वनविभागाच्या पथकावर लाकुडतोड्याचा हल्ला

0

एकावर भिरकावली कुर्‍हाड, दुसराही गंभीर
सोयगाव / प्रतिनिधी
सोयगाव शिवारातील वेताळवाडीच्या जंगलातील डोंगराच्या उंच भागावर सागवानची तोड करून तस्करी करणार्‍या, अज्ञातांवर सापळा रचून बसलेल्या वनविभागाच्या पथकावर लाकुडतोड्या तस्करांनी दगडफेक करून त्यांचा पाठलाग करणार्‍या वनरक्षकावर कुर्‍हाडीने जोरदार हल्ला चढवला. यात वनरक्षकाला भोसकल्याची घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास वेताळवाडीच्या डोंगरावर घडली.

तासभर पाठशिवणीचा खेळ सुरु असलेल्या वनविभागाचे पथक आणि लाकूडतोडे यांनी अखेरीस निशस्त्र असलेल्या वनविभागाच्या पथकावर दगडफेक करून एकावर कुर्‍हाडीने हल्ला चढविला. या घटनेमुळे सोयगावात थरकाप उडाला आहे. या प्रकरणी धास्तावलेल्या वनविभागाच्या पथकाने सागाचा मुद्देमाल गोळा करून सोयगावला आणला आहे.

गणेश परदेशी असे कुर्‍हाडीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वनरक्षकाचे नाव आहे. वेताळवाडीच्या जंगलात पूर्वेला राखीव वनक्षेत्रातील कंपरट क्र.483 मधील गट क्र्र. 8 मध्ये अज्ञात पाच जणांचे टोळके सागाची तस्करी करत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे वनविभागाच्या पथकाने पहाटे 6 वाजता या भागात सापळा रचून एका नाल्यात लपून बसले. दरम्यान वनविभागाच्या पथकाची चाहूल लागताच, सागाची तस्करी करणार्‍यांनी वनविभागाच्या पथकाला पांगविण्यासाठी दगडफेक सुरु केली. या दगडफेकीत वनरक्षक सुनील चंद्वाडे गंभीररीत्या जखमी झाले असून लाकुडतोड्याचा पाठलाग करणार्‍या वनरक्षक गणेश परदेशी याच्यावर लाकुडतोड्यांनी कुर्‍हाडीने हल्ला चढवून त्यास गंभीर इजा केली.

वनपरिक्षेत्राधिकारी राहुल सपकाळ यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठून घटनास्थळावरील कादर पठाण, चंद्रकांत इंगळे या दोन मजुरांची घटनेतून सुटका करून, जप्त करण्यात आलेला मुद्देमाल डोंगराच्या भागातून डोक्यावर वाहून वाहनात भरला. सोयगावला आणण्यात आला,दरम्यान या पाचही जणांच्या टोळक्याने घटनास्थळावरून फरारी झाले असून यातील एकाची ओळख पटली असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान घटनास्थळावरून वनविभागाच्या पथकाने सागवानच्या लाकडांची अकरा नग अंदाजे किंमत 10153 रुपयांसह तीन धारदार कुर्‍हाडी जप्त केल्या असून भारतीय वन अधिनियम 1927 कलम 26 नुसार वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील जखमी वनरक्षक गणेश परदेशी, सुनील चंद्वाडे यांच्यावर सोयगावला तातडीने उपचार करण्यात येत आहेत.

 

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

 

Leave A Reply

Your email address will not be published.