उन्हाळ्यातील आहार
उकाडा जाणवायला लागला म्हणजे उन्हाळा सुरु असे समजावे , थोड काही थंड प्यायल्यावर होणारा खोकला, ताप.. गरम पदार्थ नकोसे वाटण आणि थंड खाल्ले की त्रास होतो. मग या अशा उन्हाळ्यात नेमके आहार घ्यायचा तरी काय?
सद्याच्या काळात उष्णतेमध्ये खूपच वाढ होत आहे, त्यामुळे शरीरातील पाणी कमी होतो. घामामुळे पोषक द्रव्ये शरीराबाहेर निघून जातात. अशक्तपणा जाणवतो. जेवढे काम करतो, त्यापेक्षा जास्त दमायला होते. या आधीच्या ऋतूत म्हणजे हिवाळ्यामध्ये शिशीरामध्ये खूप थंडी असते. या काळात शरीरात कफाचे प्रमाण वाढलेले असते. हा साठलेला कफ वसंत ऋतूतील उष्णतेमुळे पातळ होऊ लागतो. शरीरातील कफ पातळ झाल्याने हिवाळ्यात वाढलेली भूक उन्हाळ्यात कमी होते आणि अपचनाचे विकार वाढतात. त्यामुळे शरीरातील पाण्याचा समतोल राखणारे पदार्थ खायला हवेत.
गुढीपाडव्याला कडुनिंबाची पाने वाटून, त्यात सुंठ, ओवा, जीरे, साखर, सैंधव मीठ घालून चटणी तयार करतात. ही चटणी कफ कमी करण्यासाठी आणि भूक वाढवून खाल्लेले अन्न पचवण्यासाठी अत्यंत योग्य आहे. चैत्रात येणाऱ्या रामनवमी व हनुमानजयंतीलाही सुंठवडा देतात. सुंठ कफ कमी करते, भूक वाढवते, पचन सुधारते. त्यामुळे तहान भागवण्यासाठी धने-जीरे-खडीसाखर यांचे पाणी घेतो तेव्हा त्यात चिमटीभर सुंठपावडर अवश्य घालावी. थंड पेयाचे जास्त सेवन टाळावे.
सकाळचा नाश्ता – सकाळी अनशापोटी एक ग्लास कोमट पाणी प्यावे. (मध व गरम पाणी आयुर्वेदात निषिद्ध सांगितले आहे.) दिवसभर कामासाठी आपल्यात उर्जा राहील, असा नाश्ता करावा. तूप, गूळ, पोळी किंवा तूप-साखर-पोळी, मुगाचे घावन, भाजणीचे थालीपीठ, मेथी-मुळा-गाजर-कोबी-फ्लॉवर अशा भाज्या घालून पराठे, जोंधळा किंवा बाजरीची भाकरी, लसूण-पुदीन्याची चटणी, उपमा, पोहे यापैकी काहीही चालू शकेल. सकाळी दूध प्यायचे असल्यास कोमट दूधात पाव चमचा सुंठ व पाव चमचा हळद पावडर टाकून प्यावे. वेळ नसेल किंवा वृद्धांना भूक नसेल तर भाताची पेज-तूप-जीरे-सुंठ घालून घेतली तरी उत्तम. उन्हाळ्यात थोडय़ाशा श्रमानेही अशक्तपणा वाढत असल्याने कामावर जाणाऱ्यांनी नाश्ता करूनच निघावे. संध्याकाळी नाश्तामध्ये अनेकदा बाहेरचे जंक फूड व त्यानंतर कोल्डड्रींक्स घेतले जाते. त्याऐवजी मुगाचा किंवा कणकेचा लाडू, खाकरा, कणकेचे शंकरपाळे, भाताच्या लाह्य़ांचा चिवडा, पोहे-कुरमुऱ्याचा चिवडा, एखादे फळ असा बदल करता येईल.
दुपारचे जेवण – घरी असणाऱ्यांनी वरण किंवा आमटी भात, कोथिंबीर-आलं-पुदीन्याची चटणी, काकडी-टोमॅटो-बीट-गाजर-कांदा या पैकींची कोशिंबीर, नेहमी मिळणाऱ्या हिरव्या फळभाज्या किंवा पालेभाज्या आणि फुलके किंवा पोळी असाच आहार ठेवावा. जेवणानंतर धणे-जिऱ्याची पावडर घालून ताक अवश्य प्यावे. दुपारच्या जेवणात िलबू अवश्य ठेवावे. मूग, मूगडाळ, तूरडाळ, मसूर, कुळीथाचे पीठ यांचा वापर असावा. मटकी, लाल चवळीही चालेल मात्र वाल, पावटा, छोले, राजमा, हरभरा ही वातूळ कडधान्ये टाळावीत. हिरव्या मिरचीपेक्षा लाल तिखटाचा वापर करावा. दुपारी कामावर जेवणाऱ्यांनी शक्यतो पोळी भाजीच न्यावी. थंड झालेले जेवण नेहमीच पचायला जड व कफ वाढविणारे व जेवणानंतर सुस्ती आणणारे असते. त्यामुळे हिरव्या भाज्या, फळभाज्या व पोळी किंवा फुलके असाच हलका आहार घ्यावा.
रात्रीचे जेवण – रात्रीचे जेवण हलके असावे. वरण-भात-तूप-लिंबू-ताक किंवा पोळी-भाजी-आमटी किंवा ज्वारी-बाजरीची भाकरी-भाजी किंवा मूगाची खिचडी-कढी-ताक यापैकी काहीही एकच खावे. जेवणाच्या सुरुवातीला भाज्यांचे सूप (गरम) घ्यायला हरकत नाही. शक्य असल्यास दोन्ही जेवणात घरच्या साजूक तुपाचा अवश्य वापर करावा. दुपारी मांसाहार करण्याची सवय असेल, त्यांनी निदान रात्रीच्या जेवणात तरी पचनाच्या दृष्टीने पालेभाजी अवश्य ठेवावी.
फलाहार – वेलची केळे, गोड मोसंबी, सफरचंड, डाळींब, पेर ही फळे सर्वाना चालतील. कफाचा सहसा त्रास होत नसेल त्यांना हिरव्या सालीचे केळे, गोडे संत्र, कलिंगड, पेरू ही फळे चालतील. नाश्ता आणि जेवण यांच्या मधल्या काळात फळे खावीत. चवीला आंबट असणारी फळे – द्राक्ष, अननस, सीताफळ- उन्हाळ्याच्या सुरुवातीला टाळावीत.
पाणी – प्रत्येक जेवणात मधे मधे थोडे पाणी प्यावे. जेवणानंतर एकदम पाणी पिऊ नये. जेवताना फ्रीजच्या पाण्याचा वापर तर कटाक्षाने टाळावा. माठातील पाणी चालेल. पाण्यात वाळ्याची पुरचुंडी टाकून पाणी प्यावे. एसीमध्ये आठ-दहा तास काम करताना तहान लागत नाही. तरी या ऋतूत लक्षात ठेवून दिवसभरात आठ ते दहा ग्लास पाणी अवश्य प्यावे. जितके थंड पाणी प्याल, तेवढीच तहान आणखी वाढत जाते, तहान वाढून जितके जास्त पाणी प्याल, त्याने भूक मंदावत जाते. धने-जीरे-खडीसाखर घालून उकळवून थंड केलेले किंवा आले किंवा सुंठ-साखर घालून उकळवून थंड केलेले पाणी प्यावे.