवसायातील सत्यता टिकेल.
जन्मतःच कालवडीला, पारडीला चार सडे असतात. चांगले आनुवंशिक गुणधर्म असलेल्या कालवडीचे, पारडीचे “सड’ हे बुडाशी फुगीर असतात. कालवडींना, पारड्यांना, सकस, समतोल संतुलित आहार दिला तर योग्य वयात सर्व अवयवाची योग्य वाढ होत जाते. ज्या वेळेस कालवड किंवा पारडी माजावर येते तेव्हापासून तिच्या कासेची वाढ सुरू होते. ज्या वेळेस कालवड किंवा पारडी दर 21 दिवसांनी माज दाखवते. त्या वेळेस रक्तातील संप्रेरकांमुळे कासेची वाढ होण्यास मदत होते. चांगले आनुवंशिक गुणधर्म असलेल्या कालवडीची, पारडीची कास दर महिन्याला 200 ते 250 ग्रॅमने वाढत जाते. चांगले आनुवंशिक गुणधर्म असलेल्या गाई, म्हशीच्या कासेचे वजन 15 ते 25 किलो असू शकते. अशा पूर्ण वाढ झालेल्या चांगले वजन असलेल्या कासेमध्ये दूध तयार करणाऱ्या दूध पेशीची संख्या पाच महापद्य/ 50 हजार कोटी असू शकते. ज्या वेळेस कालवडीची, पारडीची वाढ पूर्ण होऊन गाभण राहिल्यास एक ते पाच महिन्यांपर्यंत दूध नलिकेची वाढ होते, तर सहा ते नऊ महिन्यांच्या गाभण काळात दूध तयार करणाऱ्या पेशीची, दूध पेशी समूहाची वाढ होत असते. म्हणूनच गाभण काळात गाई, म्हशींना शरीर पोसण्यासाठी आणि गर्भ पोसण्यासाठी, सकस, समतोल, संतुलित आहाराचे नियोजन करावे लागते, तरच गाई, म्हशीच्या आनुवंशिक गुणधर्माप्रमाणे अपेक्षित दुधाचे उत्पादन मिळेल. हे सर्व पशुपालक शेतकऱ्यांनी लक्षात घेतले पाहिजे.
कासेची रचना –
कास ही गाई, म्हशीच्या पोटाला स्नायूंनी जोडलेली असते. कासेचे दोन भाग पडतात –
1) उजवा भाग,
2) डावा भाग.
या प्रत्येक भागाचे पुन्हा दोन भाग पडतात. 1) उजवा पुढचा, 2) उजवा मागचा,
3) डावा पुढचा, 4) डावा मागचा.
पुढच्या दोन भागांचे आकारमान मागच्या दोन भागांपेक्षा लहान असते. म्हणून पुढच्या दोन सडांतून 40 ते 45 टक्के दूध निघते, तर मागील भागातील सडातून 55 ते 60 टक्के दूध निघते. कासेला भरपूर प्रमाणात रक्तपुरवठा करण्यासाठी म्हणून दोन मोठ्या शुद्ध रक्तवाहिन्या आणि दोन मोठ्या अशुद्ध रक्तवाहिन्या असतात. कासेतील पेशींना असंख्य केशवाहिन्या असतात. प्रत्येक पेशीची दूध तयार करण्याची क्षमता आनुवंशिक गुण आणि आहार यावर अवलंबून आहे. गाई, म्हशींना त्या कासेतून फिरावे लागते. 500 लिटर रक्तामार्फत कासेला दूध उत्पादनासाठी जो कच्चा माल पुरवला जातो त्यापासून एक लिटर दूध तयार होते. हे प्रत्येक पशुपालक, शेतकरी यांनी लक्षात ठेवले पाहिजे.
गाई, म्हशींनी पान्हा सोडल्यास दूध काढा सात मिनिटातच…
कासेत 24 तास दूध तयार करण्याची प्रक्रिया चालू असते. दूध प्रथम पेशीत तयार होते, नंतर तयार झालेले दूध पेशीसमूहाच्या मोकळ्या जागेत जमा होते. नंतर हे जमा झालेले दूध कासेच्या पोकळीत भरते. वेळच्या वेळी दूध काढताना गाय/ म्हैस “पान्हा’ सोडते. त्या वेळेस दुधाने भरलेल्या पेशी मोकळ्या होऊन कास पोकळीतून “सडा’च्या पोकळीत दूध येते. त्या वेळेस “सड’ ताठरतात. त्या वेळेस आपण गाय किंवा म्हैस पान्हावली असे म्हणतो. ही “पान्हा’ सोडण्याची प्रक्रिया फक्त सात ते आठ मिनिटेच असते. त्याच कालावधीत कासेत जमा झालेले दूध पूर्णपणे लवकरात लवकर काढले पाहिजे.
गाई, म्हशींनी पान्हा सोडण्याची कारणे :
1) दूध काढण्याच्या ठराविक वेळा,
2) खाद्याचा विशिष्ट वास,
3) खाद्याच्या बादल्या, खाद्य टोपले यांचा आवाज,
4) दूध काढणाऱ्या व्यक्तीचा ठराविक वेळी येणारा आवाज किंवा थाप मारून केलेला स्पर्श,
5) ठराविक वेळी, वासरांना दूध पाजण्यासाठी गाई, म्हशीच्या कासेला लावणे ही आहेत.
या गोष्टी आपण दररोज अनुभवतो. अशा ठराविक घटना, ठराविक वेळेस घडतात, त्या वेळेस गाई, म्हशींच्या मेंदूतील ग्रंथींतून एक स्राव पाझरतो. तो फक्त सात ते आठ मिनिटेच टिकतो. मेंदूतील स्रावामुळे गाई, म्हशी पान्हवतात.
जनावरांचे पोषण महत्त्वाचे :
संतुलित खाद्य देण्यापुर्वी गाय, म्हैस कोणत्या शारीरिक अवस्थेमध्ये आहे हे बघून द्यावे. वाढ, गर्भावस्था आणि उत्पादन या शारीरिक भिन्न अवस्था होत. या शारीरिक अवस्था लक्षात घेणे जरूरीचे आहे. जनावरांना प्रथमत: खाद्य शरीराच्या निर्वाहाकरिता लागते. मात्र गाय, म्हैस जर गाभण असेल, तर खाद्याचा काही भाग हा गर्भाच्या वाढीकरिता, गर्भाची पोषणविषयीची गरज भागविण्यासाठी आणि काही भाग हा तिच्या निर्वाहाकरिता लागतो. गाय, म्हैस जर दूध देत असेल तर ती किती दूध देते त्या प्रमाणात तितके दूध तयार करण्याकरिता किती खाद्य लागते, हे प्रथम पहावे, त्यानंतर तिला निर्वाहाकरिता किती खाद्य लागेल हे पहावे अशा रितीने दोन्ही मिळून एकून खाद्य द्यावे. खाद्यात प्रमुख दोन भाग असतात. ओलावा किंवा पाणी आणि कोरडा भाग, जनावरांना त्यांच्या शरीराच्या २.५ ते ३% एवढे कोरड्या प्रमाणात खाद्य लागते.
दुग्ध व्यवसाय करताना या पशुवैद्यकीय बाबी अमलात आणल्या पाहिजेत. प्रत्येक पेशीची दूध तयार करण्याची क्षमता, आनुवंशिक गुण आणि आहार यावर अवलंबून आहे. गाय, म्हैस दूध देत असताना पेशी कार्यक्षम असतात. ज्या वेळेस गाई, म्हशींचा दूध काळ संपत आलेला असतो किंवा गाई, म्हशी आटवल्या जातात त्या वेळेस दूध पेशीची संख्या कमी होते. पेशी दुधात गळून पडतात, पेशी समूह आकुंचन पावतो आणि पुढील येणाऱ्या वेतात सर्व पेशी पुन्हा कार्यक्षम होतात. ही दूध तयार करण्याची नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण ज्या वेळेस कासेचा आजार होतो काही रोगजंतूंमुळे, उदा. स्ट्रेप्टोकोकाय, स्टॅफायलोकोकाय, कोरॅनेबॅक्टेरियम, कोलाय त्या वेळेस मात्र दूध तयार करण्याची प्रक्रिया मंदावते किंवा बंद होते. हे मात्र रोगजंतूंचा प्रादुर्भाव किती टक्के दूध पेशीवर झालेला आहे यावर अवलंबून आहे.
कासेचे आरोग्य जपा
सर्वसाधारणपणे दूध काढल्यानंतर अर्धा तास सडाच्या टोकाचे स्नायू बंद होत नाहीत आणि अशा अवस्थेत गाय किंवा म्हैस जमिनीवर बसल्यास जमिनीवरील, सडावरील रोगजंतू कासेत प्रवेश करतात. काही वेळेस सडाला जखम असल्यास त्या जखमेतून रोगजंतू कासेत प्रवेश करतात. सर्वप्रथम सडात शिरलेले रोगजंतू सडाच्या दूध नलिकेत राहतात. दूध हे रोगजंतू वाढण्याचे चांगले माध्यम असल्यामुळे रोगजंतूंची प्रचंड प्रमाणात वाढ होते. मग हे रोगजंतू दूध पेशीवर, दूध नलिकेवर हल्ला करतात. त्यानंतर दूध समूहावर हल्ला करतात. या रोगजंतूंमुळे दूध पेशींचा नाश होतो. काही दूध तयार करणाऱ्या पेशी फुटतात, तुटतात, गळून पडतात. कासेत असणाऱ्या दूध पेशीचे, दूध पेशी समूहाचे किती नुकसान झाले यावरच दूध तयार करणे अवलंबून आहे. प्राथमिक अवस्थेत पशुवैद्यकाकडून उपचार केल्यास संभाव्य नुकसान टाळता येते. कासेचे आजार होऊ नये म्हणून गाई, म्हशींना गोठ्यात पुरेशी जागा उपलब्ध असली पाहिजे, म्हणजे गाई म्हशी उठताना, बसताना सडावर दाब पडणार नाही, शिंगाने जखमा होणार नाहीत याची काळजी घ्यावी. गोठ्यात मल, मूत्र, पावसाचे पाणी साचणार नाही यांची दक्षता घ्यावी. गोठ्यात खाचखळगे असणार नाहीत याची दक्षता घ्यावी, नाही तर सडांना जखमा होतात. गाई, म्हशींची कास निर्जंतुक पाण्याने धुऊन घ्यावी. नंतर दूध काढावे. कासेतील पूर्ण दूध काढावे. दूध काढणाऱ्याचे हात स्वच्छ, नखे व्यवस्थित काढलेली असावीत. दूध काढण्याच्या वेळा कटाक्षाने पाळा. गोठ्यात चुनाफक्की टाकावी. गोचीड, गोमाश्या, डास यांचा नायनाट करावा. दूध काढणी झाल्यावर शिफारशीत जंतुनाशकाच्या द्रावणात सड बुडवावेत.
दूध कमी मिळण्याची कारणे :
दूध काढणाऱ्याचे हात स्वच्छ, नखे व्यवस्थित काढलेली असावीत. दूध काढण्याच्या वेळा कटाक्षाने पाळा. गोठ्यात चुनाफक्की टाकावी. गोचीड, गोमाश्या, डास यांचा नायनाट करावा. दूध काढणी झाल्यावर शिफारशीत जंतुनाशकाच्या द्रावणात सड बुडवावेत.
दूध कमी मिळण्याची कारणे :
दुग्ध व्यवसाय करताना ज्या वेळेस अपेक्षित दुधाचे उत्पादन होत नाही, त्या वेळेस पशुपालक, शेतकरी यांना संभाव्य कारणे माहीत असणे गरजेचे आहे, त्यामुळे दुग्ध व्यवसायातील झालेल्या चुका दुरुस्त करता येतील. कासेची वाढ व्यवस्थित नसणे ही बाब आनुवंशिक असू शकते. काही वेळेस शरीराची संपूर्ण वाढ होण्यापूर्वीच गाभण राहिली तर कासेची वाढ नीट होत नाही. खास करून संकरित कालवडीचे वजन ११ ते १२ महिन्यांत २५० ते २७० किलो झाल्यावरच फळली पाहिजे.
२) वयस्क गाई, म्हशी दूध कमी देऊ शकतात.
३) वेत – सर्वसाधारण चौथ्या ते पाचव्या वेतानंतर गाई, म्हशी कमी दूध देतात.
४) गाय किंवा म्हैस पाच महिन्यांची गाभण असल्यास दूध कमी देतात.
५) गाई, म्हशींचा खाटा काळ ५० दिवसांपेक्षा कमी असल्यास येणाऱ्या वेतात कमी दूध देतात.
६) आहारात प्रथिने कमी असल्यास क्षार, खनिजे नसली तर दूध कमी मिळते.
७) हवामान, व्यवस्थापनात बदल झाल्यास दूध कमी मिळेल.
८) गाई, म्हशी आजारी असल्यास किंवा काही दुखापत असल्यास दूध कमी मिळेल.
९) गाय किंवा म्हैस व्यवस्थित पान्हावली नाही तर दूध कमी मिळेल. दूध काढण्याच्या जागेत बदल, दूध काढणारा नवखा, त्यामुळे गाय, म्हैस व्यवस्थित पान्हावत नाही.
१०) दूध काढताना घाबरली, नेहमीचे वातावरण नसेल तर दूध कमी मिळेल.
११) दोन धारांतील कमी अंतर असल्यास दूध कमी मिळेल.
१२) गर्भाशयाचा दाह असल्यास दूध कमी मिळेल.
१३) कासेचे आजार असल्यास दूध कमी मिळेल.
दुधातील घटक रक्तातून मिळणारे घटक
1) पाणीपाणी
2) क्षारक्षार
3) जीवनसत्त्वे जीवनसत्त्वे
4) चरबीऍसिटेट, बीटाहैड्रक्सी, बुटीरिक ऍसिड
5) प्रथिने.
शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादीं ची माहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.
https://whatsapp.heeraagro.com
मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!