कोबीची यशस्वी लागवड

1

पानकोबी ही वनस्पती मोहरी कुळातील असून भाजीसाठी कोबीचे पीक हे प्रकार आणि जातीनुसार ६० ते ९० दिवसांत तयार होते. ही टिकायला आणि वाहतुकीला सोयची तसेच आहार दृष्ट्या अतिशय पौष्टीक अशी भाजी आहे. पानकोबीमध्ये अग्रांकुराभोवती मांसल पाने एकमेकांवर घट्टपाने वाढून त्या पानांचा गड्डा तयार होतो. हा गड्डा भाजीसाठी वापरतात. घट्ट आणि वजनदार गड्डा दर्जेदार समजला जातो. पानकोबीमध्ये ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतात. तसेच फॉस्फरस, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम ही खनिजे मोठ्या प्रमाणात असतात. पानकोबीची भाजी पचनास हलकी असून तिचा उपयोग सारक म्हणून करतात.

हवामान आणि जमीन – पानकोबीचे पीक थंड हवामानात चांगले वाढते. या पिकाच्या वाढीसाठी तसेच गड्डा पोसण्यासाठी १५ ते २५ अंश सेल्सिअस तापमान अतिशय पोषक असते. कोबीचा गड्डा भरत असताना तापमान वाढले तर पानांची वाढ होऊन गड्डे पोकळ राहतात. तसेच तापमान सारखे कमी – जास्त झाल्यासही पिकाची वाढ चांगली होत नाही आणि गड्ड्यांची प्रत खराब होते. अलीकडच्या काळात उष्ण हवामानातही दर्जेदार उत्पादन येणार्‍या नवीन आणि संकरीत जाती विकसित केल्यामुळे प्रतिकूल हवामानातही कोबीचे पीक घेणे शक्य झाले आहे. कोबी लागवडीसाठी मध्यम ते भारी पोयट्याची सुपीक आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. हलक्या जमिनीत पुरेसे सेंद्रिय खत वापरून कोबीची लागवड व्यापारी दृष्ट्या करता येत.

उन्नत आणि संकरीत वाण – कोबीच्या अनेक सुधारीत आणि संकारीत जाती उपलब्ध आहेत. दरवर्षी नवानविन जाती प्रसारित केल्या जातात. पाश्चिमात्य देशांत फिकट हिरव्या किंवा पांढरट हिरव्या आणि गोल गड्ड्याच्या जातीशिवाय रंगांचे, सुरकुतलेल्या पानांचे (सॅव्हॉय कॅबेज) तसेच गोल, उभट किंवा चपटे गड्डे असलेले अनेक प्रकार आहेत. लालकोबीमध्ये अनेक प्रकार असले तरी रेड एकर या गोड गड्ड्याच्या वाणाची तसेच सॅव्हॉय प्रकारातील फिकट हिरव्या रंगाच्या चपट्या गोल परफेक्शन (चिप्टन) या वाणाची लागवड करतात.

भारतात फिकट हिरवे, गोल किंवा किंचित चपट्या आकाराचे गड्डे जास्त लोकप्रिय आहेत. म्हणून व्यापारी तत्त्वावर याच प्रकारच्या जातींची लागवड केली जाते. या प्रकारच्या कोबीचे गड्डे तयार होणार्‍य कालावधीवरून

(१) हळव्या जाती (लवकर तयार होणार्‍या), आणि

२) गरव्या जाती (उशीरा तयार होणार्‍या) अशा दोन गटांत कोबीच्या जातींची विभागणी करतात.

१) हळव्या जाती – या जातींचे गड्डे रोपांच्या लागवडीनंतर ६० ते ७० दिवसांत तयार होतात. या गटातील बहुतेक जातींचे गोल, घट्ट, मध्यम आकाराचे असून त्यांचा रंग फिकट किंवा पांढरट हिरवा असतो. या गटातील ‘गोल्डन एकर’ ही जात उत्तम असून भारतात अत्यंत लोकप्रिय आहे. ह्या ‘शिवाय ‘प्राईड ऑफ इंडिया’ , ‘कोपनहेगम मार्केट’, ‘सिलेक्शन एक्स्प्रेस’ , इत्यादी जाती प्रसिद्ध आहेत. या जातींचे उत्पादन हेक्टरी २० ते ३० टन इतके मिळते.

२) गरव्या जाती – या जातींचे गड्डे रोपांच्या लागवडीपासून १०० ते ११० दिवसात काढणी साठी तयार होतात. या जातींचे गड्डे मोठे, ३ ते ५ किलो वजनाचे अर्धगोल ते चपट्या आकाराचे आणि फिकट हिरव्या रंगाचे असतात. या जातींचे उत्पादन हेक्टरी ४० ते ५० टन इतके मिळते. हॉटेल आणि खानावळींमध्ये या जातीच्या गड्ड्यांना चांगली मागणी असते. पुसा ड्रम हेड, लेट ड्रम हेड, सप्टेंबर या पानकोबीच्या उशिर येणार्‍या जाती आहेत. गड्ड्यांच्या आकारावरून पानकोबीच्या जातींची खालीलपमाणे तीन गटांत विभागणी करतात.

१) गोल गड्ड्याच्या जाती – या जातीच्या गड्ड्यांचा आकार गोल किंवा अर्धगोल असून गड्डे घट्ट असतात. या जातीचे गड्डे हिरव्या, पांढर्‍या किंवा तांबड्या रंगाचे असतात. उदाहरणर्थ गोल्डन एकर, प्राईड ऑफ इंडिया, एक्सप्रेस, श्रीगणेश गोल, इत्यादी गोल गड्ड्याच्या जाती लवकर तयार होतात.

पुसा मुक्ता – कटरेन येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या प्रादेशिक केंद्रात सिलेक्शन -८ नावाने विकसित झालेली गोल्डन एकर लिका उत्पन्न्त सरस असून आखूड खोडाचा, ब्लॅकरॉट रोगाला प्रतिकारक असलेला वाण आहे.

२) चपट्या गड्ड्याच्या जाती – या जातींचे गड्डे उशीर तयार होतात, परंतु उत्पादन जास्त मिळते. उदाहरणार्थ : पुसा ड्रम हेड, लेट ड्रेम हेड.

३) उभट गड्ड्याच्या जाती – या जातींचे गड्डे उभट आणि घटत असतात. या जातीचे गड्डे लवकर तयार होतात. थंड हवामानात या जाती अधिक लोकप्रिय आहेत. या प्रकारात चार्ल्सटन वेकफील्ड, जर्सी या जाती प्रसिद्ध आहेत. या व्यतिरिक्त कल्याणी, सिलेक्शन -९ हे चांगले वाण आढळून आले आहेत.

संकरीत (हायब्रीड) जाती – 

कावेरी – ही जात जास्त तापमान सहन करू शकते. त्यामुळे उन्हाळी हंगामासाठी ही जात चांगली आहे. या जातीची पाने निळसर हिरव्या रंगाची असून गड्डे घट्ट असतात. या जातीच्या गड्ड्यांचे सरासरी वजन २ किलो इतके भरते. रोपलागवडीपासून ६५ ते ७५ दिवसांत गड्डे काढण्यासाठी तयार होतात. या जातीचे हेक्टरी उत्पादन ५० ते ७५ टन इतके मिळते.

रोपे तयार करणे –

बीजप्रक्रिया – ५० ते १०० ग्रॅम बियासाठी २० ते ३० मिली जर्मिनेटर आणि १५ ते २० ग्रॅम प्रोटेक्टंटची पेस्ट बनवून बियाण्यास चोळून लागवड करावी.

गादीवाफ्याच्या रुंदीशी समांतर ५ ते ६ सेंमी अंतरावर पडेल अशा तर्‍हेने बियाणे विरळ पेरावे. साधारणपणे एका चौरस मीटरला १ ग्रॅम बियाणे पडेल अशा तर्‍हेने बियाणे विरळ पेरावे. साधारणपणे एका चौरस मीटरला १ ग्रॅम बियाणे पडेल अशा रीतीने बियाण्याची पेरणी करावी. बी लगेच मातीने झाकून घेऊन झारीने पाणी द्यावे. बियाण्याची पेरणी दाट झाल्यास बियाणे उगवून आल्यानंतर रोपांची विरळणी करवी. साधारणपणे ३ ते ५ आठवड्यांत कोबीची रोपे लागवडीसाठी तयार होतात.

हंगाम बियाण्याचे प्रमाण आणि लागवडीचे अंतर– कोबी लागवडीसाठी अनुकूल हवामानाबरोबर बाजारभाव, बाजारात मालाला असलेली मागणी, उठाव आणि कीड व रोगांची लागण या गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे. बेताचा पाऊस (५०० ते ७०० मिलीमीटर) आणि सरासरी तापमान ३० अंश सेल्सिअसपेक्षा कमी असल्यास कोबीची लागवड महाराष्ट्रात खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात करता येते. अधिक तापमान सहन करणार्‍या काही संकरीत जातींची उन्हाळी हंगामासुध्दा लागवड करता येते.

ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत रोपांची लागवड केल्यास भरपूर उत्पादन मिळते आणि मालाचा दर्जा उत्तम मिळतो. किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो, परंतु बाजारभाव साधारण कमी मिळतो. फेब्रुवारीनंतर लागवडीत तापमान वाढू लागल्यामुळे रोपांची वाढ खुंटते. गड्डे लहान राहतात अथवा गड्डे अजिबात न भरण्याचे प्रमाण वाढते. तसेच मावा आणि गड्डा पोखरणारी अळी या किडींचा उपद्रव वाढतो. परंतु या काळात बाजारभाव जास्त असतात. त्यामुळे जानेवारी – फेब्रुवारी या काळातील लागवडीमुळे भरपूर उत्पन्न मिळते.

जुलै ते ऑक्टोबर या काळातील लागवडीस बर्‍यापैकी बाजारभाव मिळतात. मात्र या काळात किडीचा उपद्रव वाढतो. तसेच गड्डे लहान आकाराचे राहतात. त्यामुळे उत्पादन कमी मिळते. म्हणून शेतकर्‍यांनी बाजारभाव आणि रोग व किडींचा उपद्रव आणि पाण्याची उपलब्धता या बाबी लक्षात घेऊन कोबी लागवडीचा हंगाम ठरवावा. खरीप हंगामासाठी रोपवाटीकेत बियाण्याची पेरणी मे – जूनमध्ये करावी. रब्बी हंगामात सप्टेंबर ते ऑक्टोबर आणि उन्हाळी हंगामासाठी जानेवारी महिन्यात रोपे तयार करावीत.

बियाणे – खरीप हंगामातील लागवडीसाठी हळव्या जातींचे सुमारे ५०० ग्रॅम बियाणे लागते. गरव्या जातीचे ३०० ते ४०० ग्रॅम बियाणे लागते. तर संकरीत जातींचे एक हेक्टर लागवडीसाठी २०० ते २५० गरम बी पुरेसे होते.

रोपवाटिकेला नियमित पाणी देणे आवश्यक आहे. मात्र कोबीवर्गीय भाजीपाला पिकांच्या रोपांना जास्त पाणी देऊ नये. रोपवाटिकेत झपाट्याने वाढणार्‍या तणांचा वेळोवेळी बंदोबस्त करावा. रोपवाटिकेतील कोवळ्या रोपांवर काळी माशी (मस्टर्ड सॉ फ्लाय) आणि हिरवी अळी (फ्ली बीटल) या किडींचा प्रामुख्याने उपद्रव होतो. या किडी रोपाची कोवळी पाने खातात आणि शेवटी फक्त पानांच्या शिराच शिल्लक राहतात. त्यांच्या नियंत्रणासाठी १० लिटर पाण्यात १० मिळू नुवफ्रॉन किंवा रोगार + १० ग्रॅम बाविस्टीन + जर्मिनेटर,  थ्राईवर,  क्रॉंपशाईनर प्रत्येकी मिसळून दर १० दिवसांच्या अंतराने रोपवाटिकेत फवारणी करावी.
बियाण्यांच्या पेरणीनंतर हंगामानुसार ३-४ आठवड्यांत रोपे लागवडीसाठी तयार होतात. गादीवाफ्यावरून रोपे उपटून शेतात लावताना आदल्या दिवशी वाफ्यांना पुरेसे पाणी द्यावे. त्यामुळे रोपे उपटतान मुळांना इजा होणार नाही.
दोन रोपांतील आणि रोपांच्या दोन ओळींतील अंतर ठरविताना जमिनीची सुपीकता, कोबीची जात, हंगाम इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. भारी काळ्या कसदार जमिनीत लागवडीचे अंतर जास्त ठेवावे, तर हलक्या जमिनीत कमी अंतरावर लागवड करवी. पसरट जोमाने वाढणार्‍या आणि उशिरा तयार होणार्‍या जातींची लागवड करताना लागवडीचे अंतर जास्त ठेवावे. रोपांची आटोपशीर वाढ मध्यम आकाराचा गड्डा आणि लवकर काढणीला येणार्‍या जातींसाठी ४५ x ४५ सेंटिमीटर किंवा ३० x ३० सेंटिमीटर अंतर ठेवावे. मोठा गड्डा, रोपांची पसरट वाढ आणि उशिरा तयार होणार्‍या जातींची लागवड ६० x ६० सेंटिमीटर किंवा ७० x ७० सेंटिमीटर अंतरावर करवी. रोपांची पुनर्लागवड करताना १० लि. पाण्यामध्ये १०० मिली जर्मिनेटर घेऊन ते द्रावणात रोपे पुर्ण बुडवून लावावीत. रोप लावताना मुळ्या जमिनीत सरळ राहतील अशा तर्‍हेन रोपांची लागवड करावी. लागवडीनंतर लगेच हलके पाणी द्यावे. लागवडीनंतर दुसर्‍या किंवा तिसर्‍या दिवशी आंबवणी द्यावी.

लागवड पद्धती – रोपे तयार होत असताना जिथे लागवड करायची आहे. त्या जमिनीची उभी-आडवी नांगरट करून तण वेचून काढावे. शक्य असल्यास पावसाळयाच्या सुरुवातीला ताग किंवा धैंचा यासारखे हिरवळीच्या खताचे पीक घेऊन ते जमिनीत गाडावे.

हिरवळीचे पीक घेणे शक्य नसल्यास हेक्टरी १५ ते २० टन शेणखत, लेंडीखत किंवा कोणतेही सेंद्रिय खत जमिनीत मिसळून द्यावे. नंतर २ मीटर रुंद आणि ३ मीटर किंवा सोयीस्कर लांबीचे वाफे तयार करावेत. खरीप हंगामात ४५ ते ६० सेंटिमीटर अंतरावर सरी-वरंबे पाडून वरील आकराचे वाफे बांधून घ्यावेत. ठराविक अंतरावर पाण्याचे पाट काढून पाणी देण्याची व्यवस्था करवी. खरीप हंगामात ४५ ते ६० सेंटिमीटर अंतरावर सरी-वरंबे पडून वरील आकाराचे वाफे बांधून घ्यावेत. ठराविक अंतरावर पाण्याचे पाट काढून पाणी देण्याची व्यवस्था करवी. खरीप हंगामात सरी-वरंब्यांवर पानकोबीची लागवड करावी. रब्बी आणि उन्हाळी हंगामात सपाट वाफ्यात पानकोबीची लागवड करता येते.

महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण – 

पानकोबीच्या पिकांचे अनेक प्रकारच्या किडींमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. पिकांवर किडींची लागण झाल्यानंतर घाईघाईने मिळेल ते औषध फवारण्यापेक्षा कोणत्या किडी पिकावर केव्हा येतात, किडीची कोणती अवस्था पिकाचे नुकसान करते, नुकसानीचा प्रकार आणि किडींच्या कोणत्या अवस्थेमध्ये औषध फवारणी केल्यास किडींचा परिणामकारक बंदोबस्त होऊ शकतो, इत्यादी गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे.

१) मावा : (अॅफिड्स ) – ही कीड पानकोबी तसेच कोबीवर्गातील इतर सर्व भाजीपाला पिकांवर मोठ्या प्रमाणात आढळते. या किडीची पिल्ले हिरव्या रंगाची असतात, तर प्रौढ कीड काळसर रंगाची असते. या किडीची पिल्ले तसेच प्रौढ कीड कोवळ्या पानांतून अन्नरस शोषून घेतात. पानाच्या बेचक्यात, पानाखाली, फुलकोबीच्या गड्ड्याच्या आतील बाजूस ही कीड लपून बसते. किडींनी पानांतील अन्नरस शोषून घेतल्यामुळे पाने पिवळी होऊन गळून पडतात. रोपाची वाढ खुंटते, पाने आकसल्यासारखी रोगट, पिवळी दिसतात आणि उत्पादन कमी येते.

उपाय : थंडी आणि मधूनच पडणारे ढगाळ हवामान या किडीला अत्यंत पोषक असून अशा हवामानात या किडीची झपाट्याने वाढ होते. अशा हवामानात कीड दिसण्यापूर्वीच औषध फवारणी केल्यास या किडीचा बंदोबस्त करता येतो. यासाठी १० लिटर पाण्यात २५ मिली लिटर मॅलाथिऑन आणि २० ग्रॅम प्रोटेक्टंट मिसळून १० ते २५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.

२) चौकोनी ठिपक्याचा पतंग -(डायमंड बॅक मॉथ) – भुरकट रंगाच्या या पाकोळीच्या पाठीवर चौकटीच्या आकाराचा पांढरा ठिपका असतो. म्हणून या किडीला चौकोनी ठिपक्याचा पतंग हे नाव पडले आहे. या किडीचा पतंग पानकोबी तसेच सर्व कोबीवर्गीय भाज्यांच्या पानांवर पिवळसर राखी रंगाची अंडी घालतो. त्यातून फिकट हिरव्या किंवा भुरकट रंगाच्या अळ्या बाहेर पडतात.  या अळ्या पानाच्या खालच्या बाजूस राहून पानाचा पृष्ठभाग खरडून खातात. त्यामुळे पानावर असंख्य छिद्रे पडून पान चाळणीसारखे दिसते. किडीचे प्रमाण वाढल्यास पानाची चाळणी होऊन पानाच्या शिराचा शिल्लक राहतात. सप्टेंबर ते मार्च या काळात कोबीवर्गीय पिकांवर महाराष्ट्रात ही कीड सर्वत्र आढळते.

उपाय – या किडीच्या नियंत्रणासाठी १० लिटर पाण्यात २० मिली क्विनॉलफॉस मिसळून किंवा ४ % निंबोळी अर्काच्या प्रोटेक्टंट २० ग्रॅमसह (रोपांची पुनर्लागवड केल्यानंतर) १० -१२ दिवसांच्या अंतराने २ -३ फवारण्या कराव्यात.

३) मोहरीवरील काळी माशी -(मस्टर्ड सॉ फ्लाय )- ही बारीक, जाडसर काळपट पिवळसर रंगाची माशी असून ती पानांच्या पेशीत अंडी घालते. त्यातून काळसर रंगाच्या अळ्या बाहेर पडतात.

या अळ्या पिकाची कोवळी पाने खातात. या अळ्या कोवळ्या पानाच्या कडेपासून पाने खाण्यास सुरुवात करून संपूर्ण रोपांवरील पाने खातात. पानकोबी, फुलकोबी या पिकांशिवाय नवलकोल, मुळा, मोहरी इत्यादी पिकांवर ही कीड आढळते.

कोबीवरील फुलपाखरू (कॅबेज बटरफ्लाय) – कोबीवर्गीय भाज्यांच्या पानांवर पांढर्‍या रंगाचे मोठे फुलपाखरू अंडी घालते. त्यातून निघणाऱ्या हिरव्या अळ्या पाने खातात. पानांवर असंख्य छिद्रे दिसतात. पिकाचे खूप नुकसान होते.

५) पानावर जाळी विणणार्‍या अळ्या (लीफ वेबर ) – या किडीच्या फिकट हिरव्या रंगाच्या अळ्या पानाचा पृष्ठभाग खातात पाने गुंडाळून स्वत: भोवती जाळी तयार करतात. त्यामुळे पानांची अन्न तयार करण्याची क्रिया मंदावते.

६) गड्डा पोखरणारी अळी (ग्रॅम कॅटरपिलर ) – फिकट पिवळसर विटकरी रंगाचे हे पतंग कोबीच्या पानांवर अंडी घालतात. त्यातून बाहेर पडलेल्या अळ्या तांबूस करड्या रंगाच्या असतात. या अळ्या पाने खातात आणि पानांमागे लपून बसतात. तसेच गड्डे पोखरून आत शिरतात आणि आतील भागावर उपजीविका करतात. त्यामुळे गड्ड्यांची प्रत खराब होते.

उपाय : वरील सर्व किडींच्या नियंत्रणासाठी १० लिटर पाण्यात १० मिली मॅलथिऑन आणि २० मिली क्विनॉलफॉस (इकॅलक्स) किंवा ४ % निंबोळी अर्क + २५ ग्रॅम प्रोटेक्टंट एकत्र मिसळून लागवडीनंतर १५ ते २० दिवसांच्या अंतराने ३ ते ४ फवारण्या दिल्यास कोबीवरील पाने कुरतडणार्‍या तसेच गड्डा पोखरणार्‍या सर्व प्रकारच्या अळ्यांचे नियंत्रण होते. डॉ. बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सप्तामृत फवारण्या प्रोटेक्टंटचा नियमित वापर केल्यास किडीस प्रतिबंध होतो.

महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण – 

१) रोपे कोलमडणे (डॅपिन ऑफ) – हा रोग जमिनीत वाढणार्‍या बुरशीपासून होतो. या रोगाची लागण रोपवाटिकेतील रोपांवर प्रामुख्याने उष्ण आणि दमट हवामानात, पाण्याचा योग्य निचरा न होणार्‍या जमिनीत होतो. बुरशीची लागण झालेली रोपे निस्तेज पिवळसर दिसतात. रोपांचे जमिनीलगतचे खोड कुजून रोपे कोलमडतात.

उपाय : या रोगाची लागण पावसाळी हंगामात जास्त प्रमाणात होते. म्हणून पावसाळी हंगामात रोपे नेहमी पाण्याचा उत्तम निचरा असलेल्या ठिकाणी गादीवाफ्यावर तयार करावीत. पेरणीपूर्वी १३ ग्रॅम कॅपटॉंन किंवा फायटेलॉन १० लिटर पाण्यात मिसळून हे द्रावण गादीवाफ्यावर झारीने शिंपडावे. तसेच पेरणीपूर्वी बियाण्यास तसेच पूनर्लागावड गवडीत रोपांना जर्मिनेटरची प्रक्रिया करावी.

२) काळी कूज (ब्लॅक लेग) – हा बुरशीजन्य रोग पावसाळी हंगामात बहुतेक सर्व भागांत आढळतो. या रोगाचा प्रसार बियाण्यात वाढणार्‍या बुरशीपासून होतो. त्यामुळे रोपाच्या वाढीच्या सुरुवातीसच रोगाचा प्रादुर्भाव होतो. रोगाचे प्रादुर्भाव झालेल्या रोपांची सर्व मुळे खालून वरच्या भागाकडे कुजत जाऊन रोपे सुकून कोलमडते. रोपाचे खोड उभे कापल्यास आतील भाग काळा झालेला असतो.

उपाय : या रोगाचा प्रसार बियाण्यांमार्फत होत असल्यामुळे लागवडीपूर्वी बियाण्याचे निर्जंतुकीकरण करावे. त्यासाठी १ ग्रॅम बाविस्टीन किंवा कॅपटॉंन १ लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात पानकोबी, फुलकोबी किंवा नवलकोल बियाणे ३० मिनिटे बुडवून नंतर सावलीत सुकवावे आणि पेरणीसाठी वापरावे.

३) केवडा (डाऊनी मिल्ड्यू ) – केवडा हा बुरशीजन्य रोग कोबीवर्गीय पिकांवर सर्वच भागांत आढळून येतो. रोगग्रस्त पानांवर पिवळसर किंवा जांभळट रंगाचे डाग दिसतात. पानाच्या खालच्या भागावर त्या ठिकाणी भुरकट केवड्याच्या बुरशीची वाढ झालेली दिसते. गड्ड्यांची काढणी लांबल्यास गड्ड्यांवर काळपट चट्टे दिसतात आणि असे गड्डे सडू लागतात. पावसाळी दमट हवेत हा रोग झपाट्याने पसरतो.

४) करपा (ब्लॅक स्पॉट) – या बुरशीजन्य रोगाचा प्रसार बियाण्यात वाढणार्‍या बुरशीपासून होतो. बुरशीचा प्रादुर्भाव झालेल्या रोपांची पाने, देठ आणि खोडावर वर्तुळाकर किंवा लंबगोल काळसर रंगाचे डाग दिसू लागतात. नंतर हे डाग एकमेकांत मिसळून लागण झालेला सर्व भाग करपल्यासारख्या काळपट रंगाचा दिसतो. कोबी आणि फुलाकोबीच्या तयार गड्ड्यांवर तसेच बियाणे तयार होण्याच्या काळात रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. अशा रोगट झाडांपासून तयार झालेल्या बियाण्यातून रोगाचा प्रसार होतो.

उपाय : वरील दोन्ही रोगांच्या नियंत्रणासाठी रोगाला पोषक हवामान आढळून आल्यास किंवा रोगाची प्राथमिक लक्षणे दिसताच पिकावर १% बोर्डो मिश्रण फवारावे किंवा १० लिटर पाण्यात २५ मिली थ्राईवर + २५ मिली क्रॉंपशाईनर+ २५ ग्रॅम डायथेन एम – ४५ हे औषध मिसळून १० दिवसांच्या अंतराने २ फवारण्या कराव्यात.

५) भुरी (पावडरी मिल्ड्यू ) – कोबीवर्गीय पिकांवर भुरी हा बुरशीजन्य रोग क्वचित प्रसंगी आढळतो. सुरुवातीला पानांच्या वरच्या बाजूला पांढर्‍या रागाचे ठिपके दिसतात. काही काळाने संपूर्ण पानावर करड्या रंगाची बुरशी वाढलेली दिसते.

उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी रोगाची लागण दिसून येताच १० लिटर पाण्यात थ्राईवर २५ मिली + २५ ग्रॅम पाण्यात विरघळणारे गंधक मिसळून फवारणी करवी.

६) मुळकुजव्या (फ्लबरूट ) – या बुरशीजन्य रोगामुळे झाडाच्या मुळांवर अनियमित गाठी तयार होतात. झाडाची पाने पिवळी पडतात आणि सुकतात. ज्या जमिनीचा सामू ७ पेक्षा कमी आहे अशा जमिनीत या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळतो.

उपाय : जमिनीत चुना टाकून जमिनीचा आम्ल – विम्ल निर्देशांक वाढवावा. रोपांच्या लागवडीपूर्वी रोपे जर्मिनेटर १० मिली आणि २ ग्रॅम बाविस्टीन १ लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात बुडवून नंतर रोपांची लागवड करावी.

वरील कीड व रोगांवर प्रतिबंधात्मक उपाय व जोमदार पिकाच्या वाढीसाठी तसेच दर्जेदार अधिक उत्पादनासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या खालीलप्रमाणे फवारण्या कराव्यात.

१) पहिली फवारणी : ( लागवडीनंतर १० ते १५ दिवसांनी ) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली.+ प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम १०० मिली. + हार्मोनी १०० मिली + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी) : जर्मिनेटर ३५० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + न्युट्राटोन २५० मिली. + हार्मोनी २०० मिली + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : ( लागवडीनंतर ४० ते ४५ दिवसांनी ) : थ्राईवर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली.+ राईपनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + न्युट्राटोन ५०० मिली. + हार्मोनी ३०० मिली + २०० लि.पाणी.

४) चौथी फवारणी : ( लागवडीनंतर ५५ ते ६० दिवसांनी) : थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ७५० मिली. + न्युट्राटोन ७५० मिली.+ हार्मोनी ४०० मिली + २५० लि. पाणी.

काढणी आणि उत्पादन – रोपांच्या लागवडीपासून पानकोबीच्या हळव्या जातींची काढणी ६० ते दिवसांनी सुरू होते आणि दोन ते तीन आठवद्यानात काढणी पूर्ण होते. संकरीत जातींचे सर्व गड्डे एकाच वेळी तयार होत असल्यामुळे ८ ते १० दिवसांतच संपूर्ण पिकाची काढणी होते. निमगरव्या ( मध्यम कालावधीच्या) जातींचे गड्डे ८० ते ९० दिवसांनी काढणीसाठी तयार होतात. तर गरव्या जाती रोपांच्या लागवडीनंतर १०० ते ११५ दिवसांनी गड्डे काढणीला तयार होतात.

 

Heera-Inline

 

➡️➡️➡️ शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादीं ची माहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.

 

 

https://whatsapp.heeraagro.com

 

 

मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

 

1 Comment
  1. Anonymous says

    0.5

Leave A Reply

Your email address will not be published.