फुलंब्री / प्रतिनिधी
फुलंब्री तालुक्यात कृषी विभागामार्फत सुरू असलेल्या विविध योजना आणि पिकांची पाहणी नुकतीच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तुकाराम मोटे यांनी केली. दरम्यान संबंधित अधिकार्यांना कृषी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी केल्या. यावेळी तालुका कृषी अधिकारी मेघा पतंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
फुलंब्री तालुक्यात यंदा दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकर्यांना दुष्काळातून सावरण्यासाठी कृषी विभागाच्या विविध योजना गरजू शेतकर्या पर्यंत पोहचवण्याचे कार्य फुलंब्री तालुका कृषी विभागातर्फे सुरू आहे.त्या अनुषंगाने फुलंब्री तालुक्यातील डोंगरावर, कान्होरी आणि पाल येथे प्रत्यक्ष जाऊन सुरू असलेले विविध कामे व पिकांची पाहणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोटे यांनी केली. या दरम्यान मागेल त्याला शेततळे, सामूहिक शेततळे (फळ उत्पादन), यांत्रिकीकरण, पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड, हळद प्रक्रिया युनिट, कांदा चाळसह आदी योजना व पिकांची पाहणी त्यांनी केली. याप्रसंगी त्यांनी सामुहिक शेततळी खोदकामानंतर अस्तरीकरण व कुंपण कामे तात्काळ पूर्ण करून मापन पुस्तिका अनुदानासाठी सादर करणे, एकाच गावात दहा शेततळ्याची खोद काम एकच मशीन धारकांकडून केल्यास पैशांची बचत होऊ शकते, यांत्रिकीकरण योजनेत पूर्व संमती दिलेल्या शेतकर्यांना अवजारे खरेदी करून अनुदानासाठी प्रस्ताव सादर कराव्यात अशा सुचनाही त्यांनी यावेळी केल्या. यावेळी मंडळ कृषी अधिकारी शिरीष घनबहादूर, कृषी पर्यवेक्षक जिदे, कृषी सहाय्यक साळुंके, तुपे, सुर्यवंशी यांच्यासह शेतकर्यांची उपस्थिती होती.