ऊस लागवड यंत्र
दिवसेंदिवस वेळेवर न होणारी मजुरांची उपलब्धता व त्यांची नेहमीच वाढत जाणारी मजुरी लक्षात घेता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने ट्रॅक्टरच्या पी.टी.ओ.वर चालणारे ऊस लागण यंत्र विकसित केले आहे. शेताच्या प्राथमिक मशागतीनंतरची ऊस लागवडीची सर्व कामे या यंत्राच्या साह्याने एकाच वेळी केली जातात. ऊस लागवडीमध्ये शेतात सऱ्या काढणे, बेणे (टिपऱ्या) तयार करणे, बेण्यास कीटकनाशक व रोगनाशकाची बेणेप्रक्रिया करणे, बेणे सऱ्यांत मांडणे, लागवडीच्या वेळेस योग्य मात्रेत खते देणे, सरीत मांडलेले बेणे मातीने व्यवस्थित झाकणे आदी कामांचा समावेश होतो. ही सर्व कामे मजुरांकरवी करण्यासाठी एकरी सरासरी 4000 रुपये इतका खर्च येतो. हे सर्व लक्षात घेऊन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने ट्रॅक्टरच्या पी.टी.ओ.वर चालणारे ऊस लागवड यंत्र विकसित केले आहे. हे लागवड यंत्र 50 अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरच्या साह्याने चालविले जाते.
…असे आहे यंत्र
1) शेताच्या प्राथमिक मशागतीनंतरची ऊस लागवडीची सर्व कामे या यंत्राच्या साह्याने एकाच वेळी केली जातात. यंत्राच्या साह्याने आठ तासांत पाच एकर ऊस लागवड पूर्ण होते. यंत्राने लागवड केलेल्या उसाची उगवण 72 टक्केपेक्षा जास्त होते.
2) हे यंत्र 50 किंवा त्यापेक्षा जास्त अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरने सर्व प्रकारच्या जमिनींमध्ये व्यवस्थित चालविता येते. या यंत्राच्या साह्याने लागवड करताना ट्रॅक्टर ड्रायव्हरशिवाय एकूण पाच मजुरांची आवश्यकता असते. दोन मजूर यंत्रामध्ये ऊस सोडण्यासाठी, तर इतर तीन मजूर यंत्रापर्यंत ऊस आणून देण्यासाठी व खते खत टाकीत भरण्यासाठी आवश्यक असतात.
3) यंत्रामध्ये सरी पाडण्यासाठी दोन रिजर आहेत. लागवडीसाठी लागणारे ऊस उभे करण्यासाठी यंत्रावर दोन कप्पे आहेत. लागवडीच्या वेळेस आवश्यक असणाऱ्या खतांची मात्रा (लागण/ सरी डोस) योग्य प्रमाणात दिली जाणे आवश्यक असते. या यंत्रामधून मात्र खतांची मात्रा योग्य, एकसमान खोलीवर आणि सर्वत्र सारख्या प्रमाणात दिली जातो. या यंत्रावर खते साठविण्यासाठी दोन पेट्यांची व्यवस्था केली आहे. या पेट्यांतून योग्य मात्रेत खत ऊस लागवडीच्या वेळेस टिपऱ्यांच्या बाजूस सरीत पडते व योग्य खोलीवर मातीआड केले जाते.
4) लागणीच्या वेळेस ठराविक लांबीच्या टिपऱ्या तयार करण्यासाठी या यंत्रामध्ये चक्रीय कर्तन पद्धतीचा अवलंब केला आहे. यामध्ये नऊ इंच ते 12 इंचापर्यंत लांबीची टिपरी तयार केली जाते. कीटकनाशक व बुरशीनाशकाचे द्रावण साठविण्यासाठी कॅन बसविला आहे. लागवड सुरू असताना कॅनमधील द्रावण उसाच्या टिपऱ्यांवर पडून बेणेप्रक्रिया होते. 5) यंत्रातून ऊस सोडणाऱ्या दोन मजुरांच्या बैठकीची व्यवस्था या यंत्रावर केलेली आहे. हे दोन मजूर जागेवर बसून त्यांच्या समोर असलेल्या कप्प्यातील उभे ऊस नलिकेतून सरीच्या दिशेने सोडतात. त्याची सारख्या लांबीची टिपरी होऊन सरीत पडतात. सरीत टाकलेले बेणे मातीने झाकले जावे. यासाठी यंत्राच्या मागील बाजूस दोन दात्यांची रचना केलेली आहे. त्याद्वारे सरीत टाकलेल्या टिपऱ्यांवर योग्य तेवढीच माती झाकली जाते. नेहमीच्या लागवड पद्धतीत शक्यतो उसाची पाणी देऊन ओली लागवड करतात. त्यामुळे मजूर टिपरी किती खोलवर दाबतात याचा अंदाज येत नाही. बऱ्याच वेळा ती प्रमाणापेक्षा जास्त खोल दाबली जाते व परिणामी उगवण व्यवस्थित होत नाही. यंत्राने पाडलेल्या सरीमध्ये उसाची आवश्यक त्या खोलीवर लागण होऊन योग्य प्रमाणात एक समान माती टिपऱ्यांवर झाकल्याने उसाची उगवण 70 ते 75 टक्के इतकी होते.
महत्वाची सूचना :- सदरची माहिती हि कृषी सम्राट यांच्या वैयक्तिक मालकीची असून आपणास इतर ठिकाणी ती प्रसारित करावयाची असल्यास सौजन्य:- www.krushisamrat.com असे सोबत लिहणे गरजेचे आहे.

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.