मकृवि चाकाचे हात कोळपे
या अवजाराने आपण खुरपणी, विरळणी ही कामे करू शकतो. एका मजुराच्या साह्याने हे अवजार चालविता येते. याचे वजन 15 किलो आहे.
खत कोळपे
या अवजारामुळे कोळपणी व खत पेरणी एकाच वेळी एका मजुराच्या साह्याने करता येते. कोळप्यासोबत 6, 9, 12 इंचांची पास दिली असून, पास बदलता येते. खत दोन ओळींच्या बाजूस पडत असल्याने खताची मात्रा वाया जात नाही. एका मजुराची बचत होते.
बैलाच्या साह्याने चालणारा पाच दातेरी मोगडा / पेरणी यंत्र
या अवजाराचा वापर दुय्यम व आंतरमशागतीसाठी करता येतो. या मोगड्यावर पेरणीच्या संरचना बसवून दोन फणी व तीन फणी पेरणी यंत्रही तयार करता येते. हा मोगडा लाकूड किंवा लोखंडापासून तयार करता येतो. एका दिवसात साधारण एक हेक्टर क्षेत्राची पेरणी, तसेच आंतरमशागत करता येऊ शकते.
तीन फणी मोगडा
हा मोगडा आंतरमशागतीसाठी कोळप्यासारखा वापरता येतो. पुढे दोन व त्याच्या मधोमध मागे एक, असे तीन फणांचे हे कोळपे असते. फणाचे फाळ त्रिकोणी पात्यांचे असतात, त्यामुळे पिकाच्या दोन रांगांमधील जमीन उकरली जाते. या अवजाराने तण निघतात, लहान सरी- वरंबे तयार होतात; तसेच पिकाच्या बुंध्याजवळ मातीची भर पडते. एका दिवसात साधारण एक हेक्टर क्षेत्राची आंतरमशागत होऊ शकते.
बैलचलित बहुविध कोळपे
या अवजाराच्या साह्याने पिकांच्या ओळींतील अंतरानुसार पासेची लांबी 22.5 सें. मी.पासून 45 सें. मी. अंतरापर्यंत ठेवता येते. ओळींतील अंतर 45 सें. मी.पेक्षा कमी असलेल्या कोणत्याही पिकात हे कोळपे वापरता येते. या कोळप्याच्या साह्याने आपण एका दिवसात 2.5 ते तीन एकर क्षेत्रावरील कोळपणी करू शकतो.
यंत्रचलित ब्रश कटर
ब्रश कटर मशीन एक आधुनिक उपकरण आहे जे शेती साठी खूप उपयुक्त आहे, ज्याचे पांच उपकरणांच्या सहायाने शेतकरी कमी खर्चात, कमी वेळेत आणि कमी श्रमात जास्त शेती व बगीच्याचे काम करू शकतात. ब्रश कटर च्या साहय्याने भात, सोयाबीन, गहू सारखे पिक कापने अत्यंत सोयीस्कर आहे, व शेतात, बगीच्यात, बांधावरील बिनकामाचे गवत नियंत्रित ठेवण्यास हि ब्रश कटर खूप उपयोगी आहे. ब्रश कटर चे सर्व साधन सामुग्री व स्पेअर पार्टस उच्च गुणवत्ताच्या प्लास्टिक व धातू पासून बनविलेले आहेत. ब्रश कटर मशीन ला कमी इंधन लागते व हाताळण्यास हि अत्यंत सोपे व सोयीस्कर आहे. ब्रश कटर मशीन 1 लिटर पेट्रोल इतक्या इंधनामध्ये एक ते दीड तास चालू शकते. ब्रश कटर मशीनच्या इंजिन ची क्षमता 1100 RPM असते. ब्रश कटरमशीन चालविण्यासाठी इंधन सोबत 30 – 40 मि.ली. 2T ऑईल मिश्रित करणे आवश्यक आहे.
महत्वाची सूचना :- सदरची माहिती हि कृषी सम्राट यांच्या वैयक्तिक मालकीची असून आपणास इतर ठिकाणी ती प्रसारित करावयाची असल्यास सौजन्य:- www.krushisamrat.com असे सोबत लिहणे गरजेचे आहे.

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.