लातूरमधील लोदगा गावातून होणार हवामान बदलाचा अभ्यास
: पाशा पटेल यांची माहिती
नवी दिल्ली / प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात असणार्या लोदगा या छोटयाशा गावातून हवामान बदलाचा अभ्यास जानेवारीपासून होणार असल्याची माहिती, महाराष्ट्राच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली.
केंद्रीय ग्रामीण विकास व पंचायत राजमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या अध्यक्षतेत नुकतीच राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्थेची 61 वी सर्वसाधारण बैठक पार पडली. या संस्थेचे सदस्य म्हणून पटेल हे बैठकीत उपस्थित होते.
बैठकीदरम्यान झालेल्या चर्चेत पटेल यांनी देशातील बदलत चाललेले हवामाना विषयी बोलताना सांगितले, पावसाची अनियमितता वाढत आहे. 100 दिवसांचा असणारा पावसाळा आता केवळ 50 तासांवर येऊन ठेपला आहे. काही वर्षांपासून पावसाळयात शेत जमीनीत सहज पाणी उपलब्ध होत असे, आता मात्र, 1000 फुटांवर बोरवेल टाऊनही पाणी मिळत नाही. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, खान्देश भागात दरवर्षी दुष्काळाचे सावट राहते, त्यामुळे स्थानिक शेतकर्यांना अनेक समस्यांना तोंड दयावे लागते. हे सर्व परिणाम हवामान बदल यामुळे घडून येत आहे. यावर अभ्यास करून गंभीर उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे सांगून पटेल यांनी यावेळी याविषयीचे सविस्तर निवेदन केंद्रीयमंत्री तोमर यांना दिले.
केंद्रीयमंत्री तोमर यांनी ग्रामीण विकास व पंचायत राज संस्थेच्या पदाधिकार्यांना लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यामधील लोदगा गावापासूनच हवामान बदलाचा अभ्यास करण्याचे निर्देश दिले, असल्याची माहिती श्री पटेल यांनी दिली. ही संस्था ग्रामीण भागातील लोकांसाठी तसेच शासकीय अधिकारी-कर्मचार्यांसाठी संशोधनात्मक आणि प्रशिक्षणाचे कार्य करते.
याअंतर्गत जानेवारीमध्ये स्थानिक गैरसरकारी संस्थांची मदत घेऊन हवामान बदलाबाबत अभ्यासाची सुरूवात होऊन जनजागृती कार्यक्रम आखले जातील, असे आश्वासन तोमर यांनी दिल्याचे पटेल यांनी सांगितले.