उन्हाळी भात शेती : भाग – १

0

भात हे आपले मुख्य अन्नधान्य पीक असण्याबरोबर राष्ट्रीय अन्नधान्य साठय़ामध्ये या पिकाची महत्त्वाची भूमिका आहे. एकूण अन्नधान्य पिकापैकी ४३ दशलक्ष हेक्टर म्हणजेच ३० टक्के एवढा मोठा वाटा शेतीचा आहे. महाराष्ट्र राज्यात खरीप हंगामातील भातपिकाखाली सुमारे १४.७७ लक्ष हेक्टर क्षेत्र असून यापैकी ३४ हजार ९०० हेक्टर क्षेत्र हे उन्हाळी भातपिकाखाली आहे.

पैकी १५ हजार हेक्टर क्षेत्र कोकण विभागात आहे. नियमित व नियंत्रित पाणीपुरवठय़ाची सोय असलेल्या क्षेत्रात भाताचे उन्हाळी पीक उत्तम येऊ शकते. या हंगामामध्ये मोठय़ा प्रमाणावर हळव्या जाती आणि काही ठरावीक क्षेत्रावर निमगरक्या भात जातींची लागवड केली जाते. भात पिकाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले असताना जिल्हय़ातील शेतकरी मात्र उन्हाळी भातशेतीबाबत उदासीन दिसत आहेत.

उन्हाळी भाताची पेरणी विविध पाण्याच्या स्रेतावर म्हणजेच १५ डिसेंबर ते जानेवारी पहिल्या आठवडय़ापर्यंत करतात. खरीप हंगामातील भातशेतीपेक्षा उन्हाळी शेतीची काही वैशिष्टय़े आहेत. खरीप हंगामात जुलै व ऑगस्ट महिन्यात प्रखर सूर्य प्रकाशित काळ कमी असतो. याउलट उन्हाळी हंगामात भातपिकाच्या वाढीच्या काळात म्हणजेच जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात प्रखर सूर्यप्रकाश भरपूर असतो. त्यामुळे नत्रयुक्त खतास प्रतिसाद जास्त असतो आणि उन्हाळी हंगामात उत्पादन जास्त मिळते.

भाताच्या वाढीस २८ ते ३३ अंश से. उष्ण तापमान चांगले मानवते. उन्हाळी हंगामातील जास्त तापमान व कमी आद्र्रतेचे प्रमाण यामुळे प्रतिकूल हवामानामुळे काही कीटक व रोगराईचे प्रमाण खरीपापेक्षा काही प्रमाणात कमी राहते. उन्हाळी हंगामात भातपिकाची उंची खरीप पिकापेक्षा कमी असते. तसेच खरीपापेक्षा उन्हाळी भातात तांदळाचे प्रमाण कमी असते. उन्हाळी हंगामामध्ये नियमित व नियंत्रित पाणीपुरवठय़ामुळे तण कमी असते. उन्हाळी पिकाची उंची कमी, परंतु चुडात कणसे असलेल्या फुटय़ांची संख्या जास्त असते आणि त्यामुळे भाताचे उत्पादन खरीप हंगामापेक्षा जास्त येते.

भात जातींचे प्रमाणित बियाणे खरेदी केलेले असेल तर बियाण्यास प्रक्रिया करावयाची आवश्यकता नसते. स्वत:कडील बियाण्यास प्रक्रिया करणे आवश्यक असते. रत्ना, रत्नागिरी १, कर्जत १८४ या सुधारित जाती तर सहय़ाद्री, प्रोअ‍ॅग्रो ६४४४ या संकरित जाती आहेत. परंतु, या सर्वाना पाण्याची भरपूर उपलब्धता आवश्यक असल्याने शेतक-यांची स्थानिक जातीनाच जास्त पसंती आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामात कृषी विभागाकडून बियाणे पुरविले जात नाही.

स्थानिक जातीचे भात पाणी नसल्यास जमिनीतील ओलीवर चांगल्या प्रकारे उत्पादन देते. दरम्यान भाताच्या एखाद्या स्थानिक जातीवरून सुधारित जातीचे भात बनविण्यासाठी कृषी विभागाकडून कोकण विद्यापीठात संशोधन करण्याबाबतची मागणी यापूर्वीच करण्यात आली आहे. स्थानिक जाती पाण्याचा ताण सहन करणारा असल्याने फेब्रुवारीमधील पाणी टंचाईच्या काळात सुद्धा भातपीक चांगले मिळते.

उन्हाळी भात लागवडीसाठी स्थानिक जातींबरोबरच रत्नागिरी ७३, रत्नागिरी २४, कर्जत १८४, कर्जत ३, कर्जत ४, रत्नागिरी ७११, रत्ना, सह्याद्री, सह्याद्री ३, २, ४, कर्जत ६, पालघर १ आदी साडेतीन ते चार महिन्यात तयार होणा-या जाती वापरतात. तण नियंत्रणासाठी लावणीनंतर ५ ते ७ दिवसांनी हेक्टरी २५ ते ३० किलो ब्युटाक्लोर किंवा ७० ते ८० किलो २-४ डी वाळूमध्ये मिश्र करून सुरुवातीच्या ३ ते ४ दिवसात चिखलावर पसरावे. तसेच शेतीतील पाण्याची पातळी २ ते ३ से. मी. इतकी कायम असावी. तसेच कापणीपूर्वी १० दिवस अगोदर शेतातील पाण्याचा पूर्ण निचरा करावा. पाण्याचे स्रेत उपलब्ध नसल्याने शेतकरी उन्हाळी भातशेतीबाबत उदासीन दिसत आहे. ठिकठिकाणच्या नद्यांवर बांध बांधून पाण्याची उपलब्धता निर्माण झाल्यास वायंगणी भातशेतीमध्ये क्षेत्रामध्ये वाढ होणे शक्य आहे.

पूर्व मशागत

दुस-या नांगरणीपूर्वी हेक्टरी ७.५ टन शेणखत किंवा कंपोट खत टाकावे. पाण्याचे नियोजन करून चिखलणी करावी. चिखलणीच्या वेळी ५.0 टन गिरीपुष्प हिरवळीचे खत शेतात मिसळावे. यामुळे ५० टक्के नत्र खताची बचत होऊ शकते. उन्हाळी हंगामासाठी भाताची पेरणी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करावी.

रोपवाटिका व्यवस्थापन

ज्या ठिकाणी रोपवाटिका तयार करावयाची आहे ती जमीन नांगरुन ढेष्कळ फोडून घ्यावीत. रोपवाटिकेला पाण्याचे योग्य नियोजन करता येईल अशा ठिकाणी रोपवाटिका असावी. एक हेक्टर क्षेत्र लागवडीसाठी १० आर क्षेत्रावरील रोपवाटिका पुरेशी होते. ढेकळे फोडून झाल्यानंतर प्रती गुंठा (आर) क्षेत्रात १oo किलो शेणखत अथवा कंपोट खत जमिनीत मिसळावे. जमिनीचा उतार लक्षात घेऊन, उंच निच-याच्या जागी तळाशी १२0 सें.मी. व पृष्ठभागी ९० सें.मी. रुंदीचे, ८ ते १० सें.मी. उंचीच्या उतारानुसार योग्य त्या लांबीचे गादीवाफे तयार करावेत. वाफ्यांना प्रती गुंठा क्षेत्रास १ किलो युरिया व ३ किलो सिंगल सुपरफॉस्फेट द्यावे. प्रती किलो बियाण्यास २.५ ते ३ ग्रॅम प्रमाणे थायरम किंवा इमिसान हे बुरशीनाशक चोळावे. तसेच प्रती किलो बियाण्यास २५ ग्रॅम अझोटोबॅक्टर हे जिवाणूखत पाण्यात विरघळवून त्याची पेस्ट करून चोळावे आणि सावलीत सुकवावे. वाफ्यावर रुंदीस समांतर ७ ते ८ सें.मी. अंतरावर ओळीमध्ये २ ते २.५ सें.मी. खोलीवर बी पेरावे आणि ते मातीने झाकून घ्यावे. जाड दाण्याच्या जातीकरीता हेक्टरी ५o ते ६० किलो आणि बारीक दाण्याच्या जातीकरीता हेक्टरी ३५ ते ४0 किलो तर संकरित जातींसाठी हेक्टरी २० किलो बियाणे पेरावे. पेरणीनंतर १५ दिवसांनी प्रती गुंठा क्षेत्रास १ किलो युरिया खताचा दुसरा हाता द्यावा. रोपवाटिकेमधील तणांच्या बंदोबस्तासाठी पेरणीनंतर वाफे ओले होताच ऑक्झीडायरजील (६ टक्के) प्रती लीटर पाण्यात ३ मि.ली. या प्रमाणे प्रती गुंठा क्षेत्रावर ५ ते ६ लीटर पाणी या प्रमाणात फवारावे. फवारणी उलट्या दिशेने चालत करावी, म्हणजे फवारणी केलेल्या वाफ्यावर तणनाशकाचा थर राहील.

लावणी

रब्बी व उन्हाळी हंगामात पेरणीनंतर सुमारे ३५ ते ४० दिवसांनी रोपे लावणी योग्य होतात. त्यावेळी रोपांची उंची सुमारे १२ ते १५ सें.मी. व ५ ते ६ पाने फुटलेली असतात. रोपे उपटण्यापूर्वी दोन दिवस अगोदर पाणी द्यावे. जमिनीच्या मगदुराप्रमाणे लावणी १५ x १५ किंवा २० x १५ सें.मी.

अंतर ठेवून करावी.लावणी  सरळ उथळ (२.५ ते ३.५ से.मी. खोल ) करावी. उथळ लावणी केल्याने  फुटवे चांगले येतात. एका चुडात २ ते ३  रोपे  लावावीत. संकरिंत भातासाठी एका चुडात एकच रोप लावावं.

खत व्यवस्थापन

रब्बी व उन्हाळी भातास हेक्टरी १२० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश द्यावे. पहिला हफ्ता चीखलनिची वेळी ४८ किलो (सुमारे १०४ किलो युरिया ), ५०किलो स्फुरद (३०० किलो सिंगल सुपर  फॉस्फेट) आणि ५८ किलो पालाश (८५ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) तर दुसरा हफ्ता फुटवे  येण्याच्या वेळी हेक्टरी  ४८ किलो नम्र (लावणींनंतर ३५ ते ४० दिवसांनी आणि तिसरा हफ्ता पीक फुलोऱ्यात असताना हेक्टरी २४ किलो नत्र (लावणीनंतर ७० ते ८० दिवसांनी ) द्यावा किंवा १० टन गिरिंपुष्पाचा पाला चिखणींच्या वेळी शेतात गाडावा. हेक्टरी ५ टन गिरींपुष्पाचा पाल चिखलनीच्या वेळी दिल्यास वरील नत्राच्या  मात्रा ५० टक्के कमी करता येऊ शकतात.

भाताच्या सुवासिक जातींसाठी हेक्टरी ८० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश द्यावे. नत्र तीन वेळा विभागून द्यावे. रॉक फॉसफेटमधून स्फुरद देताना सोबत हेक्टरी  कमीतकमी ३ टन गिरीपुष्पाचे हिरवळीचे खत द्यावे. युरिया व डिएपी ब्रिकेटचा वापर नियंति लावणींनंतर त्याच दिवशी करावा. प्रत्येक चार चुडांच्या चौकोनात मध्यभागी २.७ ग्रॅम वज़नाची एक गोळी  (ब्रिकेट) हातान ७.५ ते १० से.मी. (३ ते ४ इंच) खोल खोचावी. एक गुंठ्यास ६३५ ब्रीकेट्स (१.७५ कि.ग्रॅ.) पुरतात. त्याद्वारे प्रती हेक्टर  ५७ कि. ग्रॅम नत्र व ३३ कि.ग्रॅम स्फुर्द पिकास उपलब्ध होते.

आंतरमशागत व पाण्याचे नियोजन

लावणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी कोळपणी करून शेतात बेणणी करावी. तणांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी व्युटॅक्लोर हेक्टरी १.५ किलो क्रियाशील घटक या प्रणाणात लावणीनंतर ४ दिवसांनी फवारावे. रोपे चांगली पमुळ धरेपर्यंत शेतात २  ते ५ से.मी. पाणी ठेवावी. लोब्या येण्यापूर्वी हा दिवस व लांब्या आल्यानंतर दहा दिवसापर्यंत शेतात पाण्याची पातळी १८ से.मी. ठेवावी. पिकातील दाणे भरेपर्यंत पाण्याची पातळी ५ से.मी. ठेवावी . त्यानंतर कापणीपूर्वी ८ ते १० दिवस शेतातील पाणी काढावे.

कापणी

सुमारे ९० टक्के दाने पिकल्यावर व रोपे हिरवट असतानाच वैभव विळ्याने जमिनीलगत कापणी करावी. मळणीनंतर २ ते ४ उन्हे देऊन धान्य वाळवावे.

https://krushisamrat.com/charusuthi-rice-planting-part-2/

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.