शेवगा हे एक कमी पाण्यात येणारे पीक आहे. शेवग्याची लागवड प्रामुख्याने दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणावर केली जाते. बाजारात आज उपलब्ध असलेल्या विविध जाती साधारणतः 200 ते 300 शेंगा एका झाडापासून देतात. मुख्य पीक आणि बांधावरिल पीक म्हणूनही शेवग्याची लागवड करता येते.
भारतात आंध्र प्रदेश, तमिलनाडू, कर्नाटक राज्यात शेवग्याची फार मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. भारतातील एकूण शेवगा शेंगांचे उत्पन्न हे 2.2 मिलियन टन इतके आहे. भारतात शेवग्याची लागवड एकूण 38000 हेक्टर क्षेत्रावर केली जाते. त्यात आंध्र प्रदेश लागवड आणि उत्पादनात क्रमांक एक चे राज्य आहे. येथे 15665 हे.क्षेत्रावर लागवड होते. त्यानंतर कर्नाटक 10,280 हेक्टर आणि तमिलनाडू 7408 हेक्टर असा क्रम आहे.
दक्षिण भारतातून जुलै ते सप्टेंबर आणि मार्च – एप्रिल महिन्यात शेवग्याची आवक जास्त असते. भारत देशा व्यतिरिक्त पाकिस्तान, श्रीलंका, जमैका, सिंगापुर, क्युबा, आणि ईजिप्त देशात शेवग्याची लागवड केली जाते. तमिलनाडू राज्यात उन्हाळाच्या दिवसात शेवग्याची आवक मोठ्या प्रमाणावर असते.
शेवगा पिकाची लागवड ही उष्ण व समशितोष्ण अशा दोन्ही हवामानात केलेली चांगली ठरते. या पिकास जास्त तापमान आणि अती कमी तापमान सहन होत नाही. जमीन भूसभूशीत आणि सेंद्रिय पदार्थयुक्त अशी असावी. ज्या जमिनीत क्लेचे प्रमाण जास्त आहे, अशा जमिनीत लागवड शक्यतो करु नये, पाणी धरुन ठेवणारी जमीन पिकांस मानवत नाही. 25 ते 30 डि.से. तापमान पिकाच्या वाढीसाठी अत्यंत पोषक ठरते. कमी पाण्यात येणारे हे पीक, पाणी मिळाल्यास फुलोर्यावर येण्यास उत्सूक असते. तापमान 40 डि. से. पेक्षा जास्त झाल्यास फुलगळ होते, आणि रात्रीचे तापमान 16 डि.से. पेक्षा कमी झाल्यास फळ धारणा होत नाही. शेवगा 48 डि.से. तापमानतही तग धरु शकतो.
शेवगा पिकाची लागवड बीयांपासून तसेच काड्यांपासून केली जाते.काड्यांपासून केली जाणारी लागवड ही बहुवार्षिक शेवग्याची केली जाते. वार्षिक शेवग्याची लागवडही बियांपासून करतात. साधारणतः 10 ग्रॅम वजनात 35 बिया असतात. प्रती बी साधारणतः 0.288 ग्रॅम वजन. 1 एकर क्षेत्रात लागवडी करिता 250 ग्रॅम बियाणे पुरेसे ठरते. (जवळपास एकूण 875 बिया, एक एकर क्षेत्रात 2.5 बाय 2.5 मीटर अंतरावर लागवड केल्यास 640 रोप बसते. बेड तयार करुन किंवा प्लास्टिक पिशव्या भरुन रोपांची निर्मिती केली जाते. बी लागवडीनंतर साधारणतः 30 दिवसांत रोप पुनर्लागवडीसाठी तयार होते. पिशवीत बीयांची लागवड ही 2 से.मी. खोलीवर करावी. त्यात पिशवी भरण्यासाठी गाळ, माती, तसेच पूर्णपणे कुजलेले शेणखत किंवा त्याहुन अधिक उत्तम असे निंबोळी पेंडचा वापर करता येईल.
शेवगा पिकाची लागवड पाऊस पडल्यानंतर करावी, पाण्याची उपलब्धता असेल तर जुन-जुलै महिन्यात पाऊस वेळेवर नाही आला तरी लागवड केलेली चालते. उन्हाळ्यात आणि जास्त थंडीत लागवड करु नये.
साधारणतः महिन्यातून एकदा पाणी दिले तरी हे पीक उत्पादन देण्यास सक्षम आहे. जमिनीच्या प्रकारानुसार ड्रिप ईरिगेशन असेल तर एका रोपाला शेवगा पिकाची 2.5 बाय 2.5 मीटरवर लागवड केल्यास एकरी 640 रोप बसते. (1600 रोप प्रती हेक्टर) लागवड करण्यापूर्वी 45 बाय 45 बाय 45 से.मी. आकाराचे खड्डे घेवून त्यात शेणखत, गांडुळ खत, मॅन्कोझेब, सिंगल सुपर फॉस्फेट मातीत टाकून त्यानंतर खड्डे भरुन लागवड करावी.
शेवगा लागवडीनंतर 70 ते 75 दिवसांनी त्याचा वाढणारा शेंडा खुडल्यास जास्त प्रमाणात फांद्या मिळून फळांची संख्या वाढविण्यात मदत मिळते. 60 ते 75 दिवसांत केलेल्या शेंडा खुडणे या क्रियेमुळे जास्तीत जास्त फांद्या मिळतात, त्यानंतर केलेल्या अशा प्रक्रियेमुळे मात्र हव्या त्या प्रमाणात जास्त फांद्या मिळत नाहीत. एका रोपास 6 ते 10 फांद्या ठेवणे फायदेशीर ठरते.
खोलवर जाणारे सोटमुळ, कमीत कमी अशा संख्येत असणार्या जमिनीस समांतर लांब जाणार्या मुळ्या आणि जमिनीवर पडणारी अल्प अशी सावली यामुळे शेवगा हे पीक उत्तम आंतरपिक म्हणून योग्य ठरते. शिवाय शेवगा पिकाच्या जमिनीवर पडणार्या पानांमुळे नवीन लागवड होणार्या पिकावरिल पिथियम रोगाचे देखील नियंत्रण होण्यास मदत मिळते.
पीकेव्ही 1 ही जात अशा लागवड पध्दतीसाठी योग्य ठरते. शेवग्याची छाटणी केल्यानंतर त्याच्या फांद्या पाने जमिनीवर नैसर्गिक आच्छादन म्हणून टाकली जातात. अशा प्रकारच्या नैसर्गिक आच्छादनामुळे जमिनीची धुप थांबविण्यात मदत मिळते, पाणी बाष्पीभवनाव्दारे उडून जाण्याचे प्रमाण कमी होते आणि कालांतराने जमिनीत नैसर्गिक असे सेंद्रिय खत देखिल मिसळले जाते.
शेवगा पिक बहुतेक वेळेस मिरची, वांगी, कांदा, गवार, पिकात आंतरपिक म्हणून दक्षिणेकडिल राज्यात घेतले जाते. गुजरात राज्यातील वडोदरा, अहमदाबाद तसेच काही इतर भागात शेवगा हे पीक बरेच ठिकाणी बांधावरिल पिक म्हणून एक अतिरिक्त उत्पादन देणारे पीक आहे.
फुलोरा आणि फळ धारणा
शेवगा पिकांस अनेक वेळेस वर्षभर फुले येत राहतात. परंतु प्रामुख्याने ऑक्टोबर ते नोव्हेंबर आणि एप्रिल ते मे या काळात आर्थिक फायदा मिळवून देतील ईतकी फुले जास्त प्रमाणात मिळतात. फुल उमलल्यानंतर परागकण सकाळी 9 ते 10 आणि त्याच दिवशी संध्याकाळी 6.30 ते 7 यावळेत जास्त सक्रिय असतात. शेवगा पिकांत परागीभवन क्रियेत मदत करणारे घटक जसे मधमाशी उपलब्ध असल्यास फळ धारणा ही एकूण फुलांच्या 64 ते 68 टक्के ईतकी असते, तर मधमाशांच्या अनुपस्थितीत फळ धारणा केवळ 42 ते 47 टक्के ईतकी असते. म्हणजेच एकंदर 50 टक्के उत्पादन हे केवळ मधमाशांच्या उपस्थितीत वाढते. जे शेतकरी मधमाशा पालन आणि सोबत शेवगा लागवड करु ईच्छितात त्यांनी 20 ते 25 शेवगा रोपांसाठी एक मधमाशांचे लाकडी बॉक्स ठेवण्यास हरकत नाही.
फुल उमलल्यानंतर 65 ते 75 दिवसांत फळ जास्तीत जास्त लांबी आणि वजन प्राप्त करते. शेवगा पिकात फळ काढणीनंतर रोप जमिनीपासून साधरणतः 1 मीटर अंतरावर कापून टाकतात, जेणे करुन नवीन फुट येवून त्यावर हवामानानुसार 4 ते 6 महिन्यात पुन्हा फळधारणा होते. तसेच फळे हाताने काढता येतील अशा उंचीवर रोपाची वाढ होते.
शेवगा हे पीक तसे रासायनिक खतांच्या बाबतीत फार चोखंदळ असे पिक नाही. शेवगा पिकाच्या शेंगांच्या अन्नद्रव्याचे विश्लेषण केल्यास आपणास दिसून येते कि, त्यात व्हीटामीन सी – 120 मि. ग्रॅ/100ग्रॅ., कॅरोटिन 110 मि.ग्रॅ./100ग्रॅ, फॉस्फोरस 110 मि.ग्रॅ/100 ग्रॅम, मॅग्नेशियम 28 मि.ग्रॅ/100 ग्रॅम, पोटॅशियम 259 मि.ग्रॅ./100 ग्रॅम, सल्फर 137 मि.ग्रॅ./100 ग्रॅम, आणि क्लोरीन 423 मि.ग्रॅ./100 ग्रॅम इतक्या प्रमाणात विविध पोशक तत्वे आढळुन येतात. शेवगा पिकांस एका वर्षाला एका रोपासाठी 8 ते 10 किलो चांगले कुजलेले शेणखत द्यावे.
तमिलनाडू येथे बागायती परिस्थितीत शेवगा पिकाची लागवड केली असता त्यासाठी प्रती रोप 56 ग्रॅम नत्र, 22 ग्रॅम स्फुरद आणि 45 ग्रॅम पालाश आणि अझोस्पिरिलम हे नत्र स्थिर करणारे जीवाणू आणि स्फुरद विरघळवणारे जीवाणू हे लागवडीच्या वेळेस दिले गेले. अशा परिस्थितीत प्रती हेक्टर 45.90 मे.टन इतके जास्त उत्पादन मिळविण्यात आलेले आहे.