पिशोर / प्रतिनिधी
भावा-बहिणीचे प्रेम हे अजोड असते. बापाचे छत्र हरवलेल्या बहिणीला वडील नसल्याने कोणतेच लाड पुरवता आले नाहीत. या बोचणीतून पिशोर येथील शेतकरी भावांनी बहिणीला चक्क कार भेट दिली आहे.
पिशोर येथील बाळकृष्ण जाधव यांचे बारा वर्षांपूर्वी निधन झाले. पत्नी छबाबाई, एक मुलगी आणि तीन मुले संतोष, साहेबराव आणि गणेश यांचा संसार उघड्यावर पडला. थोडीफार शेती होती, पण त्यातून येणार्या अत्यल्प उत्पन्नावर घर, मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागणे अशक्य झाले. त्यामुळे एकूलत्या एक बहिणीचे कोणतेच लाड करता येत नव्हते. त्यात बहिणीचे नऊ वर्षांपूर्वी लग्न झाले. मध्यंतरी शेती, शिक्षण आणि व्यवसाय यात यशस्वी वाटचाल केल्याने भावांची स्थिती बरी झाली. पण यात आपल्या बहिणीची कोणतीच हौस-मौज पूर्ण करता आली नाही म्हणून बहिणीच्या नवीन घराच्या वास्तुशांतीनिमित्त बहिणीला चक्क नवी कोरी क्विड कार भेट म्हणून दिली. वडिलांची कोणतीच उणीव भासू न देता बहिणीला अनोखी भेट दिल्याने आई छबाबाई यांना गहिवरून आले. भावांनी बहिणीला दिलेल्या या अनोख्या भेटीची परिसरात चर्चा आहे.